ऋषी कपूर : एक कसदार अभिनेता
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
'बॉबी' या चित्रपटाने जसे अल्पवयीन प्रेमप्रकरणांना समाजातील मुख्य विषयांच्या बरोबरीने चर्चेत आणले, तसे ऋषी कपूर यांचा चेहरा या अल्लड प्रेमाचे प्रतीक बनून फुलत राहिला. नीतू सिंग या सहअभिनेत्रीसह त्यांची जोडी पडद्यावर फुलली आणि आयुष्यातही. पहिल्या टप्प्यात ४० हून अधिक एकल नायकाचे चित्रपट, अनेक मल्टीस्टार चित्रपट यांतून चॉकलेट हिरोची कारकीर्द त्यांनी घडवली. त्यात 'लैला मजनू', 'रफू चक्कर', 'सरगम', 'कर्ज', 'प्रेमरोग', ,खेल खेल में', 'कभी कभी', 'हिना', 'नगीना' 'चांदणी', 'सागर', 'अमर अकबर अँथनी', 'हम किसीसे कम नही', 'दामिनी' अशी अनेक नावे घेता येतील. त्यांना याच काळात नवीन हीरोइनसाठी 'लकी चेहरा' मानले जात होते.
त्यांनी 'आ अब लौट चले' मध्ये दिग्दर्शनही आजमावून पाहिले आणि 'अग्निपथ' मध्ये नकारात्मक भूमिकाही केली. त्यांच्या 'द बॉडी' या प्रदर्शित झालेल्या शेवटच्या चित्रपटात, ते खुनाचे चौकशी करणारे पोलिस अधिकारी होते. त्याच दरम्यानच्या काळात 'मुल्क', 'कपूर अँड सन्स', 'दो दूनी चार' आदी चित्रपटांतून संस्मरणीय आणि त्यांच्या प्रतिमेशी कधीही जुळू न शकणाऱ्या आव्हानात्मक भूमिकाही त्यांनी केल्या. वयाच्या साठीत असताना ते समाज माध्यमात विशेषता ट्विटरवर अत्यंत सक्रिय होते. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता जे योग्य वाटते त्यावर ते बिनधास्तपणे व्यक्त होत होते. प्रियांका चोप्राच्या पार्टीला गर्दी करणाऱ्या परंतु विनोद खन्नाचा अंत्यसंस्काराला न येणाऱ्यांवर ताशेरे ओढणारे, मद्यपानाच्या शौकाबद्दलचे त्यांचे ट्विट वादग्रस्त ठरले. पण, त्याचे ट्विट्स परखड विचार दाखवणारेच ठरतात.
वर्ष १९७९ मध्ये आलेला ऋषी कपूर आणि जयाप्रदा या दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या हिंदी पदार्पणातच 'सरगम' या म्युझिकल हिट सिनेमाने तिकीट बारीवर केलेली कमाई आजही विक्रमी मानली जाते. १९८० मध्ये आलेल्या पुनर्जन्मावरील कथेवर आधारित 'कर्ज' हाही म्युझिकल हिट ठरला. तर १९८२ मध्ये विधवा पुनर्विवाहाच्या मध्यवर्ती कथेवरील 'प्रेमरोग' हा ऐंशीच्या दशकातला सर्वाधिक चर्चेचा सिनेमा ठरला. आपल्या प्रेयसीचे लग्न अन्यत्र ठरल्याचे समजल्यानंतर नायक तिच्या हवेलीमध्ये जातो, त्यावेळी नायिका (पद्मिनी कोल्हापूरे) 'ये गलिया, ये चौबारा, यहा आना ना दोबारा...' हे गीत गट असते. त्यावेळी जे भाव ऋषी कपूरच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतात, तिथेच त्याच्यातल्या एक कसदार अभिनेता आपल्या नजरेस पडतो.
पत्नी नीतू सिंग कपूरसोबत तब्बल १५ रोमँटिक सिनेमे करणाऱ्या ऋषी कपूर यांनी अमिताभ बच्चनसोबत 'कुली' (१९८३), कमल हसनसोबत 'सागर' (१८८५) आणि नुकतेच २०१२ साली हृतिक रोशनसोबत 'अग्निपथ' असे सिनेमे करत आपल्या प्रभावी अभिनयाचे दर्शन घडवले. श्रीदेवीसमवेत 'नगीना', 'चांदनी', मीनाक्षी शेषाद्रीसोबत 'दामिनी', माधुरी दीक्षितबरोबर 'साहिबां', रेखासोबत 'आझाद देश के गुलाम', जुही चावलासोबत 'बोल राधा बोल', दिव्या भारतीसोबत 'दिवाना' अशा नव्या-जुन्या पिढीतील तब्बल ४५ नायिकांसोबत ऋषी कपूर यांनी रोमँटिक सिनेमे दिले.
२००० नंतर मात्र ऋषी कपूर चरित्र भूमिकांकडे वळला. ज्या ताकदीने त्याने लव्हरबॉय रंगवला त्याच ताकदीने त्याने चरित्र भूमिका आणि अगदी खलनायकही रंगवला. 'फना', 'औरंगाजेब', 'पटियाला हाऊस', '१०२ नॉट आऊट', 'ओम शांती ओम', 'नमस्ते लंडन' 'लक्ष बाय चान्स', 'चिंटूजी', 'दिल्ली६', 'अग्निपथ', 'डी-डे' या आणि अशा सिनेमांमधून त्याने चरित्र भूमिका व्यवस्थित वठविल्या. त्याला प्रेक्षकांचीही तेवढीच पसंती लाभली. 'राजमा चावला' सिनेमातली त्याची राज माथूर ही भूमिकाही प्रेक्षकांना भावली.
मागील बरीच वर्षे कॅन्सरशी त्याचा लढा सुरू होता. तो उपचारही घेऊन आला होता. मात्र, अखेर त्याची लढाई अपयशी ठरली. लव्हरबॉय ते चरित्रनायक आणि खलनायक असा प्रचंड सिनेप्रवास असलेला अभिनेता, सिनेमासृष्टीतले संवेदनाशील आणि नैसर्गिक, कसदार अभिनयाचे पाईक म्हणून गणले जाणारे ऋषी कपूर आता आपल्यात नाही, हे मान्य करणे तितकेसे सोपे नाही.
1 टिप्पण्या
डफलीवाले काय गाणं गाजलं होतं, त्यावेळी.
उत्तर द्याहटवाआज आपला लेख वाचत असताना, त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.
Please do not enter any spam link in the comment box.