Ticker

10/recent/ticker-posts

भावगीतातील शुक्रतारा निखळला

अनेकांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यास भाग पाडण्याची ताकद असलेल्या भावनांनी गायन केलेले हे अरुण दाते यांचे गीत अजरामर गीत आहेमराठी भावगीतांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा गायक असेच अरुण दाते यांचे वर्णन करावे लागेल. 

 -दादासाहेब येंधे  

'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे' असे प्रांजळ आणि प्रामाणिकपणे आपल्या अमोल वाणीने सर्वांना संदेश देणारे आणि स्वतःही तसेच जगणारे ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते हे आपल्याला सोडून गेले आणि अख्खा महाराष्ट्र भावनिक झाला. अरुण दातेंच्या आवाजाची जादूही अशीच काही होती. अगदी मनात घर करून राहणारा त्यांचा आवाज होता. सहजतेने कुणीही गुणगुणावे, असे सहज सुंदर गीत त्यांच्या सुरातून निर्माण व्हायचे. त्यांचे गीत म्हणजे आपले जगणे झाले होते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यांच्या अचानक या जगातून जाण्याने 'जगण्यावर प्रेम करणारा 'शुक्रतारा' निखळला आहे. वैफल्याने पछाडलेल्या अनेकांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यास भाग पाडण्याची ताकद असलेल्या भावनांनी गायन केलेले हे अरुण दाते यांचे गीत अजरामर गीत आहे. मराठी भावगीतांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा गायक असेच अरुण दाते यांचे वर्णन करावे लागेल, वर्षानुवर्षे ही गाणी ऐकली तरी त्याची अविट गोडी कधीच कमी झालेली नाही.

तो काळ अगदी आकाशवाणीचा होता, टीव्ही सगळ्या महाराष्ट्रात पोहोचलाही नव्हता त्या काळात रात्रीची जेवणे झाल्यावर अंथरुणावर पडताना आपली आवडसारख्या कार्यक्रमातून हमखास अरुण दाते यांचे गाणे ऐकायला मिळायचे. तो मखमली आवाज ऐकत येणारी झोप म्हणजे स्वर्गीय स्वर असत. असाच हा सुंदर सुरांचा बादशहा आज स्वर गात गात स्वर्गात गेला आहे. पण त्यांचे अजरामर स्वर इथेच सोडून गेलेला आहे. 'शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी' असे प्रेमिकेला साद घालणारे गाणे ऐकताना श्वासही आपला रोखून ठेवावा आणि त्या शब्दांचा उच्चार अरुण दाते कसा करतात हे ऐकत बसावे असे वाटते किंवा 'येशील येशील येशील, राणी पहाटे पहाटे येशील' हे गाणे ऐकताना त्या प्रियतमेच्या येण्याची वाट पाहत रात्री झोपावे, पहाट होण्यापूर्वीच तिने स्वप्नात यावे असे वाटून आपले त्या गोड लोभस गाण्याबरोबर डोळे कधी मिटतात हे कळतही नाही. त्याचवेळी 'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी' या  गाण्यातील सनईच्या संगीताने आनंदित झालेले वातावरण गाणे संपताना डाव अर्ध्यावर मोडला या कल्पनेने डोळयांच्या कडा ओलावण्यावी ताकद या गायकीत होती. म्हणूनच दीर्घकाळ संगीत सेवा करूनही अरुण दाते आपल्यातून गेले तरी अजूनही त्यांच्या गाण्यांची कहाणी अधुरी राहिली आहे. असे वाटल्याशिवाय राहणार नाही.

प्रियतमेला भेटल्यावर 'दिवस तुझे हे फुलायचे' हे सांगून त्या प्रेमाच्या आनंदलहरीत कसे डुंबायचे हे  प्रेमिकांना सांगणारे गाणे अरुण दाते गातात तेव्हा ते गाणे त्यांनी ७० व्या वर्षी म्हटले असले तरी ते अगदी विशीतील नायक वाटतात. प्रेम हेच खरे असते, त्यात चुका या होतच असतात. पण प्रेमात सगळं काही माफ असलं तरी विश्वास हा महत्त्वाचा असतो. म्हणूनच प्रियकर प्रेयसीने आपल्या अखेरच्या टप्प्यातही चूक भूल देणे गरजेचे असते. आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी ही चूक भूल देताना नेमके काय म्हणायचे याचे अचूक भाव अरुण दाते यांच्या 'अखेरचे येतील माझ्या, तेच शब्द ओठी.. लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती..' हे गीत निरोपाचे गीत आहे.

मराठी भावगीतांच्या विश्वातील त्यांची 'एंट्री' एखाद्या सुखद झुळकीसारखी आहे. १९६२ मध्ये 'शुक्रतारा मंद वारा, चांदणे पाण्यातुनी...' या गीताचा जन्म झाल्यानंतर तर मराठी भावगीताच्या क्षेत्रात जणू 'दातेयुग' सुरू झाले. श्रीनिवास खळे यांची मनलक्ष्यी चाल, मंगेश पाडगांवकरांची वेचक शब्दयोजना यांना कोंदण लाभले होते अरुण दाते यांच्या अद्भुत सुरांचे. आजही या गाण्याची जादू कायम आहे. इतकी की टीव्हीवरला कुठलाही संगीताचा रिएलिटी शो किंवा भावगीतांचा कार्यक्रम त्याशिवाय अपुरा वाटावा. 'शुक्रतारा' नभी उगवल्यावर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. मराठी भावगीतांना गर्भश्रीमंत  करणाऱ्या अरुण दाते यांचा स्वर म्हणूनच अजरामर मानायला हवा. अरुण दाते देहाने आपल्यामध्ये उरले नसले, तरी त्यांचे आपल्या हृदयातील स्थान त्यांच्याच 'शुक्रताऱ्या'सारखे अढळ राहील. प्रियकर प्रियतमा यांच्यात ताटातूट होण्याचा आलेला हा क्षण जाताना फक्त प्रेमाची कबुलीच देऊन जातो. त्या भावनांचा आविष्कार अरुण दाते यांनी नेमकेपणाने केला आहे म्हणून हा शुक्रतारा संगीताच्या भावविश्वात ध्रुवता- याप्रमाणे अढळ आहे. अशी शेकडो भावगीते अरुण दाते यांनी अजरामर केली आहेत. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या