Ticker

10/recent/ticker-posts

सचिन तेंडुलकरला भारतरत्न द्याच!

१०० आंतराष्ट्रीय शतके! हा भीमपराक्रम करण्याचे स्वप्नदेखील पाहण्याची हिंमत जगभरातील दादा फलंदाज करू शकणार नाहीत. कारण त्यासाठी गुणवत्ता, संयम, जिद्द, हिंमत, सतत शिकण्याची वृत्ती, नम्रता, फिटनेस असे सर्व गुण असून केवळ चालत नाही, तर या गुणांचा दर्जाही कायम सर्वोच्च असाच असावा लागतो. यामुळे आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला हे दुर्लभ महाशतक गाठता आले नव्हते; मात्र भारताचा सर्वसर्वकालीन महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने बांग्लादेशमधील शेर-ए-बांगला या स्टेडियमवर महाशतकाला गवसणी घातली. 


कर्तृत्व आणि कल्पकता यांची सांगड घातली की, अद्भुत कार्ये जन्माला येतात. असाच भीमपराक्रम अर्थात 'शतकांचे शतक' ही दैदिप्यमान अशी कामगिरी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी क्रिकेटमध्ये मास्टर सचिन रमेश तेंडुलकर याने करून दाखविली आहे. शुक्रवार १६ मार्च २०१२ हा दिवस. सचिनला आणि समस्त भारतीयांना सदैव स्मरणात राहणारा असा दिवस ठरणार आहे. क्रिकेट विश्वात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा हा दिवस आहे. कारण सचिनने या दिवशी बांग्लादेश विरुद्ध शतकांचे शतक पूर्ण करून, मी अजून म्हातारा झालेलो नाही, हे दाखवून दिले. सचिनने एक दोन नव्हे तर, तब्ब्ल शंभर शतके (कसोटी व वन डे मिळून ) ठोकली. ज्याची अक्खे क्रीडाविश्व आतुरतेने वाट पाहत होते. 


रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी व इराणी ट्रॉफी अशा प्रतिष्टेच्या क्रिकेट विश्वातील सामन्यात पदार्पणातच शतक ठोकणारा सचिन असा एकमेव क्रिकेटपटू आहे आणि त्या यशामुळेच सचिनची १९९० साली इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली. त्यावेळी तो अवघ्या १७ वर्षांचा होता. सचिनने कसोटी क्रिकेटमधील आपले पहिले शतक झळकाविले ते १४ ऑगस्ट १९९० साली. मँचेस्टर येथील इंग्लंड विरुद्ध खेळताना त्याने १९९ धावा काढल्या होत्या. तेव्हापासून तो गेली २२ वर्षे सतत क्रिकेट मैदान गाजवतोय. 


ऑस्ट्रेलियाचा अव्व्ल दर्जाचा खेळाडू म्हणून ओळखला जाणारा आणि सचिनला कदाचित कसोटी शतकात मागे टाकेल अशी शक्यता ज्याच्याकडून केली जात होती, त्या पॉंटिंगलाही शतकांच्या अर्धशतकांचा हा विक्रम अजून करता आलेला नाही. म्हणूनच सचिनचा हा विक्रम नुसता अभूतपूर्व नाही तर पुढच्या ५० ते १०० वर्षातही तो कुणी मोडू शकेल अशी शक्यताही फार कमी आहे असे वाटते. सचिनच्या विक्रमांचे वर्णन केवळ अभूतपूर्व असे करून चालणार नाही, कारण ते अपुरेच ठरेल. खरेतर सचिनचा हा विक्रम 'न भूतो न भविष्यती' असाच आहे आणि तो तसाच राहावा, अशी सर्व भारतीयांची इच्छा आहे. क्रिकेट विश्वात असतील नसतील ते सर्व जवळ-जवळ सगळेच विक्रम त्याने मोडीत काढले आहेत. क्रिकेट हेच त्याचे सर्वस्व आहे असे तो मानतो. क्रिकेट खेळाशिवाय त्याला जगातील इतर कोणत्याही वस्तूचा अजिबात मोह पडू शकत नाही. या त्याच्यात असलेल्या अंगभूत शक्तीमुळे, निस्वार्थीपणामुळे त्याने २० कोटी रुपये मिळवून देणारी दारूची जाहिरात अगदी सहजपणे झिडकारली. एखाद्या मोठ्या रकमेच्या बाजार मांडणाऱ्या जाहिराती तो सहजपणे नाकारू शकतो, याचे कारण म्हणजे त्याची सामाजिक बांधिलकीवर अचल श्रद्धा आहे. 


मध्यंतरीचा काळ हा सचिनसाठी खूप खडतर असा होता त्यावेळी कपिलसारख्या मान्यवर क्रिकेटपटूनेही सचिन हा आता म्हातारा झाला आहे तो धावा जमवू शकत नाही तर काही जणांनी सचिनला क्रिकेटमधून  निवृत्त होण्याचाही सल्ला दिला परंतु सचिनने अशा टीकेकडे फारसे लक्ष दिले नाही. खेळावरील अविचल निष्ठा, सातत्यपूर्ण परिश्रम, शरीर व्यवस्थित ठेवण्यासाठी करावयाचा रोजचा व्यायाम, आहार या सर्वांच्या आधारे त्याने अपयशाचे यशात  रूपांतर केले आणि तो आता एक जगज्जेता क्रिकेटपटू बनला आहे. अशा या विक्रमवीराला आमच्या सारख्यांनी 'क्रिकेटचा कोहिनूर' म्हटल्यास वावगे ठरू नये. 


सचिन हा महाराष्ट्राचा आहे याचा महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अभिमान असून सचिनने अजून नवनवीन विक्रम करावेत अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. देशासाठी खेळताना जबाबदारीचे ओझे पेलवणाऱ्यांचे खांदे देखील तितकेच अजबूत असावे लागतात असे म्हणतात आणि तसे सचिनचे आहेत. सचिनने अनेकदा भारताला पराभवाच्या दाढेतून बाहेर काढण्याकरिता शर्तीचे प्रयत्न केले आहेत. १६व्या वर्षी आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडण्याची सुरुवात करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने अवघ्या ३८ व्या वर्षी क्रिकेटची अनेक शिखरे पादाक्रांत करणाऱ्या सचिनबद्दल सर्वसामान्यांच्या तोंडून सध्या एकच उद्गार बाहेर पडताहेत... 'केवळ सचिनच हे करू शकतो'. अशा या देशासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या क्रिकेटवेड्या सचिन तेंडुरकरला भारत सरकारने 'भारतरत्न' हा मानाचा पुरस्कार देऊन त्याचा यशोचित गौरव करावा. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या