Ticker

10/recent/ticker-posts

इथे मरण स्वस्त आहे!

चला....चल....चला....मेणबत्त्या जमा करा... जेथे बॉम्बस्फोट घडला आहे तेथे जमू या..? आता पंतप्रधान आतांकवाद्यांवर रागावणार... गृहमंत्री वाकडी नजर करणाऱ्यांचे कंबरडे मोडण्याची घोषणा करणार आणि सगळे अतिरेकी घाबरणार.... दरवेळी हल्ले झाले की, तिच ती आश्वासने, तेच ते आंदोलन, ज्यांचे जीव गेले त्यांना आयुष्यभराचे अपंगत्व आले त्यांच्याशी, त्यांच्या परिवाराशी ना कुणाला घेणे देणे ना कुणाला सोयरसुतक.


बॉम्बस्फोटांची मालिका संपतच नाही. अंदाजे १) मुंबई : १२/५/ १९९३ : विविध ठिकाणी एकामागून एक १३ बॉम्बस्फोट २५७ ठार तर ७१३ जखमी; २) ०२/१२/२००२ : घाटकोपर येथे बेस्टच्या बसमध्ये स्फोट, २ जण ठार; ३) २५/०८/२००३ : गेटवे ऑफ इंडिया व झवेरी बाजार येथे टॅक्सीमध्ये बॉम्बस्फोट, ५२ जण ठार; ४) ११/०७/ २००६: लोकल ट्रेनमध्ये ७ मिनिटांत ७ बॉम्बस्फोट, १८८ ठार; ५) २६/११/२००८ ते २९/११/२००८ कसाब व त्याच्या साथीदारांनी ताजमहाल-आऑबिरॉय'हॉटेल येथे हल्ला केला, तसेच छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे हल्ला केला त्यात १६६ निरपराध ठार कित्येकजण जखमी, पोलीस दलातील जाँबाज पोलीस मृत्युमुखी, ६) १३/०७/२०१६: ऐन गर्दीच्या वेळी झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस दादर कबूतर खान्याजवळील बेस्ट थांब्यावर स्फोट, २३ जण ठार, ११२ जण जखमी,


वरील आकडेवारी वाचल्यावर काय वाटले? की, मुंबईत कुणीच सुरक्षित राहिलेली नाही, तुम्ही मंदिरात जा, ट्रेनमध्ये बसा, बाजारात जा, सगळीकडे नुसती गर्दीच गर्दी. इथे कुणालाही कुणाकडे साधा पाहण्यासही वेळ नाही, जो तो नुसता आपल्याच कामात गुंतलेला दिसून येतो, प्रत्येकजण नुसता पळत असतो, मग ती गडबड कुणाची कामावर जाण्याची असेल. कुणाला घरी पोहचायचे असेल, कुणाला खरेदी करण्याची, कुणाची धंद्यासाठी चाललेली लगबग, आपले काम बरे याच मानसिकतेत प्रत्येकजण इथे वावरत आहे आणि हेच नेमके अतिरेक्यांनी हेरले आहे. मुंबई ही आपली आर्थिक राजधानी, तिच्यावर सतत वेगवेगळ्या पद्धतीने हल्ले करून अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा अतिरेक्यांचा कुटील डाव. मुंबईवर हल्ला केला तर त्याचे पडसाद देशभर उमटतात हे दहशतवाद्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. 


वर उल्लेख केलेल्या प्रत्येक स्फोटांच्यावेळी कुणीतरी मूर्ख राजकारणी. म्हणा अथवा समाजसेवक मुबई-स्पिरिट........ मुंबई स्पिरिट म्हणून बोंबलत असतात. अरे कसलं आलंय मुंबई स्पिरिट? इथे प्रत्येकजण चाकरमानी, गांजलेला, प्रत्येक मुंबईकर दोनवेळच्या जेवणासाठी घराबाहेर पडतो. त्याला दिसत असतात ती आपल्याच माणसांची पडलेली कलेवरं. आजूबाजूला पडलेले छिन्न-विछिन्न मुडदे. कुणाला हात नाहीत, तर कुणाला पाय नाहीत, कुणाच्या छातीत काचा घुसलेल्या तर कुठे अर्धवट बाहेर पडलेले मेंदू, तर कुठे विव्हळणारे, शरीराची चाळण झालेले आणि आपल्याच नशीबाला दोष देत बसणारे की, आपणही मेलो असतो तर बरे झाले असते, कसलं आलंय हो स्पिरिट, असे अर्धवट स्पिरिट दाखविणार? ज्यांचा एकुलता एक आधार गेला त्यांनी कुणाकडे बघांयचे, कसे जगायचे स्पिरिट म्हणून कशाला उगाचच जखमांवर मीठ चोळताय त्यांच्या?


आपली गुप्तचर व पोलीस यंत्रणा नेहमीच कुचकामी ठरलेली. एकवेळ अशी होती की, स्कॉटलंड यार्डच्या तोडीस-तोड देणारे पोलीस म्हणून मुंबई पोलिसांच्या डोक्यात तुरा खोवलेला असायचा; मग आज काय झालय त्यांना? का आपण स्फोट झाल्यावर फक्त आरडीएस, अमोनिया नायट्रेट, टीएनटीसारखी स्फोटके वापरलीत याचं संशोधन करून गप्प बसायचं! राजकारण्याचं एक बरं असतं, बुआ, त्यांनी आपली नुसती बडबड करायची, खोटी आश्वासने द्यायाची, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करायचे, एकमेकांची उणीधुणी काढायची, बेजबाबदार वक्तव्ये करायाची, मीडियाही असतेच त्यांच्या जोडीला.


कसाबच्या वाढदिवसाच्या दिवशी बॉम्बस्फोट झाला, अरे कशाला देताय प्राधान्य नको त्या गोष्टीला की, अतिरेक्यांचे मनोधैर्य वाढायला? ताजमहाल-ऑबेरॉय या हॉटेलमध्ये हल्ला झाला, त्यावेळी अतिरेकी टीव्हीवरील चालू घडामोडी बघून कसाब व त्याच्या साथीदारांना त्यांचे, गॉडफादर पुढील माहिती देत होते. याचा आपल्याला अनुभव आला नाही का? सगळ्याच गोष्टी राजकारण्यांवर आणि पोलीस दलावर टाकल्यावर आपली जबाबदारी संपते का? एखादी व्यक्ती संशयास्पद दिसली, बेवारस वस्तू इकडे-तिकडे ठेवताना आढळली तर आपण पोलिसांना सतर्क केले तर बरेचसे प्रकार रोखता येतील. 


अतिरेक्यांना जातधर्म काही नसतो. मग कसली शांततेची कबुतरं उडवत बसायची? हे कुठेतरी थांबायला पाहिजे, नाहीतर अतिरेक्यांच्या हातात देश जायला वेळ लागणार नाही आणि मग बॉम्बस्फोट होतच राहतील आणि निष्पाप बळीही जातील. त्यासाठी सर्व राजकिय पक्षांनी आपापसातील हेवेदावे विसरून एकत्र येऊन अतिरेक्यांच्या नाकात वेसण घालणे गरजेचे आहे. बॉम्बस्फोटापासून वाचलेला एकजण म्हणाला काय खरं नाही बघा, आम्ही जेव्हा सकाळी कामासाठी घराबाहेर पडतो ना तेव्हाच घरचे देवावर भरवसा ठेवून रात्री आमची वाट बघत असतात, रात्री जेव्हा पुन्हा घरात पाय ठेवतो ना तेव्हाच आम्ही घरच्यांचे, कारण इथे मरण स्वस्त आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या