चिमण्यांची संख्या कमी व्हायला आपणच कारणीभूत आहोत
-दादासाहेब येंधे
चिव-चिव चिमणी, दाणा खाते, पाणी पिते, भुर्रर उडून जाते.... अशा गोष्टी ऐकत आपण लहानाचे मोठे झाले आहोत लहानपणी आपण झाडांच्या फांद्यावर, आपल्या घराच्या खिडकीत, अंगणात हे पक्षी पाहिले आहेत. परंतू आताच्या मुलांना मात्र अशा पक्षांचे दर्शन मिळणे अवघड झाले आहे.
वाढत्या सिमेंटच्या जंगलांमध्ये मोठया प्रमाणावर वृक्षतोेड होत असल्यामुळे या पक्ष्याला निवारा शोधण्यासाठी जागाच राहिलेली नाही. त्यातच काही दिवसांपासून चिमण्याची संख्या फारच घटली आहे. अगदी घराच्या माळयावर घरटे बांधून आपल्या लहान - लहान पिलांना अन्न भरविणारी चिमणी आपल्याला आता कोठेच दिसत नाही. भारतात वेगवेगळया राज्यांत यांना विविध नावांनी ओळखले जाते. हिंदी भाषिक प्रांतात त्यांना 'गौरेया' असे म्हटले जाते. गुजरातमध्ये त्यांना 'चकली', पंजाबमध्ये 'चिडी', जम्मू आणि काश्मीरमध्ये 'चेर', तामिळनाडू आणि केरळमध्ये 'कुरूवी', तेलगुमध्ये 'पिच्चुका', कन्नडमध्ये 'गुब्बाची', पश्चिम बंगालमध्ये 'चराई पाखी' आणि ओरिसामध्ये 'घरचटिया' असे म्हटले जाते. उर्दूमध्ये त्यांना 'चिडिया' तर सिंधी भाषेत 'झिरकी' असे म्हटले जाते. संपूर्ण भारतात चिमण्या या वेगवेगळया नावांवरून प्रसिद्ध आहेत.
त्यांच्यावरून विविध कथाही रचण्यात आल्या आहेत. विषेशतः लहान- लहान मुलांना त्यांच्या गोष्टी सांगितल्या जातात. पण आता या चिमण्यांची संख्या घटत चालल्याने भविष्यात त्या इतिहासजमा होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. असे झाले तर उद्याच्या लहान मुलांना चिमण्या कशा होत्या हे फक्त चित्र दाखवूनच समजावून सांगावे लागेल. वाढते शहरीकरण, शेतांमध्ये पिकांवर किटकनाशकांचा वापर, आणि दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रदूषण यामुळे चिमण्या आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आणखीही त्याची वेगवेगळी कारणे आहेत, आज मोठया प्रमाणावर शिसारहित पेट्रोल वापरले जाते. हे पेट्रोल जळाल्यास मिथाईल नायट्रेट नामक रसायन तयार होते. हे रसायन छोटया प्राण्यांसाठी फार घातक असते. त्यामुळेकी चिमण्यांची संख्या कमी झाली आहे. पूर्वी चिमण्यांसारख्या प्राण्यांना निमंत्रण देणारी मोठया आकाराची आपली घरे असत. पण, आता मात्र अशा घरांचा अभावच असल्याचे दिसते. यामुळे आता चिमण्या दिसत नाही. त्याचप्रमाणे शेतामध्ये आता किटकनाशकांचा मोठया प्रमाणावर वापर करण्यात येतो. त्यामुळे चिमण्यांना खायला मिळणारे अन्न कमी झाले आहे. खरेतर ज्या किटकांमुळे पिकांना धोका असेल असे किटक चिमण्या चाऊन टाकतात. त्यामुळे पिकांच्या वाढीसाठी त्या उपयुक्तच ठरतात असे म्हटल्यास वावगे ठरू नये. चिमण्यांसारखा दुसरा बुद्धिमान पक्षी नाही असे मानले जाते. या बुद्धिमत्तेचा वापर करूनच त्यांनी घरटयाची जागा, खाद्य याची निवड केलेली असते. स्वतःला अनुकूल असेल अशाच परिस्थितीत चिमण्या या गोष्टींची निवड करतात. त्यामुळे जगातही सगळीकडे चिमण्या पहायला मिळत होत्या.
चिमण्यांची संख्या कमी व्हायला आपणच कारणीभूत आहोत, हे प्रत्येकाने ओळखले पाहिजे. आपल्याकडून होणाऱ्या चुका टाळल्या गेल्या तर आपल्याला शहरी भागातही आपल्या आसपास चिमण्या बघावयास मिळतील.
काही दिवसांपुर्वी मला एक एसएमएस आला होता, त्या एसएमएस मध्ये उन्हाळयात गॅलरीमध्ये किंवा खिडकीमध्ये पेलाभर पाणी ठेवले तर ते चिमण्यांना पिण्यास उपयुक्त ठरेल, खरंच आपण असे केले तर बिचार्या चिमण्यांना पिण्यास घोटभर तरी पाणी मिळेल. सुंदर निसर्ग ही परमेश्वराने दिलेली देणगी आहे. हया निसर्गाचे सौंदर्य जपण्यासाठी निसर्गातील प्राणी, पक्षी, यांच्या सुरक्षिततेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न झाले पाहिजेत.
कृत्रिम घरटी बनवून चिमण्यांना वाचविण्यासाठी ती आपल्या गॅलरीत, खिडकीत ठेवावीत अथवा बाजारात येणारा माल हा खोक्यांमध्ये पॅकिंग करून येतो. त्या खोक्यांना आपल्या खिडकीत ठेवून त्याचा वापर आपण चिमण्यांना घरटे बांधण्यासाठीही करून देऊ शकतो. एखादया वाटीत अथवा पेल्यात त्यांना पिण्यासाठी पाणी, तसेच बाजरी, चणे असे खाद्यान्नही ठेवू शकतो. आपण सर्वांनी चिमण्या वाचवा या मोहिमेत सामिल होऊन थोडा का होईना आपला सहभाग दाखवावा . हया पार्श्वभूमीवर लता मंगेशकर यांचे गाणे आठवते - ‘‘या चिमण्यांनो परत फिरा, घराकडे आपुल्या...’’ जर अशी कृत्रिम घरटी प्रत्येक घराघराच्या गॅलरीत, खिडक्यांच्या लागली तर नक्कीच चिमण्या घराकडे परत फिरकतील.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.