Ticker

10/recent/ticker-posts

गर्दीचे व्यवस्थापन हवे

रिद्वार येथे आयोजित केलेल्या एका यज्ञात आहुती टाकण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत ९४ महिलांसह १६  भाविकांचीच आहुती पडण्याची घटना घडली. भारतात आजही चेंगराचेंगरीसांरख्या घटना व्हाव्यात, हीच दुर्दैवी गोष्ट आहे. अखिल विश्‍व गायत्री परिवार या संघटनेने हरिद्वार येथे गायत्री यज्ञाचे आयोजन केले होते. ही संघटना महिलांना गायत्री मंत्र अन्य पूजा शिकविण्याचे काम करते. ही संघटना मात्र गायत्री मंत्राला अधिक व्यापक करण्याचे काम करीत असून त्याचाच एक भाग म्हणजे ती महिलांना हा मंत्र शिकविते. या यज्ञासाठी म्हणूनच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या संघटनेचे संस्थापक श्रीराम शर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हरिद्वार येथील आश्रमात गायत्री यज्ञाचे आयोजन केले होते. मात्र, यज्ञात आहुती टाकण्यासाठी पुढे जाण्याची घाई उपस्थितांना झाली. या ढकलाढकलीत काही महिला तोल जावून पडल्या. पण, त्यांना सावरण्याऐवजी यज्ञात आहुती टाकण्याला प्राधान्य देण्यात आले. परिणामी चेंगराचेंगरी झाली.


खरे तर धार्मिक उत्सव किंवा कार्यक्रमाचे आयोजन करतेवेळी संपूर्ण परिसर कसा आहे, कसा होऊ शकतो, त्यातून मार्गक्रमण कसे असावे. भाविकांचा लोंढा कुठे व किती वेळ थांबवावा, किती वाजता कार्यक्रमाची सुरुवात व्हायला हवी, कसा तो आखलेला असावा, याविषयीची पूर्वनियोजित योजना तयार असावी लागते. ब्ल्यू प्रिट (आराखडा) तयार असायला पाहिजे. हे झाले आयोजकांचे कर्तव्य. दुसरे म्हणजे सदर परिसरात्रील पोलीस यंत्रणा, जिल्हाधिकारी यंत्रणा, नगरपालिका आणि अन्य स्वयंसेवी यंत्रणा या सर्व यंत्रणांनी समन्वयाने काय करायचे असते. परंतु ते होताना दिसत नाही.  आयोजक संस्था, पोलीस यंत्रणा, पालिका यंत्रणा, जिल्हाधिकारी यंत्रणा यांच्यात कुठेच समन्वय दिसून येत नाही. भाविकांची गर्दी ही जशी चालत येते, तशी वाहनांची येते. त्यातच व्हीव्हीआयापी,  व्हीआयापी यांच्या गाड्या, ताफे, त्यांचे सुरक्षाकवच यामुळे बर्‍याचदा आयोजनाची फजिती होते. संयोजन असावे लागते ते एखाद्याचसाठी.  पण, भारतात प्रत्येकाला देवदर्शनाची इतकी हौस लागलेली असते की, देव पुन्हा कधी त्या ठिकाणी दिसणारच नाही. नेते आणि नट-नट्यांना आपल्या छबीची हौस असते, आयोजकांना ही सर्व मंडळी आली तर प्रसिद्ध मिळेल वरून ते डोनेशनही देतील, अशी आशा असते. एकंदरीतच काय तर सगळे मिळून नियोजनाची ऐशीतैशी करून टाकतात, त्यामुळे अनेकदा नियोजनाचा फज्जा उडतो.


 साध्या साध्या बारीक-सारीक कार्यक्रमांची माहिती पोलिसांकडे असते. भाविकांची गर्दी वाढत जात आहे, असे आढळताच तेथील बंदोबस्तात पोलिसांनी वाढ करायला हवी होती. पण ते झालेले दिसून येत नाही. यात्रेला किंवा धार्मिक उत्सवाला जाताना प्रत्येक भाविकानेही इतर सुरक्षा यंत्रणेबरोबरच स्वत: ही स्वत:ची सुरक्षा व्यवस्थित कशी राहील याची काळजी घ्यायला हवी. इतर यंत्रणा या वरवरच्या असतात. वेळप्रसंगी त्यांनाही बहेतकदा त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती नसते. कारण त्यांना ठरावीक दिवसांसाठी तेथे बंदोबस्तासाठी पाचारण केले असते. त्यामुळे अशा ठिकाणी वेळप्रसंग आला तर आपले कुटुंब सुरक्षित कसे राहील याची नियोजनबद्ध आखणी प्रत्यक्ष स्थानाला जाण्याआधी भाविकांच्या कुटुंबप्रमुखांनीच करून ठेवणे गरजेचे आहे. योग्य संयोजनाच्या अभावामुळेच भाविकांच्या आहुती पडतात हे सत्य कायमस्वरूपी सर्वांनी लक्षात ठेवावे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या