-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
आजच्या पुढारलेल्या जगात महिलांची परिस्थिती पाहिली म्हणजे आपले मन दीड-दोनशे वर्षांपूर्वीच्या परिस्थितीशी तुलना करायला लागते. त्या काळात महिलांना कसलेही स्वातंत्र्य नव्हते. साधा शिकण्याचा देखील हक्क नव्हता आणि पुरुषांसमोर उभे राहून बोलण्याची देखील परवानगी नव्हती. आज काळ बदललेला आहे. महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसून येत आहेत. त्याकाळी अनेक धाडसी महिलांनी आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पुरुषांनी स्त्री- पुरुष समतेचा विचार मांडला. लोकांनी त्यांचा छळ केला. त्यांना बहिष्कृत केले. अनेक प्रकारे त्रास देण्याचा देखील प्रयत्न त्याकाळी झाला; परंतु अशा संकटासमोर न डगमगता या समाजसुधारकांनी आपले काम पुढे चालूच ठेवले आणि त्याचीच फळे आज आपण चाखत आहोत असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
पुरुषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रात कुटुंबासाठी एक पाऊल घरात, तर दुसरे अर्थार्जनासाठी बाहेर अशी आजच्या अनेक भारतीय महिलांची स्थिती आहे. कुटुंब लहान असो वा मोठे वाढत्या गरजांमुळे पती-पत्नी कमावते असणे आज गरजेचे झाले आहे. आज समाजातल्या पुरुषांनी स्त्रियांचे घराबाहेर पडणे मान्य केलंय पण, ही मान्यता मनापासून त्यांनी दिलेली आहे का? हा देखील प्रश्न समाजासमोर आ वासून उभा आहे. आपल्या समाजाच्या एका वेगळ्या परिस्थितीचे दर्शन या प्रश्नाच्या उत्तरात दडलेले आहे.
समाजातल्या पुरुषांनी स्त्रियांना आपल्या आपल्याबरोबरचे मानून स्वातंत्र्य दिलेले आहे की, निरूपाय म्हणून दिलेले आहे हा तो प्रश्न आहे. एखादा पुरुष आपल्या पत्नीला नोकरी करण्याचे अनुमती देतो. ही काय समानता आहे का..? स्त्रीने पुरुषाला अशी परवानगी दिलेली असते का? पुरुषाने नोकरी करताना घरातल्या स्त्रीची अनुमती घ्यावी असे कोणी म्हणते का? मग स्त्रीलाच पुरुषाच्या परवानगीची गरज का भासावी? बरे दिलेली ही परवानगी तरी स्त्री स्वातंत्र्याच्या भावनेतून दिलेली असते का? खरे तर ती नाईलाजाने दिलेली असते. हे इथे मान्य करणे गरजेचे आहे. एकाच्या पगारात घर भागत नाही म्हणून तिला कामाला लावलेले असते. म्हणूनच नोकरी केली तरी तिच्या मागची घरकामे किंचितही कमी होताना दिसत नाहीत. आपण स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीची असते हा विचार अजूनही मनापासून स्वीकारलेलाच नाही. त्यामुळे घराच्या बाहेर पडलेली स्त्री घराबाहेर देखील सुरक्षित नाही.
समाज जागृत झाला, कायदा कडक झाला, पोलीस सजग झाले. पण, तरी सुद्धा महिला अजून असुरक्षिततच आहेत. जोपर्यंत घरातील कर्त्या पुरुषांच्या मनोवृत्तीत फरक पडत नाहीत तोपर्यंत महिला सुरक्षित होणार नाहीत आणि सुरक्षितेचा विषय असो की महिलांची कोणतीही समस्या असो ती पुरुषी मनोवृत्तीतून निर्माण झालेली आहे. म्हणून स्त्रियांना समता आणि स्वातंत्र्य पाहिजे असेल तर पुरुषांच्या वर्चस्वाचा अहंगंड कमी झाला पाहिजे.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.