Ticker

10/recent/ticker-posts

लेकींना वाचवा-मुलगी जगवा

'जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाचा उद्धार करी' किंवा 'शिकलेली आई, घर पुढे नेई',अथवा 'शिकलेली आई म्हणजे हजार शिक्षकांची भरपाई' अशा अनेक म्हणी स्त्रियांबद्दल प्रसिद्ध आहेत. ज्या भारतीय संस्कृतीत आईचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्याच देशात हजारो मुलींचा जन्मापूर्वीच गळा घोटला जातो, हे कटू सत्य आहे. एकीकडे स्त्रीची महती गायची, तिच्या आरत्या म्हणायच्या आणि दुसरीकडे स्त्रीस्वातंत्र्याचा गळा घोटायचा. स्त्रीला आपला पती निवडण्याचा अधिकार नाही, आपल्या इच्छेनूसार गर्भधारणेचा हक्क नाही अशा बालविवाहापासून सती परंपरेसारख्या अनेक कूर प्रथांना शतकानूशतके स्त्रियांना सामोरे जावे लागत होते. हे कमी की काय म्हणून, मातेच्या गर्भातील स्त्रीअंकूर खुडण्याचे काम आधुनिक काळातील कंसरूपी डॉक्टर सोनोग्राफीच्या मदतीने शुल्लक कवडयांसाठी (पैशांसाठी)दिसून येत आहे. शाहू, आंबेडकरांच्या संबोधल्या  जाणार्‍या महाराष्ट्रातही जन्माआधीच नाकारण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे.


मुलींची भ्रूणहत्या सामाजिक जीवनाला व जगण्याला घातक ठरणार आहे. मुलीचा वाढविण्यासाठी समाज-जागृती, महिला तसेच पुरूषांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. मुलीचे घटते प्रमाण लक्षात घेता मोठया सामाजिक समस्यांना भविष्यात स्त्रियांवर भयानक होऊ शकतात. स्त्री पुरूष असमतोलपणा हा सामाजिक जीवनाला घातक ठरू शकतो. 


समाजात महिलांना मिळणारे दुय्यम स्थान, पुरूषांकडून होणारी छळवणूक यामुळे महिला वर्गाची मोठी हेळसांड होते. मुलीच्या लग्नात खूप हुंडा द्यावा लागतो. कधी-कधी लग्नानंतरही हुंडयाची मागणी, छळवणूक, पिळवणूक, कितीही शिकविले, काही झाले तरी मुलगी हे परक्याचेच धन हि मानसिकता आई-वडीलांच्या मनात घर करून बसलेली असते. त्यामुळे विशेषतः मातेलाच मुलीचा जन्म नकोसा झालाय. विवाहित महिलेलाही पहिला मुलगाच हवा असतो. ज्या महिलेला पहिला मुलगा होतो ती खूप नशिबवान असते, तिचा पायगुण चांगला असतो, अशा अंधश्रद्धा फार पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत. त्यामुळे महिलांनाही पहिला मुलगाच हवा असा त्यांचा हट्ट असतो. या हट्टामुळे सुसंकृत परिवारातही स्त्रीभ्रूणहत्यांचे प्रमाण वाढत आहे. सुसंकृत व मध्यमवर्गीय महिलांच्या मनातील मुलाचा हट्ट हा विचार खोडावयास हवा. 


वंशाचा दिवा म्हणून जरी मुलाला समजले जात असले तरी वंशाची पणती म्हणून मुलीला समजण्यास काहीच हरकत नाही. कारण मुलीच्या नावापुढे आता वडिलांसोबत आईच्या नावाचीही नोंद होते आहे. मुलगी ही जरी परक्याचे धन असले तरी आईवडीलांचे नाव घेऊनच ती सासरी जाते. तिच्या शासकीय कामात कागदोपत्री आईवडीलांचेच नाव लिहिले जाते हे कदापिही विसरू नका. मुलगी परक्याचे धन आहे हा गैरसमज मनातून काढून टाका. 'मुलगी झाली, प्रगती झाली', 'मुलांपेक्षा मुलगी बरी, सुख देते दोन्ही घरी', 'पहिली बेटी गेहू कि रोटी', अशी कितीतरी बोधवाक्ये मुलीच्या जन्माला पोषक असताना तसेच शासनाच्या विविध सोयीसुविधा मुलीसाठी असताना मुलींच्या जन्माबाबत साशंकता ठेवणे योग्य नाही. मुलीला उच्च शिक्षण देऊन तिला स्वतःच्या पायावर उभे केले तर ती पालकांवर ओझे राहणार नाही, तर ती आपल्या आई-बापाचे ओझे वाहण्यास समर्थ राहील.  


विज्ञान शाप की वरदान, असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. ज्या विज्ञानाने मानवजातीवर उपकार करणारे असंख्य शोध लावले, त्याच विज्ञानाचा वापर करून माणसाने अणुबॉम्ब बनविला आणि लाखो लोकांचा संहारही केला. सोनोग्राफी मशिन हा असाच एक विज्ञानविष्कार आहे. या तंत्रज्ञानामुळे आईच्या गर्भातील बाळाच्या आजारांसह इतरही अनेक गोष्टी समजू शकतात.  तसेच बाळाचे लिंगही सहजपणे समजते, नेमक्या याच गोष्टीचा  गैरफायदा समाज करताना दिसत आहे. सोनिग्राफी मशीनची किंमत सुमारे पाच लाख ते पंचवीस लाख एवढी असते. सामान्यतः सोनोग्राफीसाठी पाचशे ते एक हजार रूपये डॉक्टरांकडून आकारले जातात. पण, गर्भलिंग जाणून घेण्यासाठी हेच डॉक्टर पंचवीस हजार ते एक लाख रूपये घेतात. अशा डॉक्टरांना कायद्याचा धाक नसल्याने पैशांच्या लालसेपोटी कळी उमलण्यापूर्वीच तिचा वध करणारे काही डॉक्टर बिनदिक्तपणे आज समाजात वावरत आहेत. त्यांना पायबंद घातला जाणे गरजेचे असून अशा डॉक्टरांवर तीन वर्षे कैद व ५० हजार रूपयेपर्यंत दंड आकारला गेला पाहिजे, त्यांचा परवाना रद्द केला गेला पाहिजे तरच स्त्रीभ्रूणहत्येचे प्रकार कमी होतील.  


बऱ्याचदा स्त्री गर्भपातासाठी स्वतःहून तयार नसते. पण, कुटुंबातून, नातेवाईकांकडून तिच्यावर दबाव आणला जातो. एका पाठोपाठ मुली झाल्या आणि मुलगा होत नसेल तर संपुर्ण दोष हा स्त्रीलाच दिला जातो. समाजात तिची मानहानी केली जाते. तिला सण-समारंभांना बोलावणे टाळले जाते. यात कमी की काय म्हणून मुलीचा गर्भ असेल तर गर्भपात करून तो नष्ट केला जातो. अर्थात, या सर्व प्रकारांना सोनोग्राफी करणाऱ्यांपेक्षा करून घेणारेही तितकेच जबाबदार असतात. त्यामुळे समाजातील या दोन्हीही घटकांनी याबाबत विचार करणे गरजेचे आहे. आपण जर अशाच प्रकारे मुलीला या जगात येऊच द्यायचे नाही, मुलीला जन्मच नाकारला तर भविष्यात आपल्याला आई, बहीण, मावशी, काकी, आजी यांच्याही ममतेला पोरके व्हावे लागेल. एकूणच काय तर स्त्रीत्वाची ज्योत सध्याच्या कलीयुगात वादळवाऱ्यात विझू पाहत आहे. तिला दोन्ही हातांच्या संरक्षणाची गरज आहे. असे संरक्षण देण्याचा प्रत्येकानेच मनोभावे प्रयत्न केल्यास स्त्रीभ्रूण हत्येसारख्या घटनांना पायबंद नक्कीच घालता येईल.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या