११/५/२०

पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती

पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती ही गोष्ट आज घडीला सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हवी. पाणी म्हणजे जीवन असल्याने ते सर्वांना गरजेचे आहे. पण, याच पाण्याची उधळपट्टी न करता , पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी आज प्रत्येकानंच जलसाक्षर होणं गरजेचं आहे. यापुढील युद्धे ही पाण्यासाठी होतील असं भाकीत केलं जातंय. त्यामुळे सर्वात आधी या समस्येकडं आपण लक्ष दिलं पाहिजे.
आपल्याकडे पाण्याचा जास्त वापर हा शेतीसाठी होतो. पण, शेतीसाठी आता आपण पारंपरिक पद्धती सोडून ठिबक सिंचन तसेच तुषार सिंचन पद्धतीचा वापर केल्यास आपल्याकडे जेवढे पाणी उपलब्ध आहे त्या उपलब्ध पाण्यात आपण तीनपट पीक घेऊ शकतो, हे बऱ्याच उदाहरणांवरून सिद्ध झाले आहे. तरीही अजूनही बऱ्याच शेतकरी या नव्या पद्धतींचा वापर करताना दिसून येत नाहीत.
शेतीसोबतच आपल्याकडे पाण्याचा जास्त प्रमाणात वापर होतो तो उद्योगधंद्यांसाठी. येथे वापरलेलं पाणी बऱ्याच ठिकाणी वापर झाल्यानंतर पुन्हा नदीत सोडलं जातं. परिणामी, रासायनिक प्रक्रिया झालेले दूषित पाण्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होतो. अशा दूषित पाण्यामुळे नदीकाठी वसलेल्या शहरांमधील नागरिक बेजार झाले आहेत. पण जर या पाण्यावर शुद्धतेची प्रक्रिया करून ते पाणी इतर कशासाठी वापरता येते का ते पाहणे गरजेचे आहे.
साधारणपणे पिण्यासाठी आपण एक ग्लासभर पाणी घेतो. पण, बऱ्याचदा एखादा घोट पिऊन उरलेले पाणी आपण फेकून देतो. असं आपण घरी किंवा समारंभात नेहमी बघतो. हे प्रत्येक समारंभात वाया झालेलं पाणी आपण मोजले, तर एका वेळेला आपण किती पाणी वाया घालवितो, फेकून देतो याचा अंदाज येऊ शकतो. समजा, पाण्याची एक बाटली आपण विकत घेतो व नंतर उरलेले पाणी फेकून देतो तसे न करता तहानलेल्या व्यक्तीला ते पाणी दिल्यास त्याची तहान भागेल आणि पाणीही वाचेल.
पाण्याचा प्रत्येक थेंब हा महत्त्वाचा आहे, ते नागरिकांना कितीही ओरडून सांगितले तरी अजूनही त्यांच्या अंगवळणी पडत नाही. घरात २४ तास पाणी येते, म्हणून आपल्याकडून वारेमाप पाणी वापरले जाते. पण, एक दिवस पाणी आले नाही तर, तोंडचे पाणी पळते. मग, वर्षोनुवर्षे उन्हाळ्यात दुष्काळी परिस्थितीशी झुंजत असलेल्या, पाण्यासाठी वनवण फिरणाऱ्या लोकांना त्याचे महत्त्व किती असेल. म्हणून पाणी जपून वापरले पाहीजे, पाण्याचे योग्य नियोजन केले तर ज्यांना पाणी मिळत नाही, अशा नागरिकांचा पाण्याचा प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतो.
कित्येकदा आपल्या जवळपास नळ सुरू असल्याचा आवाज ऐकू येतो. त्या पाण्याचा आवाज ऐका. पाणी कुठे वाहतेय. याचा शोध घेऊन तो नळ बंद करा. विनाकारण कोणी पाणी वाया घालवत असेल तर त्याला पाण्याचे महत्त्व समजावून सांगा.


1 टिप्पणी:

  1. पिण्याच्या पाण्याची नासाडी खूप होते आपल्याकडे, ते कुठेतरी थांबायला हवे.

    उत्तर द्याहटवा

सायकल चालवा, आरोग्य मिळवा

  सायकल  चालती फिरती व्यायामशाळाच  -दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com) सायकल हे एक पुरातन, सुपरिचित, सुलभ, स्वस्त, आरोग्यवर्धक व समाजोप...