२५/१२/१९

बलात्काऱ्यांना फासावर लटकवा

बलात्काऱ्यांना फासावर लटकवा
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
संपूर्ण देशभर महिलांवर अन्याय, अत्याचार, लैंगिक छळ, बलात्कार आणि खुनाच्या घटना घडत आहेत. दररोज किमान एक बलात्काराची घटना घडल्याचे वृत्त येऊ लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महिलांच्या उन्नतीसाठी अहोरात्र कष्ट करणारे, त्यांच्या शिक्षणासाठी झटणारे आणि समतेचा संदेश सर्वदूर पसरवणारे महापुरुष या देशात जन्माला आले आहेत. स्त्री-पुरुषसमतेचा पुरस्कार करणारे महात्मे ज्या देशात निर्माण झाले, त्या देशात बुरसटलेली पुरुषी मानसिकता अद्यापि कायम असून या देशाने केवळ पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरला आहे की काय, असे वाटत आहे. 
दिल्लीतील सामूहिक बलात्काराचे ‘निर्भया’ प्रकरण घडल्यानंतर २०१३मध्ये गुन्हेगारी कायद्यात सुधारणा करण्यात आली आणि दोषींना कठोर शिक्षा करण्याच्या उद्देशाने नव्या कायद्यात जन्मठेप आणि काही प्रकरणात मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. कायद्यामध्ये सुधारणा करून २० वर्षे तुरुंगवासाऐवजी जन्मठेप अशी तरतूद करण्यात आली. अ‍ॅसिड हल्ले किंवा लैंगिक गुन्ह्यांकरिता कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. कायदे कितीही कठोर असले, तरी कायद्याची भीतीच लोकांना वाटत नाही़. कायदा कडक केला असला, तरी गेल्या दोन वर्षांत बलात्कारांच्या प्रमाणात किंचीतही घट झाली नाही़. उलट बलात्काराचे प्रमाण वाढत चालले आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार, नोकरदार, दलित, मागासवर्गीय, आदिवासी, संघटित-असंघटित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांसह दोन-तीन वर्षांच्या कोवळ्या बालिकांपासून ७५ वर्षांच्या वृद्ध महिलांपर्यंत तमाम महिला अत्याचाराला बळी पडत आहेत़ ही विकृतीची विषवल्ली कशी ठेचून काढणार? हा प्रश्न भेडसावत आहे.
बलात्कार करणाऱ्या गुन्हेगाराला मारून टाकले पाहिजे, त्याचा मरेपर्यंत छळ केला पाहिजे, अशी संतापजनक प्रतिक्रिया महिला वर्गामध्ये उमटत आहे; परंतु अशा प्रकारे बलात्काराऱ्यांना शिक्षा देण्याची तरतूद भारतातील कायद्यांमध्ये नाही. कायद्याची भीती वाटावी, असे कठोर कायदे लोकशाहीमध्ये  नसल्यामुळे बलात्काऱ्यांची भीड चेपली आहे. इस्लामी देशांमध्ये बलात्कारी व्यक्तीला दगडाने ठेचून ठार मारणे, शरीराचे अवयव छाटणे, फाशी देणे, लिंग कापणे, गोळ्या घालून ठार करणे, अशा प्रकारच्या शिक्षा भर चौकात दिल्या जातात. याच शिक्षा भारतातही दिल्या जाव्यात, अशी पीडितांची भावना असते. या घटना जितक्या क्लेशदायक, तिरस्करणीय, संतापजनक असतात तेवढीच तीव्र भावना बलात्काऱ्यांच्या शिक्षेबद्दलही असते. संयुक्त अरब अमिराती, इराण, इराक, अफगाणिस्थान, मलेशिया आदी देशांमध्ये बळातकाऱ्याला आरोप सिद्ध झाल्यानंतर २४ तास ते आठ दिवसांत फाशी देण्याची शिक्षा आहे. चीनसारख्या देशांमध्ये आठ दिवसांत फाशी दिली जाते. तालिबानमध्ये तर बळातकाऱ्यांचे अवयव कापून त्याला मरेपर्यंत दगडाने ठेचले जाते. आपल्या देशातही सर्वसामान्यांची बलात्काऱ्यांच्या बाबतीत हीच भावना आहे. आपल्या भारत देशात मात्र बलात्कारी व्यक्ती तुरुंगात पोलीस संरक्षणात राहत असून त्यांना चार वेळा जेवण दिले जात आहे. अनेक वेळा असे आरोपी न्यायालयात सबळ पुराव्यांअभावी सुटून ते उजळ माथ्याने मिरवतानाही दिसून येतात. महाराष्ट्रात लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या हजारो तक्रारी पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवल्या जात आहेत. 
दिल्लीतील निर्भयाचे एक प्रकरण प्रसारमाध्यमांनी लावून धरले होते, ते गांभीर्य आणि ती तीव्रता अन्य प्रकरणांमध्ये दिसून येत नाही़. ही विकृती रोखायची असेल, तर संघटित प्रयत्नाने पुरुषी मानसिकतेवर प्रहार करावे लागतील. महिलांच्या स्त्रीत्वावर घाला घालण्याचे तिरस्करणीय प्रकार होत आहेत. त्याविरुद्ध संघटितपणे आवाज उठवावा लागेल. तसेच बलात्कार सिद्ध होताच वेळकाढूपणा न करता शासनाने त्वरित फाशीची शिक्षा दिल्यास,  अशा विकृतांवर जरब नक्कीच बसेल.


२०/११/१९

पाकिस्तानशी मैत्री नकोच

पाकिस्तानशी मैत्री नकोच
दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
पाकिस्तानचे राजकारणी आणि लष्कर आगाऊ आहे हे नव्याने सांगायला नको. भारताच्या सीमेवरील नियंत्रण रेषेचे उल्लंघन त्यांच्यासाठी नवे नाही. सतत सीमेवर त्यांच्या कुरापती सुरूच असतात. पाकिस्तानकडे मैत्रीचा हात पुढे करणे म्हणजे महाचूक आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मात्र भारत प्रत्येक वेळी ती चूक करतो. त्यामुळे यापुढे चर्चा किंवा मैत्रीचे बोलणे नकोच. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवे. तरच त्यांचा आगाऊपणा कमी होईल.
श्रीलंका, चीन, अफगाणिस्तान आणि बांगलादेशप्रमाणे पाकिस्तान हाही आपल्या शेजारील देश आहे. मात्र, एक सख्खा शेजारी अशी पाकिस्तानची भारतासोबत ओळख नाही. परंपरागत प्रतिस्पर्धी म्हणूनच पाकिस्तानचा उल्लेख केला जातो. वास्तविक पाहता तशी ओळख होण्यास त्यांची वागणूक कारणीभूत आहे. आपल्या क्रूर आणि वाईट कारवायांमुळे पाकिस्तानने स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे. जगात कुठल्या देशांच्या सीमेवर, नियंत्रण रेषेवर तणाव नसेल तितका भारत-पाक सीमेवर नेहमी असतो.  याचेही कारण पाकिस्तान हाच आहे. भारताने कधीही नियंत्रण रेषेचे उल्लंघन केलेले नाही.  भारत हा सोशिक देश आहे. पुरातन काळापासून भारताने कुणावर आपणहून हल्ला केल्याचे ऐकिवात नाही. याउलट भारतावर हल्ला झाल्याचा इतिहास सांगतो. भारताने असे आणि अनेक हल्ले पचवले आहेत. कारण आमच्यात सहिष्णुता आहे. आम्ही शांततेचे पाईक आहोत. मात्र, भारतात शांतता नांदावी असे पाकिस्तान कधीच वाटत नाही.
पाकिस्तानला बेचिराख करणे भारतासाठी मोठे आव्हान नाही. मात्र भारताला पाकिस्तान पेक्षा स्वतःच्या प्रतिमेची अधिक काळजी आहे. भारताला आंतरराष्ट्रीय संबंध जोपासायचे आहेत. पाकिस्तान वर हल्ला करून आशिया खंडातील शांतता भंग करायची नाही. म्हणून भारत प्रत्येक वेळी गप्प राहतो. मात्र याचा चुकीचा अर्थ पाकिस्तानचे राजकारणी आणि लष्कर काढत आहेत.
आपले भारतीय जवान सीमेवर जे काही करतील त्याचे देशाच्या भूमीवरही समर्थन केले जाईल, असा एकत्रित आवाज आणि भावना आपल्याकडे निर्माण झाल्या पाहिजेत. हा देश भारताबरोबर सौजन्याने वागेल याची अजिबात शक्यता उरलेली नाही. मग भारताने सौजन्याने वागण्याचा ठेका घेतलेला नाही. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे पाकिस्तानला उघडे पाडले पाहिजे. त्याचा निषेध केला पाहिजे. मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय महानगरीत पाकिस्तान खेळाडूंचे किंवा कलाकारांचे कार्यक्रम बंद पाडले गेले तरच त्याचा सगळ्या जगभर संदेश जाऊ शकतो.
 कोणतीच मान मर्यादा न पाळणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचे खेळाडूंचे आणि कलाकारांची भारतात लाड करण्याचे काहीच कारण नाही सीमेवर पाकिस्तानचे जवानांचे प्राण द्यायचे आणि इथे येऊन पाक खेळाडूंनीही खेळाचा आनंद उपभोगायचा हादेखील एक क्रुरपणाच ठरतो. सगळ्या देशातील जनतेच्या भावना समान असल्या पाहिजेत. सीमेवर जवानांचे प्राण जात असतील तर त्याचा निषेध प्रत्येक भारतीयाने केला पाहिजे. सीमेवरच्या जवानांच्या पाठीमागे सगळ्या जनतेच्या भावना उभ्या राहिल्या पाहिजेत. जवानांनी प्राणांची बाजी लावायची आणि इकडे कोट्यवधीचा लिलाव करून पाकिस्तानी खेळाडूंनी तिजोऱ्या भरायच्या. हा प्रकार अजिबात खपवून घेता कामा नये. पाकिस्तानची खोड मोडायची असेल तर त्या देशाला कायमचे धडे शिकवावे लागतील. पुढची काही वर्षे या देशासोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवता कामा नये. सांस्कृतिक आर्थिक व्यवसाय किंवा क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्याची वेळ आली आहे. कारण त्या देशातल्या राजकारण्यांना आणि लष्कराला सभयतेची, सौम्य किंवा मानवतेची भाषा समजत नाही. सातत्याने जिहाद आणि दहशतवाद एवढा एकच उद्योग तिथे चालतो. यासाठी पुढचे काही वर्षे मुंबईत किंवा भारताच्या भूमीवर कुठेही पाक खेळाडूंचा, कलाकारांचा कोणताच कार्यक्रम होता कामा नये. हा एकदा दणका दिला की,  तिथल्याच नागरिकांना आपल्या सरकारकडून कशाप्रकारे चुका होत आहेत हे लक्षात येईल. आणि यातून त्यांचे होणारे नुकसान, त्या देशाचेच नुकसान करणारे ठरेल. कदाचित भारताने घातलेला हा बहिष्कार पाकिस्तानला थोडाफार धडा देणारा ठरू शकेल.
पाकिस्तानने भारताच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. तसेच भारतानेही अति संयम दाखवू नये. 'शहाण्याला शब्दांचा मार, मुर्खाला लाथेचा मार' या म्हणीप्रमाणे आगाऊ पाकिस्तानला इशारे आणि समज देण्यात अर्थ नाही. पाकिस्तानच्या प्रत्येक वाईट कृतीचे उत्तर त्यांच्याच भाषेत द्यायला हवे.


१५/११/१९

अति घाई संकटात नेई....

अति घाई संकटात नेई....
-दादासाहेब येंधे(dyendhe1979@gmail.com)
"तुम्हाला कशाची सवय आहे? तुम्हाला काय आवडते? वाचण्याची आवड आहे?"
वेबसाइटवरून पुण्यातून एक मुलगी अशा प्रश्नांचा भडिमार करीत असताना समोरच्या पक्षाकडून नागपूर येथून येणाऱ्या उत्तरांमुळे ती खुश झाली. मनातच म्हणाली, "मला पाहिजे अगदी तसाच हा मुलगा आहे. मला त्याला स्वतः च भेटले पाहिजे. खरेतर अशावेळी मुलींनी सावध असले पाहिजे. अनोळखी व्यक्तींबरोबर बोलताना मुलींनी आपल्या नातेवाईकांसोबतच डिटेक्टिव्ह एजन्सीचीही मदत घेण्यास हरकत नाही.
मुलगी पुण्याला राहत होती आणि नागपूर कुठे इतके दूर होते? तरी भेट होत नव्हती. पुण्यामधूनच त्याच्याबरोबर ती फोनवर गप्पागोष्टी करीत असे. मुलगा दिसायला सुंदर, चांगले व्यक्तिमत्व, बोलायला खूप चपळ. कुठल्यातरी मोठया कंपनीत वर्षाला जवळजवळ ५०-६० लाख रुपये कमवत असेल. पण, एकच गोष्ट सलत होती की, तो सतत पान खायचा. नंतर तो खोटं बोलायचा. एवढ्याश्या छोटया गोष्टीचा तपास करण्यासाठी तिने डिटेक्टिव्ह कंपनीची महिला गुप्तहेर संगीताला ठेवले. थोड्याच दिवसांत खोटारडा पकडला गेला. मोठया आलिशान फ्लॅटच्या गोष्टी करणारा कुठल्या तरी गेस्ट हाऊसमध्ये खाण्या-पिण्यासहित महिन्याला रु. ४०००/- देऊन तो राहत होता. बियरच्या बाटल्यांवर बाटल्या रिचवत होता. पगार तर महिन्याला त्याने २५ हजारांऐवजी ५ लाख सांगितला होता. डिटेक्टिव्ह संगीताने नागपूरमधील पानवाल्याला विचारले असता तो म्हणाला, "मॅडम, रोजचाच ग्राहक आहे हा. १०ते १२ पाने तो रोज माझ्याकडून घेऊन खातो." एका खाजगी कंपनीत कामाला जातो. एकदम व्यसनी माणूस आहे तो.' असे तो पानवाला म्हणाला.
दुसऱ्या गोष्टीत एका डिटेक्टिव्ह एजन्सीच्या मनीषा या कार्यकर्तीचा अनुभव असा होता की, ती एका संशयास्पद युवकाच्या घरी कामवाली बाई म्हणून राहिली. तो युवक त्याच्याच घरातील दुसऱ्या कामवाली नोकराणीसोबत संबंध ठेवत होता. अशी सर्व माहिती तिने त्या युवकाच्या पत्नीला फोटोसकट दिली. परदेशातून लग्नासाठी येणाऱ्या वरांनी पसंत केलेल्या भारतीय मुलीच्या मागेही तपास करण्यासाठी तिची माहिती काढण्यासाठी गुप्तहेर मोठ्या प्रमाणात ठेवले जातात. अशा डिटेक्टिव्ह एजन्सी स्त्रियाही चालवतात. मद्रास येथे काही प्रमाणात एजन्सी आहेत. पंधरा ते वीस हजार रुपये घेऊन त्या काम करतात. पुरुषाला शोधण्यासाठी त्या गुप्तहेर पुरुषांच्या रंगरूपावर पाळत ठेवतात. इतर गोष्टी त्यांची कंपनी सांभाळते. गुप्तहेर फक्त पैशांसाठी काम करत नाही तर योग्य मार्गदर्शन करतात. जे लाखो-करोडो रुपये लग्नाच्या वेळी खर्च केले जातात. तेच लग्न करण्याआधी थोडे हजार नवरा मुलगा योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी खर्च केले तर अडले कुठे? लग्नाआधी असा तपास करणे गरजेचे आहे. मोठ्या कंपन्या देखील कोणाला नोकरी देण्याआधी तपास करीत असतात. त्यात चुकीचं काही नाही.
एक गुप्तहेर कंपनीला लग्न नक्की झालेल्या पुरुष सजातीय संबंध ठेवतो का नाही त्याच्या तपासासाठी नेमले होते त्यांनी तपास केल्यानंतर सत्य त्याला सांगण्यात आले. खरे तर लग्नाआधी केलेला तपास अविश्वास सुचवत नाही. तर तो सतर्कतेचे पार्क असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सध्या वेगवेगळ्या व्यवसायासारखेच लग्नही जोखमीचे झाले आहे. प्रत्येक वधूने आपण फसण्याआधी योग्य विचारपूस करणे गरजेचे आहे. जर अशा प्रकारची दूर दृष्टी असेल तर भविष्यात येणारी संकटे नक्कीच टाळता येतील. परदेशात राहणाऱ्या मुलाबरोबर देशी मुलगी लग्न करून गेल्यानंतर तिला तेथील परिस्थिती माहिती नसते. त्यावेळेस अशा गुप्तहेर एजन्सी कामाला येतात. 
एकोणीस वर्षाची एक मुलगी प्रेमात पडली होती तिची आईदेखील होणाऱ्या जावयावर खुश होती. राजस्थानच्या गर्भश्रीमंत मानल्या जाणाऱ्या राजकीय कुटुंबातील तो मुलगा होता. असे तिला त्याने सांगितले होते. त्यासाठी एका गुप्तहेराला तपास करण्यास सांगितले असता सत्य वेगळेच बाहेर आले. एका गावात हॉटेल आहे. तेथे वेश्याव्यवसाय चालवून तो खूप पैसे कमावत होता. राजकीय कुटुंबियांबरोबर त्याचे काहीही संबंध नाही. फक्त आडनाव सारखे आहे. तो राजेशाही थाटात राहतो म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका.
जाहिरात किंवा लग्न जुळवून देणाऱ्या मंगल कार्यालयांमधील त्यांच्या ग्राहकांची सगळ्यात मोठी तक्रार असते की मुलाला दारूचे व्यसन. येणारा सगळा पैसा तो दारू पिण्यावर उडवतो. तर मुलीने आपल्याबद्दल खोटे सांगितले. अशा दोन्ही बाजू समजून घेणे गरजेचे आहे. लग्नात फसवणूक करणे चुकीचे आहे. अशी एकमेकांची फसवणूक होण्यापासून वेळीच सावध होणे गरजेचे आहे. त्यासाठी एखादया डिटेक्टिव्ह एजन्सीची तुम्ही नक्की मदत घेऊ शकता. त्यामुळे बाबुजी जरा धीरे चलो बडी मुश्किल है, इस राह मे...


                           

२६/९/१९

'फिट इंडिया' ही एक चळवळ व्हावी

'फिट इंडिया' ही एक चळवळ व्हावी
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
दिल्ली येथे इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये केंद्र सरकारच्या 'स्वस्थ भारत' (फिट इंडिया) मोहिमेचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच झाले. 'स्वस्त भारत' ही केवळ एक मोहीम नाही तर चळवळ आहे. देशाला तंदुरुस्त व निरोगी बनविण्यासाठी सर्वांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी देशवासीयांना केले. सध्या डायट हे 'फॅशन' बनत असतानाच तंत्रज्ञान आणि विकास यामुळे शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आपली शारीरिक कामे कमी झाली असल्यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या आजारात मोठी वाढ झाली आहे. आता अशी परिस्थिती अशी आहे की आपण चालतो कमी आणि आपण किती पावले चाललो हे तंत्रज्ञान आपल्याला सांगते. अस्वस्थ जीवनशैलीमुळे विकार फैलावत असल्याचे मोदींनी सांगितले. 
खरे तर मोबाईल इंटरनेटच्या महाजालात गुरफटलेल्या तरुणांसाठी अशी मोहीम गरजेचीच आहे. समतोल नसलेला आहार, अभ्यासाचा वा कामाचा ताण हा त्रिकोण तंदुरुस्तीचे सर्व कोण बिघडवत चालला आहे. त्यासाठी व्यायाम हा रामबाण उपाय आहे. हलका व्यायामही शरीर तंदुरुस्त राखू शकतो. उत्साह आणि आनंद हे आयुष्यात ऊर्जेचे काम करत असतात. ते तसेच राहावे असे वाटत असेल तर प्रत्येकाने काही नियम स्वतःसाठी ठरून घ्यायला हवेत. त्यामुळे आपण नेहमी उत्साही आणि निरोगी राहू शकतो.
संतुलित आहार निरोगी जीवनासाठी गरजेचा आहे. सारखे जंकफूड आणि चुकीचा आहार घेतल्यामुळे आपले जीवन धोक्यात येते. ताजी फळे, सुकामेवा, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. बाहेरचे अन्न खाण्यापेक्षा घरच्या जेवणाचीच चव चाखणे केव्हाही चांगले. 
निरोगी व फिट राहण्यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम करण्याची सवय लावायला हवी. कारण व्यायामामुळे शरीर निरोगी आणि फ्रेश होतं. दिवसभर कामाचा कितीही व्याप असला तरी कमीतकमी पंधरा मिनिटे स्वतः च्या निरोगी जीवनासाठी काढणे गरजेचे आहे. निरोगी जीवनासाठी चालणे, जॉगिंग असे व्यायाम देखील करणे गरजेचे आहे. त्यासोबतच योगासने आणि प्राणायामदेखील करणे फार महत्त्वाचे आहे. योगासने केल्यामुळे शरीरातील स्नायू बळकट होतात. प्राणायामामुळे श्वासावरील नियंत्रण वाढते. शरीराला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो. योग तज्ञांच्या मदतीने योगासने करावीत. रोज अर्धा तास ध्यानधारणा, कपालभाती व अनुलोमविलोम केल्याने प्रत्येकाला चांगला फायदा होऊ शकतो.
'स्वस्थ भारत' ही मोहीम केवळ तरुण वर्ग पुरतीच मर्यादित नाहीतर ती सर्वांसाठी आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार अशा आजारांवर औषधाची मात्रा सुरू करण्याची वेळ येऊ द्यायची नसेल तर ही चळवळ प्रत्येकाच्या जीवनाची अविभाज्य घटक व्हायला हवी.


५/९/१९

लोकसंख्येवर नियंत्रण गरजेचे

लोकसंख्येवर नियंत्रण गरजेचे
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले यावेळी त्यांच्या भाषणात कलम ३७०, ३५अ, ट्रिपल तलाक आणि मागच्या ७० वर्षात न झालेल्या गोष्टी असतील अशी अटकळ बांधली होती. त्याचप्रमाणे मोदींनी या सर्व बाबींचा उल्लेख केलेला आहेच. पण, त्याशिवाय या वर्षीच्या भाषणाचे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माननीय पंतप्रधानांनी वाढत्या लोकसंख्येवर व्यक्त केलेली चिंता... छोटे कुटुंब असणे हीसुद्धा एकप्रकारची देशभक्तीचं असल्याचे मोदीजी म्हणाले. भारतीय नागरिकांनी जर कुटुंब नियंत्रण केले तर देशाचे भले होईल अशी अपेक्षा त्यांनी भाषणातून व्यक्त केली.
१९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपली लोकसंख्या ही ३४ कोटी होती. आज ती १३१ कोटींच्या घरात आहे तर २०५० पर्यंत आपण १७० कोटींच्या आसपास पोहोचू असा विश्लेषकांचा अंदाज आहे. स्वातंत्र्याच्या ७३ वर्षात भारताची लोकसंख्या जरी भरमसाठ वाढली असली तरी त्याची दाहकता १९७० च्या नंतर तितकीशी जाणवली नाही. कमी लोकसंख्या असूनही १९७० पर्यंत देशातील बहुतांशी जनता उपाशी राहत होती. त्यामुळेच सिनेसृष्टीने रोटी, कपडा और मकान या मूलभूत गरजांवर आधारित सिनेमे काढले होते. मात्र त्यानंतर कृषी क्षेत्राने कूस बदलली आणि हरित क्रांती घडून आली. आज १३० लोकसंख्या असूनही सर्वांना पुरेशा प्रमाणात अन्न मिळत आहे. तरीही भारताचा 'मानव विकास निर्देशांक' हा १८९ देशांपैकी १३० वर आहे. याचा अर्थ वाढत्या लोकसंख्येला जरी आपण अन्न पुरवत असलो तरी इतर आवश्यक गरजा भागवण्यात आपण अपयशी ठरत आहोत.
लोकसंख्यावाढीची समस्या रोजगार आणि अन्नधान्य पुरती मर्यादित नाही. यातून पर्यावरणाचाही गंभीर समस्या निर्माण झाल्यात. सांगली, कोल्हापूरचे ताजे उदाहरण घ्यायचे झाल्यास पूरनियंत्रण रेषेच्या आत बांधकाम केल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. शहरात घरांसाठी आणि ग्रामीण भागात शेतीसाठी जमीन उरलेली नाही. वाढत्या वस्त्यांमुळे जंगलावर अतिक्रमण होत आहे. जंगलातील वन्य प्राणी मानवी वस्तीत घुसण्याच्या घटना रोज विविध वर्तमानपत्रात वाचावयास मिळत आहेत. मनुष्य आणि वन्यप्राणी संघर्ष पुढच्या काळात आणखी उग्रही होऊ शकतो. देशाचा विचार केल्यास छोटे कुटुंब सुखी कुटुंब हीच घोषणा सार्थ वाटते. लोकसंख्येचा विस्फोट यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्यातल्या त्यात लहान आणि विभक्त कुटुंब पद्धतीचा स्वीकार कित्येक लोकांनी केला आहे. सर्वांगीण व्यक्ती विकासाच्या दृष्टीने मर्यादित कुटुंब असणे आवश्यक आहे. माननीय पंतप्रधान मोदीजींची लोकसंख्या नियंत्रणाची ही भूमिका स्वागतार्ह आहे.


२२/८/१९

काश्मीर मध्ये पुन्हा नंदनवन होईल

काश्मीर मध्ये पुन्हा 'नंदनवन' होईल
-dyendhe1979@gmail.com

नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याचा घेतलेला निर्णय खरोखरच धाडसी आणि ऐतिहासिक म्हणावा लागेल. त्यामुळे संपूर्ण देशातीलच दहशतवादी कारवायांना आळा बसून देशाच्या नंदनवनातही शांतता नांदेल. 
काश्मीरला दुहेरी नागरिकत्व बहाल करणाऱ्या ३७०या कलमामुळे एकतर काश्मिरी जनता व भारतीय नागरिक यांच्यात काही प्रमाणात दरी निर्माण झाली होती. भारतीय सुरक्षा दले सार्वजनिक ठिकाणीच सुरक्षा देण्यात व्यस्त असत. त्याचाच फायदा दहशतवादी काश्मिरी नागरिकांच्या घरात लपून बसण्यासाठी मिळवायचे. घराघरात लपून बसून अचानक सुरक्षा रक्षकांवर लपून हल्ले करायचे. स्थानिक काश्मिरी नागरिकांनी सहकार्य न केल्यास त्यांच्या मुलींना व बायकांना दहशतवादी पळवून नेत लैंगिक अत्याचार करायचे. त्यांच्या घरांवर हल्ले करायचे. परिणामी, काश्मिरी नागरिकांना दहशतवाद्यांना सहकार्य करण्याशिवाय  दुसरा पर्याय नव्हता. त्यातच शेजारी राष्ट्राकडून दहशतवाद्यांना पाठींबा मिळत असल्यामुळे त्यांचा मनसुबा कायम वाढतच होता. भारतीय सुरक्षकांच्या ताफ्यावरही कित्येकदा दगडफेक केल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. 
आता काश्मीरला स्वायत्तता देणारे कलम रद्द करून केंद्र सरकारने मोठा अडसर दूर केला आहे. परिणामी, आपल्या सैन्याला आता काश्मीरी नागरिकांच्या घरात जाऊन लपून बसलेल्या दहशतवाद्यांना पकडून बाहेर काढता येईल.  यामुळे काश्मीरमधला दहशतवाद नष्ट होईल व काश्मीर देशाच्या मुख्य प्रवाहात येईल.
७० वर्षांची ही भळभळती जखम एकाएकी जाणार नाही. तर त्यासाठी थोडा वेळी द्यावा लागेल. परंतु, आता खऱ्या अर्थाने काश्मीर स्वतंत्र झाला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. यथावकाश तेथे उद्योगधंदे उभे राहून बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळेल. काश्मीरमध्ये अनेकानेक उद्योगधंदे सुरू करून तिथल्या बेकार तरुण-तरुणींचे आयुष्य कसे सुखकर होईल याकडे लक्ष पुरवावे लागणार आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील उद्योजकांना तसे आवाहनही केले आहे. यातून तेथील बेकार हातांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल.  
पर्यटनाच्या दृष्टीने काश्मीर सगळ्यात प्रिय असल्याने यात स्थानिक मुस्लिम तरुणांचा सहभाग वाढवून पर्यटकांसाठी विश्वासाचे-संरक्षणाचे स्वस्थ वातावरण निर्माण करता येईल. काश्मिरी जनतेसाठी भारतभ्रमण यासारखी व्यापक मोहीम आखली तर हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी ते चांगले पाऊल ठरून देशातील हिंदू-मुस्लिम जनतेचा परस्परांशी संवाद वाढून ते भारतीय संस्कृतीशी एकरूप होण्यास मदत होईल. शांततेमुळे काश्मीरमध्ये पर्यटन बहरेल. एकूणच विकासाला चालना मिळून तेथील नागरिक देशाच्या मुख्य प्रवाहात येतील.१९/८/१९

महापूर मानवनिर्मितच

महापूर मानवनिर्मितच
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक पाऊस पडण्यासाठी देवाकडे साकडे घालताना दिसून येत होता. पण, गेल्या दहा-पंधरा दिवसात  महाराष्ट्रातील काही भागांत एवढा पाऊस पडला की, कोल्हापूर, सांगली, कराड येथील नागरिकांचे संसार अक्षरशः पाण्यात वाहून गेले. एनडीआरएफ, नौसेनेच्या जवानांनी आपल्या प्राणाची बाजी लावत पुरात अडकलेल्यांना बोटीद्वारे बाहेर काढले. 
महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच बेळगाव जिल्यातील सीमावर्ती भागातही या पुराचा प्रचंड तडाखा बसला आहे. दक्षिण महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात आलेला महाप्रलंयकरी महापूर केवळ निसर्गनिर्मित नाही, तर त्याला मानवाने केलेल्या चुकाच प्रामुख्याने कारणीभूत आहेत. त्यामुळे सरकार, प्रशासन आणि जनतेला दोन्ही हात वर करून केवळ निसर्गाला दोष देऊन चालणार नाही. 
महाराष्ट्रातील बऱ्याच नद्यांच्या पात्रातील वाळू उपसा केल्याने त्यांचे निसर्गचक्रही बिघडले नदी ठिकाणी गाळ साठला आहे. नद्यांची पात्रे अरुंद झाली असून नद्यांच्या पात्रापर्यंत शेत जमीन तयार करून उसाची शेती नदी काठापर्यंत करण्यात आली आहे. या परिणामामुळे नद्यांच्या पात्रात पाणी कमी आणि उभ्या पिकांमध्ये अधिक अशी अवस्था बऱ्याच जिल्ह्यांत आपणास बघावयास मिळत आहे. नद्यांच्या पूरनियंत्रण रेषेत झालेली बांधकामे, धरणांचे अतिरिक्त पाणी एकाच वेळी सोडावे लागण्याचे संकट, नद्यांच्या रचनांमधील फेरबदल, नद्यांवरून जाणाऱ्या रस्त्यांमुळे अडणारे पाणी आदी मानवी चुकांचा मोठा फटका महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना बसला आहे.
डोंबिवली, कल्याण आणि त्यापुढील उपनगरांत याच पावसात पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. त्यासही माणूस मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे वाढते नागरीकरण करण्याबरोबरच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, बदलापूर या परिसरावर अतिक्रमणे वाढत गेली. त्यांना नियोजनपूर्वक काही आकार देण्याऐवजी अनधिकृत बांधकामांना कामाचा पुरस्कार देण्यात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि सरकारी यंत्रणा धन्य समजू लागल्या. त्याच वेळी नव्याने उदयास येणाऱ्या वस्त्या, कॉलनी तसेच गृहनिर्माण संस्था, सोसायटी येथील लोकांना मातीही शत्रुत्व वाटू लागली आणि दिसली मोकळी जागा की बनवा काँक्रीटचा रस्ता किंवा पेव्हर ब्लॉकचे रस्ते आणि मग पाणी मुरायला जागा तरी कुठे? एकीकडे जंगले, जमीन वाचवण्याचे नारे द्यायचे आणि प्रत्यक्षात आपणच  जंगले तोडून काँक्रीटचे रस्ते, बंगले बांधायचे. आणि मग निसर्ग तरी तुम्हाला कसा सोडणार..?
वरील विविध कारणांवरून अख्ख्या महाराष्ट्रात पूरस्थिती ओढवण्यास माणूसच कारणीभूत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये कारण निसर्गाचे स्वतःचे काही नियम आहेत. त्यात जर कोणी हस्तक्षेप केला, त्यात ढवळाढवळ केली तर निसर्ग चक्रात असंतुलन निर्माण होऊन सुका दुष्काळ, ओला दुष्काळ, पूर, महापूर अशा नैसर्गिक आपत्तींना माणसाला तोंड द्यावे लागते. कोल्हापूर सांगली येथील पूरग्रस्त नागरिकांपैकी काही सुजाण नागरिकांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, 'येथील नद्यांतून वाळूउपसा, नदीकाठी, किनारी पाण्याचे स्त्रोत बुजवून त्याठिकाणी हॉटेल, बंगले बांधले गेले आहेत. असे निसर्गावर अतिक्रमण केले तर नद्यांचे पाणी माणसांच्या वस्तीत शिरणारच.' माणसाने जर पाण्याची जागा घेतली, तर पाणी माणसाच्या जागा घेणारच ना!' आता या महापुरातून सरकार काही तरी बोध घेईल, स्थानिकांनी पाण्याचा प्रवाह बदलू नये. तसेच नदी, नाल्यांवर अतिक्रमणे होऊ नयेत. याकरिता कठोर कायदे बनवून त्याची तातडीने अंमलबजावणी करेल. अशी आशा करावयास हरकत नाही.


१५/८/१९

रानभाज्या खा, अन तंदुरुस्त रहा

रानभाज्या खा, अन तंदुरुस्त रहा
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
पावसाळ्यात आपल्याला निसर्गाची विविध रूपं पहायला मिळतात. या रुपांपैकीच एक रूप म्हणजे हिरव्या रंगाच्या विविध छटा असणाऱ्या रान भाज्या. क्वचित एखादी दुसरी भाजी लाल, शेंदरी नाहीतर तपकिरी रंगाची असते. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या रासायनिक खते, कीटकनाशके यांच्या वापराशिवाय आपोआप डोंगरावर, पहाडावर उगवलेल्या असतात. त्यामुळे या भाज्यांमधील पौष्टिक गुणधर्मात दुपटीने वाढ होते. परिणामी, या रानभाज्या विविध आजार विकारांवर गुणकारी ठरतात.
पावसाच्या दिवसात पोकळा, केनी, मायाळू, मोहाची फुलं, राजगिरा, आपट्यांच्या पानांसारखी मऊ पण लुसलुशीत कोरलाची पानं, गवताप्रमाणे दिसणारी फोडशी, चिंचेच्या पानाप्रमाणे दिसणारा कोवळ्या पानांचा खुरासन, तेलपट, शेवळी, रानटी माठ, लाल माठ,  तोरणा, कोरळ, नारायणवेल, हिरवा माठ, टाकळा, अंबाडी, शेवगा, कंटोळी, शेवगा, अळू, आघाडा, बाफळी, मायाळू यासारख्या विविध भाज्या भरपूर प्रमाणात खाण्याचा हा महत्त्वाचा ऋतू आहे. या सर्व भाज्या पावसाळ्यात रानावणात, डोंगरावर उगवलेल्या असतात. या भाज्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या रासायनिक खतविरहित असल्यामुळे उपवासालाही खाता येतात. आणि विशेष म्हणजे मांसाहारी मंडळी या भाज्यांमध्ये ओली किंवा सुकी कोळंबी सुके बोंबील टाकूनही या भाज्या खातात. रानभाज्या मध्ये असणाऱ्या तंतुमय (फायबर) घटकांमुळे पावसात मंदावलेली पचनक्रिया अधिक गतिमान होते.
ज्या ऋतूंत ज्या भाज्या, फळे जे जे उपलब्ध होते ते प्रत्येकाने आवर्जून खाल्ले पाहिजे असं आयुर्वेदात म्हटले आहे. पावसाळ्यात शरीरात वातदोष वाढतो. पित्त आतल्या आत साचून राहतं. अशावेळी रानभाज्या आवर्जून खाव्यात. आपल्याला रानभाज्यांबद्दल पुरेशी माहिती नसल्याने इच्छा असूनही कित्येकजण त्या विकत घेत नाहीत. त्यामुळे रानभाज्या विकत घेताना शक्यतो स्थानिक आदीवासींकडून विकत घ्याव्यात. त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यांना त्या भाज्यांविषयी अचूक माहिती असते.
यांतील काही पावसाळी रानभाज्यांचे गुणधर्म आपण जाणून घेऊया.
टाकळा: महाराष्ट्राच्या काही भागात खास करून कोकणात ही भाजी टाकला म्हणून ओळखली जाते टकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. कारण कोवळ्या पानांची भाजी पचायला हलकी असून ती तिन्ही दोष कमी करते. रक्तात रक्त-पीत यांसारखे रक्ताचे आजार तसेच नायटा रोगातही ही भाजी आवर्जून खाल्ली जाते. पावसात होणारा खोकला शरीराला सुटणारी खाज, पोटात जंत होणे, दमा लागणं याही त्रासात ही भाजी जरूर खाल्ली जाते.
कंटोळी: करटुल, कंटोळ या नावानेही ही भाजी ओळखले जाते. झाडाझुडपात वाढलेल्या कंटोळीची भाजी कांदा, खोबऱ्यासोबत परतवून खाल्ली जाते. संधिवाताच्या तसंच पित्ताचे विकार यावर ही भाजी लाभदायी ठरते.
सुरणाचा कोंब: पहिला पाऊस पडल्यावर जमिनीत सुरणाचे कोंब रुजून येतात. जमिनीच्या वरच्या बाजूने हिरव्या रंगाचे नाव पाण्यात चोरण्याच्या पानांच्या तंतुमय भाजीत लोह आणि क्षार मोठ्या प्रमाणात असतात लाल तिखट कढीपत्ता टाकून केलेली सोडण्याच्या कोंबाची भाजी अप्रतिम लागते.
शेवगा: या वनस्पतीच्या पानाफुलांनी शेंगांच्या भाजीसाठी उपयोग केला जातो शेवग्याला लाल पांढरा आणि नसेल काळपट अशा रंगाची फुले येतात त्यापैकी लाल फुले येणाऱ्या शेवगा आरोग्य दृष्टी गुणकारी समजला जातो फुलांची भाजी खाल्ल्याने येणारा उग्र दर्प जडपणा कमी होतो मात्र जास्त घाम येणे चक्कर येणे नाकातून रक्त अशी लक्षणे दिसतात तेव्हा या फुलांची भाजी खाऊ नये.
अंबाडी: अंबाडीची कोवळी पाने आणि फळांची भाजी करण्याचा प्रघात आहे आळूची भाजी करताना अंबाडीचे फळ तसेच पाण्याचा वापर केला जातो फळांपासून सासव किंवा कुठल्याही भाषेत आंबटपणा आणण्यासाठी उपयोग केला जातो.
बाफळी: हे एक प्रकारचे बी असते आणि कुळीथ यासारखे चपटे असते ही भाजी चोरून उघडून त्यात हरभऱ्याची डाळ घालून बनवले जाते या भाजीच्या फळांच्या तेलही काढतात पोटदुखी जंत होणे यासारख्या त्रासांमध्ये या भाजीचे सेवन करतात.
आघाडा: या भाजीमध्ये अ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आढळते ही भाजी पाचक असून मुतखडा मुळव्याध व पोट दुखीवर गुणकारी आहे आघाडा रक्त वर्धक आहे व हाडे बळकट होण्यासाठी तो खाल्ला जातो.


१४/८/१९

आगीबाबत नागरिकांनीही सजग होणे गरजेचे

आगीबाबत नागरिकांनीही सजग होणे गरजेचे
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
मुंबईत आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. लाख मोलाचे जीव जाताहेत, आणि करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. तरीही अग्नि सुरक्षा कायद्याच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र सध्या मुंबईत दिसून येत आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्नी सुरक्षा कायद्यानुसार कठोर नियम करण्यात आले आहेत. मात्र, त्याचे उल्लंघन होत असल्याचे चित्र समोर येत आहे. उपहार गृहे आणि शॉपिंग सेंटरमध्ये फक्त पैशांसाठी जीवाशी खेळ केल्याचे एकूणच चित्र समोर येत आहे.
प्रत्येक ठिकाणी अग्निप्रतिबंधक यंत्रणा कुचकामी ठरत आहे. बहुमजली इमारतींमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा असणे बंधनकारक आहे. या यंत्रणेची चाचणी दर सहा महिन्यांनी करणे आवश्यक आहे. तसेच ही यंत्रणा वापरण्याचा अनुभव असलेले सुरक्षारक्षक असणे बंधनकारक आहे. मात्र, यातील एकही नियम पाळला जात नाही. अनेक वेळा इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणा ही योग्य पद्धतीने काम करत नाही बहुमजली इमारती उपहारगृहात आगीच्या वेळी बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र असणे बंधनकारक आहे यात कोणत्याही प्रकारचा अडथळा असू नये असा नियम आहे. पण, अनेक वेळा यामध्ये मोठ्या प्रमाणात भंगार अडगळीचे सामान आणून ठेवले जात आहे परिणामी जिन्याचा मार्ग अडवला जातो.
उपहारगृहातील सिलिंडर प्रामुख्याने इमारतीच्या बाहेरच्या बाजूला असावेत, पाईप मधून स्वयंपाक घरातील गॅस पुरवठा जावा असा नियम आहे. मात्र, अनेकदा सिलेंडर स्वयंपाक घरातच असतात. सिलेंडरच्या साठयानुसार कशा प्रकारची प्रतिबंधक यंत्रणा असावी याचेही नियम असतात. मात्र, आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध असल्यास ती कशी हाताळावी याचे ज्ञान तेथे असलेल्या व्यक्तींना नसते. उपहार गृह आणि खानावळीच्या स्वयंपाक घरात खाद्य पदार्थ बनविणाऱ्या कामगारांना झोपायला देऊ नये. असा पालिकेचा नियम आहे. त्याच नियमावर परवानगी दिली जाते. मात्र, बऱ्याचशा छोट्या-मोठया कारखान्यात लागलेल्या आगीत याआधी तो नियम पाळला गेला नाही. परिणामी, काम करणाऱ्या कामगारांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. सिलेंडर, डिझेल, खाद्यतेल आदी ज्वलनशील साहित्याचा साठा असलेल्या कारखान्यात कामगार झोपत असल्याचेही याआधी उघड झालेले आहे.
अग्निशमन दल आणि महापालिका प्रशासन सर्व संबंधित अशा दुर्घटनांना जबाबदार आहेत. पण, केवळ  या सर्वांना जबाबदार धरून आगीचा प्रश्न सुटणार नाही, तर यावर कोणता उपाय केला पाहिजे याचाही सर्वंकष विचार होणे गरजेचे आहे. रहिवासी किंवा नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी आधीच्या दुर्घटना टाळण्यासाठीच्या सुरक्षा उपायांबाबतची माहिती रतोरस्ती लावले जाणारे फलक, वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाणी या माध्यमातून सरकारी जाहिराती, इलेक्ट्रिक उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांच्या जाहिराती अशी माहिती एकत्रित करून नागरिकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. इलेक्ट्रिकल उपकरण यांविषयी कोणती काळजी घ्यायची, आयएसआय मार्क उपकरणांवर कुठे असतो? तो कसा पाहायचा? इलेक्ट्रिशन किंवा वायरमन जेव्हा नवा असतो तेव्हा त्याच्याकडे आवश्यक तो परवाना आहे की नाही, याची खात्री कशी करून घ्यायची? हा परवाना दिसतो कसा? इमारतीत सदनिका घेताना अग्निरोधक उपकरण कोणती आणि कुठे बसवली जातात? तसेच इमारतीला रेफ्युज फ्लोअर आहे की नाही, तो किती उंचीचा असतो? अग्नि सुरक्षा यंत्रणा कोणत्या असतात? त्या कशा वापरायच्या? आपल्या ऑफिसमध्ये अग्नि सुरक्षा यंत्रणा बसवलेली आहे, किंवा नाही आणि आपण खाण्यासाठी जात असलेल्या हॉटेलला एकच दरवाजा आहे का, तिथे अग्नि सुरक्षा यंत्रणा बसविल्याचा बोर्ड दर्शनी भागात आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टींबाबत सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून माहिती लोकांपर्यंत पोचविणे गरजेचे आहे. ती एकदा का मनावर बिंबवली गेली की मग नागरिकांमध्ये या विषयाबद्दल गांभीर्य निर्माण होईल आणि त्यातून या गोष्टींबाबत काळजी कोणती घ्यायची हे कळलं तर लोक आवश्यक ती खबरदारी नक्कीच घेतील.
एकदा का नागरिकांमध्ये जनजागृती झाली की, अग्निसुरक्षेबाबत सजगता येईल आणि मग प्रसारमाध्यमे आणि नागरिकांच्या वाढलेल्या दबावापुढे सरकार आणि बिल्डर, पबमालक, हॉटेलमालक, इलेक्ट्रिकल कंत्राटदार यांना अग्निसुरक्षेबाबतच्या गोष्टींची पूर्तता करणे भाग पडेल. 

१/८/१९

पवित्र श्रावण महिना

पवित्र श्रावण महिना
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
हिंदू पंचांगाप्रमाणे देवशयनी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. म्हणजे आषाढी ते कार्तिकी एकादशी ह्या चार महिन्यांच्या काळात देव निद्रिस्त असतात, असे मानले जाते. त्यामुळे ह्या काळात पृथ्वीवरील सर्व बऱ्या वाईट घटनांचा परिणाम मानवी जीवनावर होत असताना नेहमीप्रमाणे देवाच्या कृपेचे अखंड छत्र आपल्यावर राहावे म्हणून या काळात जास्तीत जास्त पूजा-पाठ, जप, प्रवचने, कीर्तने, भागवत सप्ताह व पारायणे केली जातात. या योगे देवाच्या कृपेचे छत्र आपल्या डोक्यावर कायम ठेवण्याचाच प्रयत्न जणू  प्रत्येकजण करत असतो. त्यामुळे या महिन्यात जास्तीत जास्त मानव सदाचरणी रहाण्याचा प्रयत्न करतो.
हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावण हा अत्यंत पवित्र असा महिना मानण्यात येतो. गटारी अमावस्येला मनाचा मलीनपणा गटारात (घाणीत) सोडून द्यायचा आणि दिव्याच्या अवसेला जसे दिवे घासून पुसून स्वच्छ करतात तसेच मनही लख्ख करावे. अशा स्वच्छ आणि स्वात्विक मनाचेच प्रतिबिंब श्रावण महिन्यात पडते. श्रावणी सोमवार प्रदोष हे सर्व पर्वकाळ ह्याच काळात येतात. सर्व देवदेवतांमध्ये श्रेष्ठ असणारा भगवान शिव त्याला प्रसन्न करण्यासाठीच जणू हा महिना आहे असे वाटते. म्हणून प्रत्येक श्रावणी सोमवारी शंकराला शिवामूठ वाहण्याचा प्रघात आहे.
शंकराला पहिल्या सोमवारी तांदळाची मूठ, दुसऱ्या सोमवारी तिळाची, तिसऱ्या सोमवारी मुगाची मुठ, चौथ्याला जवस आणि जर पाचवा सोमवार आला असेल तर सातूची मूठ शंकराला अर्पण केली जाते. यात अध्यात्मिक पूजेचे समाधान आहेच. पण, पूर्वी आपल्याच शेतात पिकवलेल्या धान्याचा काही भाग देवाची कृतज्ञता म्हणून देवाला अर्पण करण्याची प्रवृत्ती आहे. त्या अर्पिलेल्या धान्यातून ते त्या देवालयाच्या ब्राह्मण, पुजारी, गुरव इत्यादींच्या चरित्राचेही साधन होते म्हणून यात मानवताही मानवताही आली आहे.
या काळात जास्तीत जास्त उपवास असल्याचे कारण देवाच्या सानिध्यात वास करायला मिळावा हे आहेच. पण, कमीतकमी आहाराने आपला जठराग्नी जो या काळात मंद झालेला असतो त्यालाही जास्त काम करावयास लागू नये हाही त्यामागील शास्त्रीय अर्थ आहे. पावसाळ्यात पचनाच्या तक्रारी वाढतात. हवामानामुळे शरीरच्या हालचाली कमी होण्याने तसेच जाठराग्नी प्रदिप्त झाला नसल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण, पावसाचे गढूळ पाणी यामुळे या काळात पोटाचे विकार वाढतात. त्यावर लंघन किंवा अल्प सात्विक आहार हे प्रभावी औषध आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे श्रावणी सोमवारच्या निमित्ताने का होईना तोंडाचे खाण्याचे काम कमी होऊन ते हरी नामाचा जप करण्यास लागते असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
जिभेचे चोचले पुरवण्याचे काम कमी झाल्यामुळे साहजिकच या दिवसांत घरातील महिलांना थोडा आराम मिळतो. व ती सुद्धा आपल्या मैत्रिणींसोबत नटून-थटून देवाच्या पूजेला मंगळागौरीची पत्री गोळा करायला जाऊ शकते. फुलांची आरास करून प्रसन्न अशा रांगोळ्यांनी वातावरण निर्मिती तर होतेच पण त्यातून तिलाही सृजनाच्या निर्मितीचा आनंद मिळतो व तीही प्रसन्न होते. मंगळागौरीच्या निमित्ताने सगळ्या माहेरवाशिणी एकत्र जमतात. यथासांग महादेवाची पूजा करतात व जसा उमेने भोळ्या सांबाला आपल्याशी लग्न करायला प्रवृत्त केले व त्याबरोबर सुखाने कैलासावर राज्य केले तशाच ह्या नवविवाहिता आपल्या पतीसोबत सुखी संसाराच्या स्वप्नात मग्न होत मनाच्या मोठेपणाचे जोखड काही वेळ बाजूला ठेवून मंगळागौर जागवायला सगळ्याजणी तयार असतात. त्या खेळतात, गाणी म्हणतात, फेर धरतात व मनातल्या भावना गाण्यांतून व्यक्त करून मोकळ्या मनाने पुढच्या दिवसांना, संकटांना सामोऱ्या जायला सज्ज होतात. अगदी सगळ्या सासुरवाशिणी ह्या श्रावणातील सणांची वाट बघत असतात.


१२/७/१९

मी तू पण गेले वाया, भेटता पंढरीच्या राया

मी तू पण गेले वाया, भेटता पंढरीच्या राया
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
आषाढी वारी म्हणजे, चैतन्याचा महामेळा, वारी म्हणजे विठूरायाच्या दर्शनाची लागलेली ओढ. वारी म्हणजे अमाप उत्साह.... 'ज्ञानोबा, माऊली तुकाराम... बोला पुंडलिका वरदे हरी विठठल. श्री ज्ञानदेव तुकाराम' या जयघोषाने सगळा आसमंत दुमदुमून निघतो. विठूरायाच्या दर्शनासाठी आतूर झालेला वारकरी आषाढी एकादशीला भक्तीच्या जल्लोषात न्हाऊन निघतो आणि वर्षभरासाठीची अखंड ऊर्जा आपल्यासोबत घेऊन निघतो.
महिनाभर आधीपासूनच तयारी झालेला हा सोहळा म्हणजे भक्तीचा महापूरच असतो. २१-२२ दिवसांचा प्रवास करून आल्यानंतर विठठलाच्या दर्शनाने या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहायला मिळणं म्हणजे परमोच्च आनंद मिळाल्याचा भाव जसा मनात येतो. तशी ती अवस्था असते. 
भाग गेला क्षीण गेला।
अवघा झाला आनंद।।
हीच त्यावेळी वारकऱ्यांची भावना असते. खरेतर आषाढी वारी आपल्यामध्ये असलेलं मीपण काढून टाकते. 'मी तू पण गेले वाया, भेटता पंढरीच्या राया' असं संतांनी म्हटलं आहे. वारी म्हणजे जीवनातल्या व्यावहारिक शिक्षणाची खरी पंढरी आहे. इथं वावरताना आपल्यातली सांघिक भावना जागृत होते. त्याचा सहवास पुढे वर्षभर आपल्यात राहतो. त्यामुळे वास्तवातलं जीवन जगत असताना आपल्याला अनेक गोष्टीत याचा वापर करताना कितीतरी फायदा होतो. पांडुरंगाची भेट आणि वारीचा सहवास यातून जीवनातलं अमूल्य शिक्षण आणि शिदोरी आपल्या पदरात पडते. एवढंच नाही तर, एकमेकांना सोबत घेऊन जाण्याची सवय आपल्याला जडते. वारीत ८० वर्षांच्या आजी-आजोबांपासून ते ५ वर्षांच्या मुलांपर्यंत सगळेचजण एकमेकांना 'माऊली' म्हणतात. कारण, वारकरी एकमेकांना माऊलीच्या रूपातच पाहतो आणि मुखातून माऊलीचंच नाव घेतो. यातून आपापसातली उच्च-नीचता गळून पडते. वारी तुमच्या आमच्यातला भेदभाव नष्ट करते.
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि विशेष म्हणजे पाश्चिमात्यांनासुद्धा या पंढरीच्या विठुरायाने वेड लावले आहे. समस्त भारतातील विविध संप्रदायापेक्षा वारकरी संप्रदाय निश्चितच वेगळा ठरतो. भक्ती हे अंतिम ध्येय या संप्रदायाने मानले आहे. ज्ञानयुक्त व सदाचरणयुक्त भक्ती हे या संप्रदायाचे वैषिश्टय आहे. त्यामुळे वारीचं व ववारकऱ्यांचे असाधारणत्व सहजच प्रत्ययास येते. विठूनामाचा गजर करत लहान थोर वारकरी आषाढात पालख्या, दिंडयासहित पंढरीच्या दिशेने धाव घेतात. 
विठठल विठठल गरजत ।
जाऊ पंढरीत टाळ मृदुंग वाजवीत ।
न्हाऊ गाऊ चंद्रभागेत
ठेवूनिया कर कटावर ।
वाट पाहतो माझा पांडुरंग
कसा होईल हो विसर ।
सदा विठू नामात आम्ही दंग
अशा विलक्षण आंतरिक ओढीने वारकरी पंढरीची वाट चालतात. जणू हा भगवंत आपल्या भक्तीची आतुरतेने वाट पाहतोय. इतक्या उत्कटतेने हा वारकरी आपल्या लाडक्या देवतेच्या भेटीसाठी पंढरीत दाखल होतो. पालखी, रिंगण, झिम्मा, फुगडी इत्यादी खेळातून भक्तीची उधळण करीत त्यात समरस होतो. भौतिक सुखःदुखाचा विचार न करता भक्तीचा खेळ खेळतो. भेदाभेद भ्रम अमंगळ हे तो जाणतो. समत्वाची आणि समन्वयाची वारी घराघरात पोहचवितो. हा वारकरी साधासुधा नाही. तर 'देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो' अशी संत नामदेवांची दृढ भक्ती अनुसरणारा आहे आणि 'अहंकाराचा वारा न लागो राजसा' या वृत्तीने वर्तन करणारा आहे. 
आषाढी वारी म्हणजे भक्ती, शक्ती तृप्तीचा महोत्सव आहे. त्यात कुठेही डामडौल नाही. नटणं, मुरडणं नाही. सजणं-धजणं नाही. तुळशी, अबीर, बुक्का, गोपीचंद, लाहया व अंतःकरणयुक्त भक्ती इतकीच त्याची साधने आहेत. वारकरी संप्रदायातील भक्तीचा साधेपणा व सच्चेपणा अद्वितीय आनंदाची पर्वणी देणारा आहे. आणि हे सर्व देणारे संत वारकरी आहेत. पंढरीची वारी करणाÚया वारकऱ्यांची मुख्य ओळख म्हणजे तुळषीमाळ. ही माळ धारण करणे म्हणजे लाडक्या विठूरायाच्या नावानं गळयात घातलेलं मंगळसूत्र. वारकरी नित्य कपाळी गोपीचंदनाचा टिळा व बुक्का लावतो. हा टिळा म्हणजे विठुरायाच्या नावानं कपाळी रेखलेला सौभाग्यतिलक. वारकऱ्यांच्या खांद्यावर असलेली भगवी ध्वजा म्हणजे सदाचाराची आठवण देणारी सांस्कृतिक निषाणी. शरीरावर धारण केलेली ही सारी प्रतीकं, लक्षणं संस्कृतीची आठवण करून देणारी आहेत. अध्यात्मिक वारीत मनाच्या शिस्तीचं, व्यवस्थापनाचं मौलिक शिक्षण मिळतं. मनाच्या शिक्षणाच्या या संस्कारक्षम वाटेवर संस्कृतीचं रक्षण करणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींची भेट होते. तुकोबारायांच्या अभंगाच्या सहवासात जीवनातील वाटा पवित्र होऊन जातात. वारीच्या आध्यात्मिक वाटेवर सांस्कृतिक धनाचा खजिना हाती येतो. 'वाट धरिता हरिची। चिंता हारे संसाराची।' याची प्रचिती येते. जगावेगळया पंढरीच्या या आनंदवारीत आपल्या संस्कृतीचं थेट दर्षन घडतं. संस्कृतिमय, देवमय झालेल्या आपल्या मनात सांस्कृतिक लेण्याच्या दर्शनामुळे आत्मोद्धाराची वाट सापडते. 'अंतर्मुखी सदा सुखी' याचा अर्थ समजतो. जीवन ही आंतरिक तीर्थयात्रा बनून जाते. प्रत्येक मराठी माणसाने मनानं एकदा तरी वारीतील 'देवाच्या द्वारी' क्षणभर विसावा घेऊन, मुक्तीच्या आनंदाचा अनुभव घेऊन अध्यात्मिक जीवन सत्कारणी लावायला हवे.

वारीत सहभागी झालेल्या दिंड्या 


पंढरपुरात तुळशीच्या माळा विकणारी महिला वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांची गर्दी 
पंढरपूरच्या वारीत प्रसाद विक्री 

वारकरी 

१/७/१९

रॅगिंगला आळा घाला

-दादासाहेब येंधे(dyendhe1979@gmail.com)

मुंबईतील नायर रूग्णालयात तीन वरिष्ठ महिला डाॅक्टरांच्या रॅगिंगला कंटाळून डाॅ. पायल तडवी या पदव्युत्तर विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. तारूण्याला पोखरून टाकणारी ही भीषण कीड किती वाढत चालली आहेयाचे ते द्योतक आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
नायर रूग्णालयातील डाॅ. पायल तडवींची आत्महत्या ही सर्वसाधारण नाही. किंबहुना ती आत्महत्या नव्हे तर हत्याच आहे. ती सुद्धा महिला डाॅक्टरांनी केलेली. डाॅ. तडवींचा छळ सुरू होता.  तीन सहकारी महिलांकडून. त्यांची नावेही प्रसिद्ध झालीत. मुंबईतील आग्रीपाडा पोलीसांकडून त्या तीन महिला डाॅक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. डाॅ. पायल तडवी हिस सहकारी तीन महिला तिला सतत त्रास देत होत्या. तिच्या अभ्यास आणि कामात अडथळे आणत होत्या. डाॅ. तडवी ही कनिष्ठ जातीय. मागासगर्वीय. तिच्या जातीवरूनच तिचे मानसिक खच्चीकरण केले जात होते. यालाच रॅगिंग असे म्हणतात. जात नाही ती जात. असे म्हटले जाते. जातीभेदाची भीषणता दर्शवण्यासाठी ही उक्ती वापरण्यात येते. यात काही खोटे नाही. जातीभेद हा नष्ट  होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. इतका की डाॅक्टरसारख्या पवित्र पेशालाही जातीयतेने मतिभ्रष्ट केले आहे.
महाविद्यालयात येणारे विद्यार्थी हे आपल्या स्वप्नांचे, अपेक्षांचे ओझे घेऊनच प्रवेश करत असतात. इथे त्यांना वरिष्ठ आणि कनिष्ठ अर्थात सिनिअर आणि ज्युनिय अशा दोन वर्गांचा सामना करावा लागतो. परंपरागत चालत आलेल्या तथाकथित रॅगिंगचा रथ तो पुढे चालवत असतो. सिनिअर विद्याथ्र्यांनी नवीन विद्याथ्र्यांची ओळख विचारण्यापासून सुरूवात झालेल्या या गोष्टीचा शेवट मात्र किती टोकाचा असू शकतो याचा अनुभव अख्खा महाराष्ट्र घेतोय. रॅगिंगची सुरूवात ही अगदी लहान-सहान गोष्टींपासून  होते. समोरच्याचं म्हणणं ऐकून न घेणं, मनात राग धरणं, मस्करी केली म्हणून जातीवाचक शिवीगाळ. या गोष्टी कधी-कधी एवढं भीषण रूप धारण करतात की, शेवटी विद्यार्थी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलतात. आपला दरारा दाखविण्यासाठी, ज्युनिअर विद्याथ्र्यांना भीती दाखविण्यासाठी रॅगिंगसारख्या चुकीच्या गोष्टींचा  अवलंब केला जातो. जोे कायद्याने गुन्हा ठरतो.
       रॅगिंगच्या विरूद्ध महाराष्ट्र शासनाने वीस वर्षांपूर्वी कायदा करूनही व रॅगिंगविरूद्ध समिती आणि अन्य उपाययोजना असतानाही रॅगिंगच्या घटना विविध व्यवसायिक प्रशिक्षण संस्थांमधून उघडकीस आल्याचे दिसते. जेवढया घटना घडतात त्यातील अतिषय थोडया घटनांबाबत वाच्यता होते व त्यातील फारच थोडया घटनांमध्ये कारवाई होते. आपल्या कुटुंबाची बेअब्रु होऊ नये म्हणून भीतीने व व्यवसायातील अन्य लोकांनी आपल्याला बहिष्कृत करू नये या भावनेने नवीन विद्यार्थी-विद्यार्थींनी त्याविरूद्ध तक्रार करत नाहीत. कारण कुणालाही पंगा घ्यायचा नसतो. तक्रार करूनही पुन्हा इथेच राहायचं आहे. छळात दुप्पट वाढ होईल. ही भिती त्यांना वाटत असते.
       राज्यातच नव्हे तर देषभरात रॅगिंगच्या घटनांची संख्या पाहिली तर समाजाला लागलेली हि एक किड असल्याचे समोर येते. कारण याचे मूळ हे शिक्षणासारख्या पवित्र आणि अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात रूजलेले असल्यामुळे याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाची आहे. यासाठी प्रत्येक घटकांनी चिंतन करण्याची गरज आहे. रॅगिंगसाठीची मानसिकता तयार होण्यास कोणकोणत्या प्रवृत्ती, कौटुंबिक, सामाजिक आणि सामूहिक व्यवस्था कारणीभूत असतात याचा नव्याने विचार होण्याची गरज आहे. महाविद्यालयांमध्ये विद्याथ्र्यांकडून होणारे रॅगिंग बंद व्हावे यासाठी महाविद्यालयांच्या स्तरांवर समित्या नेमणे.  विद्यार्थ्यांना प्रवेश देताना  त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणे गरजेचे आहे.
       रॅगिंग किंवा लैंगिक त्रास किंवा अनुसूचित जाती जमातींच्या नावाखाली अत्याचार, जात व धर्माच्या नावाखाली त्रास देणे, हिणवणे हा कायदेशीर गुन्हा आहे व ते महाविद्यालयांमध्ये खपवून घेतले जाणार नाहीत हे विद्याथ्र्यांना प्रवेश देताना स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे. हाॅस्टेलमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये केवळ सीसीटिव्ही लावून रॅगिंगच्या घटना थांबणार नाहीत तर त्यासाठी हाॅस्टेल प्रमुख, सल्लागार, शिक्षक यांनी नवीन विद्यार्थ्यांशी वारंवार संपर्क करून त्यांना होणाÚया त्रासाबददल सहानुभूतीने चौकशी करणे आणि त्याची कडक अंमलबजावणी गरजेचे आहे. महाविद्यालयांमधील प्राध्यापक, शिक्षक,  वरिष्ठ विद्यार्थी नवीन प्रवेश केलेले ज्युनियर विद्यार्थी यांच्यात वारंवार चर्चा, सभा, स्पर्धा आयोजित करून रॅगिंगच्या घटना घडणार नाहीत असे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.
२१/६/१९

योगाने साधा मनःशांती

योगाने साधा मनःशांती
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

आरोग्यतज्ञांच्या मते, तणाव आणि मानसिक रोग यांसारखे आजार दूर करण्यासाठी योगा हा एक उत्तम उपाय आहे. योगामुळे शरीर स्वस्थ राहते आणि त्याचबरोबर तणावासंबंधित हाॅर्नाेमल नियंत्रित करण्यासदेखील मदत करतो. हे आता सिद्ध होत आहे.
उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्राॅल आणि लठठपणा यांसारख्या समस्येवर योगा हा उपाय आहे. योगा हा आयुष्य जगण्याचा एक चांगला मार्ग आहे. असे तज्ञांचे मत आहे. एखादा रोग झाल्यानंतर त्याच्यापासून सुटका होण्यासाठी लोक औषधे खावीत की योगा करावा अशा द्विधा मनःस्थितीत असतात. पण, लोकांनी हे समजणे गरजेचे आहे की, मानवाच्या आयुष्यातील प्रत्येक रोगावर योगा हे एक उत्तम औषध आहे. बऱ्याच जणांना रोग हे त्यांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे होतात. त्यावर योगा हा एकच उपाय आहे. योगामुळे तुमचे जीवन हे आनंदी आणि सुखी राहिल्यामुळे रोग होण्याचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होते.
शरीर व मनाच्या शुद्धीचे साधन म्हणजे ‘प्राणायम’ प्राणाचा आयाम करणे म्हणजेच श्वास लांबविण्याची क्रिया. जास्तीत जास्त श्वास लांबविणे म्हणजेच श्वासावर नियंत्रण आणणे होय. प्राण म्हणजे वायू. अर्थात, प्राणाची व्याप्ती मोठी म्हणून त्याचा अर्थ प्राणशक्ती होय. प्राणशक्तीचा संबंध मनाशी येतो. मनाचा संबंध हा बुद्धीशी येतो. बुद्धीचा संबंध आत्म्याशी येतो व आत्म्याचा संबंध हा परमात्म्याशी येत असतो. प्राणायाम म्हणजे लयबद्ध पद्धतीने केलेले श्वसन.
७ ते ७० वर्षांपर्यंतच्या स्त्री-पुरुषांना प्राणायाम क्रिया करण्यास हरकत नसते. या आयुर्काळात रक्ताभिसरण, रक्तपुरवठा निसर्गतः चालते. प्राणायाम करणारे रागलोभविरहीत, सदैव प्रसन्न असणारे, शरीर व मनाने पवित्र जपणारे आणि प्राणायामाचा अभ्यास करायला उत्सुक असे हवेत. प्राणायाम शिकायला आरंभण्यापूर्वी पूर्वतयारीसाठी पदमासन, सिद्धासन अशी आसने अभ्यासावीत. त्यामुळे शरीरातल्या नाडया मृदू बनतात. ही आसने दोनदोन वा तीनतीन तास एकाठिकाणी स्थिर बसण्याची तयारी करतात. ती सिद्ध झाल्यावरच प्राणायामाभ्यास करायला हवा.प्राणायाम जिथे करायचा ती जागा शांत, पवित्र, शुद्ध वातावरण असलेली हवी. तिथे जोरदार वारा वेगाने वाहणारा नसावा. यासाठीच उघडया जागेत, माळावर कधीही प्राणायाम करू नये. जोरदार हवेमुळे घाम वाळविला जातो. रंध्राबाहेर तो येत नाही. असं होण अयोग्य आहे. घाम शरीराबाहेर यायलाच हवा. तसा तो येत नसेल तर नाडी शुद्ध नाही, हे नक्की.
प्राणायाम दिवसातून दोनदा करावा. काही प्राचीन योगग्रंथात दुपार, सायंकाळ आणि मध्यरात्री तो करावा असे लिहिले आहे. एका वेळी दहा प्राणायामांनी आरंभ करून नंतर दैनंदिन पाच आवृत्ती वाढ असा क्रम ठेवला तर सहा तासांत ३२० प्राणायाम संख्या होईल. पण इतका वेळ आहे कुणाकडे? तेव्हा उपलब्ध वेळ, शरीरावस्था, आरोग्य यांचा मेळ घालून मगच अभ्यासाची मर्यादा ठरवावी. सर्वदा अनुभवी योगाभ्यासाकडून मार्गदर्शन  घेत राहावे.
दोन वेळा प्राणायाम करणाऱ्यांनी सायंकाळी शरीर थकले असता, दिवसभरात अतिकष्ट  झाले असल्यास रात्रीचा अभ्यास आटोक्यात करावा. अन्यथा फुफफुसांमध्ये बिघाड होऊन त्रास होऊ शकतो. अजीर्ण असणाऱ्यांनीही हीच काळजी घ्यावी. जेवणापूर्वी ३-४ तासांपूर्वी प्राणायाम करू नये. आहार हलका ठेवावा. जड पदार्थ टाळावेत. तापटपणा वाढविणारे, आळस आणणारे अन्न सेवन करू नये. सात्विक आहार म्हणजे वरण-चपाती, मुगाची खिचडी, पालेभाज्या, दूध, तूप, फळे, सुकामेवा असे पदार्थ भोजनात ठेवावेत.पालघर येथे पोलीस दल योगा करताना१३/६/१९

प्रत्येकाने सार्वजनिक वाहनांचा वापर करावा

प्रत्येकाने सार्वजनिक वाहनाचा वापर करावा
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
मुंबईतील वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून शहरातील वाहनांची वाढती संख्या पार्किंगच्या समस्येत भर घालत आहे. वास्तविक, मुंबईत रस्त्यांचे प्रमाण कमी आहे. शहरात केवळ दोन हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. मुळात रस्त्यांच्या लांबीत वाढ करणे शक्य नाही. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत वाढ करणे गरजेचे आहे. सध्या शहरात मेट्रोचे जाळे विणण्याचे काम सुरू आहे; मात्र आतापर्यंत वेगवेगळ्या भागात सुरू असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. खरेतर नागरिकांनीदेखील खाजगी वाहनांचा कमीत कमी वापर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 
काही दिवसांपूर्वी टीव्ही वर एक जाहीरात दिसत होती. एक पत्नी आपल्या पतीकडे डायमंडची मागणी करते. तुमची बचत होत असल्याने ती गिफ्ट मागते. मग बचत कशी झाली, असे पती विचारतो. तेव्हा ती सांगते तुम्ही मित्र एकाच वाहने जात असल्याने पेट्रोलसाठी होणारा खर्च वाचतो. त्यामुळे तुमच्या पैशांची बचत होत असल्याचे ती सांगते. पेट्रोल आयातीवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. तर दुसऱ्या बाजूला वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडी सह प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण होत आहे. ही जाहिरात खूपच काही सांगून जाते. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात खाजगी वाहनांचा वापर कमी केल्यास वाहनांची गर्दी कमी होईल. यासह पेट्रोलची देखील बचत होईल.
मुंबईत कितीही प्रयत्न झाले तरी जोपर्यंत नवीन वाहन येणे थांबत नाही तोपर्यंत मुंबईतील पार्किंग आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही. बाहेरील देशांमधल्या नवीन वाहन खरेदी करायचे असल्यास तुम्ही राहत असलेल्या सोसायटी किंवा नोकरी करीत असलेल्या ऑफिसचे पार्किंग उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक आहे. असाच नियम मुंबईतही लागू करणे गरजेचे आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत दारू पाठोपाठ वाहन विक्रीतून सर्वात जास्त महसूल जमा होतो. प्रत्येक वर्षांला संदेश हजार कोटी महसूल वाहन विक्री आणि नोंदणीतून सरकारला मिळतो. त्यामुळे नवीन वाहन खरेदी थांबविणे सरकारला परवडणारे नाही. 
मुंबईसारख्या शहरात दररोज सरासरी पन्नास किलोमीटर प्रवास होत असतो. यासाठी दररोज दोन ते तीन लिटर पेट्रोल किंवा डिझेल, सीएनजी सारख्या इंधनाचा खर्च होतो. म्हणजे इंधन खर्च दोनशे आणि टोल तसेच गाडीचा मेंटेनन्स खर्च, रोजचा पार्किंग खर्च याचा विचार केला तर सरासरी आपल्या वाहनावर दररोज ३०० रुपये खर्च होतो. त्याच अंतरासाठी सार्वजनिक वाहनांचा बस, रिक्षा, टॅक्सी, लोकलचा मार्ग अवलंबला तर दिवसाला ५० रुपयेही खर्च होत नाही. मुंबईत नाक्यानाक्यांवर या वाहनांची उपलब्धता असते. रिक्षा, टॅक्सी बऱ्याच मार्गांवर शेअरमध्ये उपलब्ध असल्याने स्टेशन ते ऑफिस फक्त दहा रुपयांत प्रवास करता येतो. पण, जर का आपण स्वतःची गाडी असली की ती रिकामी घेऊन जातो. कारमधील अन्य सीट रिकाम्या असतात. म्हणजे तीन ते चार माणसांचा खर्च आपण आपल्या एकटयावरच करत असतो. याशिवाय, वाहतूक कोंडी, अन्य तणाव याचा त्रास खूप सहन करावा लागतो. बस आणि रेल्वेच्या गर्दीबाबत मनात भीती बाळगली जाते. पण, ती अनाठायी आहे. बस आणि रेल्वेच्या इतक्या फेऱ्या सातत्याने होत असतात की, काही ठराविक वेळ सोडली तर कोणालाही सहजपणे त्यात प्रवास करणे शक्य होईल. विशेष बाब म्हणजे रेल्वे प्रवासी एकमेकांना सहकार्य करण्यात तत्पर असतात. एखादी महिला किंवा ज्येष्ठ व्यक्ती आली तर तिला आपली जागा रिकामी करून देण्याचे सौजन्य सगळेच दाखवितात.
सार्वजनिक ठिकाणी काम करणाऱ्यांनी सार्वजनिक वाहनांचा वापर करण्यावर भर दिला तर ३०टक्के वाहने कमी होतील. रस्त्यावरील कोंडी कमी होईल. दुसरीकडे खाजगी वाहनांचा वापर प्रत्येकवेळी करण्यात येत असल्याने एखाद्या ठिकाणी पार्किंग केल्यास पार्किंग सुविधा नसल्यास रस्त्यावरच वाहने उभी करावी लागतात. अशा वेळी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. त्यामुळे मुंबईत प्रत्येकवेळी वाहतूककोंडी होऊ नये यासाठी प्रत्येकाने खाजगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करावा. जेणेकरून, मुंबईत वाहतूक कोंडी होणार नाही. सार्वजनिक सेवा ही सर्वांसाठी आहे, सुरक्षित आहे मग स्वतः च्या वाहनासाठी आग्रह कशासाठी धरायचा? आपणच आपली मानसिकता बदलली तर पेट्रोल, डिझेलची बचत करू शकतो.


३/६/१९

घरातली स्त्री सुदृढ तर घर सुदृढ

घरातली स्त्री सुदृढ तर घर सुदृढ
-दादासाहेब येंधे (dyendhe@rediffmail.com)
मी बाई आहे सारखे सारखे आजारी पडून कसं चालेल?? माझ्या नवऱ्याला रोज सकाळी डबा कोण बनवून देणार? माझ्या लहान मुलाला कोण सांभाळणार..? अशी एकंदरीत विचारसरणी महिलांच्या मनात दडलेली असते. प्रत्येक महिलेला वाटत असते की, आपण आजारी पडायला नको. नाहीतर या सगळ्यांचे हाल होतील. आणि हेच कारण  अनारोग्याचे मूळ बनते. ती महिला वेळीच आरोग्य सेवेपर्यंत पोहोचत नाही, आणि केव्हा कोलमडून पडते याचे तिलाही भान राहत नाही. मग दोष द्यायचा तरी कोणाला?
स्वतःच्या आरोग्याकडे संपूर्ण दुर्लक्ष. सगळया स्त्रियांमध्ये आढळणारा हा एक समान गुण. गृहिणी स्वतः लक्ष देत नाही म्हटल्यावर घरातले इतरही तिची काळजी घेत नाही. आणि मग इथूनच सुरू झालेले आजार उतारवयापर्यंत आपले पाय घट्ट रोवतात.
आजकल धावपळीत प्रत्येकजण इतका अडकून गेला आहे की, आपल्या आरोग्यासाठी वेगळा वेळ देणे कठीण होऊन गेले आहे. प्रत्येकाने आपल्या शरीराचं आरोग्य राखणं हे आपलं कर्तव्य आहे नाहीतर आपलं मन कदापि खंबीर आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही, असा गौतम बुद्धांनी म्हटलंय.  या त्यांच्या संदेशाचे थोडे आत्मचिंतन केल्यावर लक्षात आले की, आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य बाबतही किती निष्काळजीपणा दाखवतो.
कधीकधी थोडी- थोडी दुखणारी पाठ, कंबर, डोकं याकडे आपण दुर्लक्ष करतो. तर कधी दिवसागणिक वाढत चाललेल्या या नॉर्मल आजाराकडे दुर्लक्ष करण्याची आपण चूक करतो. थोडक्यात आपण आपल्या शरीराला काय पाहिजे हे गृहीत धरत नाही. मग, एक दिवस हेच शरीर दुर्धर आजारपणामुळे बंड करुन उठते आणि आपले सगळे व्यवहार ठप्प करून टाकते. परिणामी, सक्तीने विश्रांती घेण्याशिवाय आपल्या समोर काहीच पर्याय उरत नाही. डॉक्टरांची अव्वाच्या सव्वा बिले पाहून तर चक्कर यायची वेळ येते. कामाच्या धबडग्यात आजकाल प्रत्येक वेळी थोडंसं काही दुखलं-खुपलं की लगेच डॉक्टरकडे धावता येत नाही. कधी- कधी वेळेअभावी तर कधी घरच्या घरी घरगुती उपचारांवर आपला अधिक विश्वास असल्याने आपण योग्य उपचारांना टाळण्याचाच प्रयत्न करतो.
बऱ्याचदा काही गंभीर आजारांचे निदान केवळ दुर्लक्ष झाल्यामुळे पुढे येते. काही प्रसंगात तर वेळही आपल्या हातून निघून गेलेली असते. स्त्रियांमध्ये वयोमानानुसार अनेक बदल घडत असतात. त्यामुळे योग्य वेळी सावधपणा दाखवून जरुरी असलेले उपचार करून घेण्यातच शहाणपण आहे. आपल्याकडे स्त्रियांमध्ये थायरॉईड, कर्करोग, स्तनांचा कर्करोग, मासिक पाळीच्या समस्या, लठ्ठपणा, रक्ताची कमतरता, आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता हे सर्वसाधारणपणे आढळणारे आजार आहेत. त्यातले काही जीवघेणेही आहेत. त्यामुळे ठराविक वेळेनंतर आणि विशेषतः लग्न करण्यापूर्वी सर्व वैद्यकीय चाचण्या करून घेण्याचा नियम प्रत्येकीने स्वतःहून स्वतः साठी  बनवून घ्यायला हवा.
घरातल्या इतर सदस्यांची काळजी घेताना आपली नोकरी संसार सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडेही आपण दुर्लक्ष करत आहोत हे महिलांनी विसरता कामा नये. घरातली स्त्री सुदृढ असेल तर घरही सुदृढ होईल.दूध उत्पादकांचा रोजगार वाढावा

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com) ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणाऱ्या दुग्धव्यवसायाची तर कोरोनामुळ...