संस्कृती पालन म्हणजे केवळ थर्टी फर्स्ट डिसेंबर रोजी दारू पिऊन अथवा न पिता साजरा करणे नव्हे
काही वर्षांपासून ३१ डिसेंबर हा दिवस एखादा राष्ट्रीय सण, मोठा उत्सव असल्याप्रमाणे भारतात साजरा करण्याची जणू प्रथाच पडली आहे असे वाटत आहे. चांगल्या गोष्टी मानव स्विकार करण्यास थोडा उशोर लावतो पण वाईट गोष्टींचे वळण लागण्यास पटकन आकलन करून कृतीही करतो. याचे जिवंत उदाहरण म्हणजे थर्टी फर्स्ट डिसेंबर (३१ डिसेंबर) चंगळवाद करून, धांगडधिंगाणा, मद्यपान करून साजरा करण्याची पध्दत. सध्या कार्पोरेट युगात झटपट पुढे कसे जावे हे आजच्या मंडळींना वेगळे सांगावे लागत नाही. त्यांची ती हुशारी नक्कीच वाखाणण्याजोगी आहे, पण याच तरूणाईने तेच धाडस जर आपली भाषा, संस्कृती जपण्यास दाखविली तर जगात आजही भारताला संस्कृतीप्रधान देश म्हणूनच गणले जाईल यात शंकाच नाही. पण, एखाद्या झाडावर बांडगुळ जसे वाढत जाते तसे थर्टी फर्स्ट साजरा करण्याचे लोण सध्या वाऱ्यासारखे पसरत आहे. यात रात्री-बेरात्री पार्टीचे आयोजन करून अथवा एखाद्या ठिकाणी पिकनिकला जाऊन दारु रिचवण्याचे प्रमाण जास्त आहे. तरूणांमध्येच नव्हे तर वृध्द मंडळी, महिला वर्गही यात मागे नाही अशा मंडळींना मौजमजा करण्यासाठी केवळ निमित्त हवे असते. भारतीय संस्कृतीचे पालन करणाऱ्यांना असे तरूण-तरूणी अडाणी, पुरोगामी विचाराचे लोक म्हणून हिणवतात. अशा दारूच्या पार्ट्यांत कधी-कधी अतिरेकही होतो.
याचेच एक उदाहरण सांगायचे झाल्यास दोन-तीन वर्षांपूर्वी मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ एका जमावाने दारू पिऊन तेथे आलेल्या एका अर्धवट वस्त्र परीधान केलेल्या मुलीचे तिच्या मित्र- मैत्रिणीबरोबर थर्टी फर्स्टच्या दिवशी कपडे फाडले. एखादी घटना आपल्या मनीधनी नसतानाही जेव्हा एखाद्यावर असा किळसवाणा प्रकार / प्रसंग ओढवतो, तेव्हा प्रचंड मानसिक खच्चीकरण होते. त्यावेळी या प्रकरणाचे / स्त्रीच्या अब्रूचे धिंडवडे उडविले गेले, पण आजही तरूणींनी आपले कपडे बदलले नाहीच हेच आमचे दुर्दैव!
भारतीय संस्कृतीनुसार महाराष्ट्राचे गुढीपाडवा हे नववर्ष मानले जाते. जे गैरप्रकार थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या रात्री घडतात ते गुढीपाडव्याला घडले आहेत असे आपण कधी ऐकलेत का? थर्टी फर्स्टच्या दिवशी लोक टी-शर्ट, जीन्स, अर्धनग्न कपडे घालतात तर गुढीपाडव्याच्या दिवशी महिला साड्या, नथ, गजरा तर पुरुषमंडळी सदरा-लेंगा आदी पेहराव करतात. थर्ठी फर्स्ट डिसेंबरच्या रात्री बार तुडुंब भरलेले असतात. ग्लासाला ग्लास लागून 'चिअर्स'च्या नादात कितीतरी लाखो लिटर मद्य रिचवले जाते तर गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येकजण आपापल्या घरी देवाला नैवेद्य दाखवून गोडधोड पदार्थ बनवितात. जर आपले नववर्ष हे गुढीपाडवा असेल तर मग उगाचच आपण पाश्चात्य संस्कृतीला आपल्याजवळ करून १ जानेवारी रोजी नववर्षाच्या शुभेच्छा कशाला द्यायच्या?
सामाजिक संबंधाची, आपल्या संस्कृतीची जोपासना करण्याऐवजी या सामाजिक संबंधांचे धिंडवडे काढण्यात तरुणाई मग्न आहे असेच यावरून वाटते. आपण समाजात राहतो, समाजाचा, आपल्या संस्कृतीचा मान-सन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. हे आजची तरुणाई पूर्णपणे विसरत चालली आहे. विदेशी लोक अत्यंत आवडीने आपल्या संस्कृतीचे आचरण करीत आहेत. काही वर्षानंतर आपली संस्कृती बाहेरील देशांकडून आपल्याला शिकावी लागेल की काय असे वाटत आहे. कारण बाहेरच्या देशांनी जे फेकले ते आपण उचलण्यात आपला वेळ खर्ची करत आहोत असे म्हटल्यास वावगे ठरूनये.
थर्टी फर्स्टच्या दिवशी डिस्को पब, पंचतारांकित हॉठेल्स, रिसॉर्ट आदी ठिकाणी दारुच्या बाटल्यांचे खच पडलेले दिसून येतात. तसेच थर्टी फ्सर्टच्या दुसऱ्या दिवशी इंग्रजी कालगणनेनुसार १ जानेवारी, त्यांचे नववर्ष सुरु होते म्हणून आपले काही तरूण-तरूणी दारू पिऊन जागरण करून एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देतात. ही एक प्रकारची संस्कृतीहिनताच म्हणावी लागेल. ब्नकामावर गेल्यावरही आम्ही अशा-अशा प्रकारे थर्टी फ्सर्ट साजरा केला असे एकमेकांना पाठ ऐकविले जातात. अर्थात ही नशा उतरायला दोन दिवस लागतात. आजच्या तरूणाईला आपण उद्याचे भावी नागरीक म्हणून संबोधतो. पण याच तरूणाईच्या अंगी विविध गुण असूनही त्याला संस्कृतीची जाण नाही हेच खरे.
संस्कृती पालन म्हणजे केवळ थर्टी फर्स्ट डिसेंबर रोजी दारू पिऊन अथवा न पिता साजरा करणे नव्हे तर दारूऐवजी या दिवशी तुम्ही इतरही विधायक कामे करू शकाल, आपल्या आजूबाजूला कितीतरी रुग्ण ज्यांना कोणीही रुग्णालयात भेटावयास येत नसेल. त्यांना जाऊन भेठा. त्यांना तुमच्या आधाराची गरज आहे. अंध-अपंग यांना मदत करा, हॉटेल, घरकाम करणारी लहान मुले ज्यांना थर्टी फर्स्ट, दिवाळी, दसरा म्हणजे काय हे माहितही नसेल त्यांच्या जीवनात नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न करा. असे भाऊ- बहिण आपल्याला, पावलोपावली भेटतील. आपल्या भारत देशाला महागाई, वीजटंचाई, पाणीटंचाई अशा विविध समस्यांनी घेरले असताना आपण दारू पिऊन आपलेच पैसे उडवून कसला आनंद व्यक्त करतोय याचे परीक्षण करावे. खरेतर ३१ हिसेंबर म्हणजे जुन्याला विसरून नव्या वर्षाचे स्वागत करणे होय. इथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे या दिवशी आपले काही बांधव, चर्चमध्ये प्रार्थना करावयास जातात आणि आपण काहीजण दारू रिचवून धांगडधिंगाणा, पार्ट्या, सहली करून वाईट गोष्टींचा उदो उदो करण्यात मग्न असतो.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.