Ticker

10/recent/ticker-posts

न सुटलेला गुंता - नक्षलवाद!

युवकांमध्ये परिवर्तन घडविण्याची गरज 

आपल्या हक्कांसाठी- जमीनदारांकडून आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनांमुळे काही लोक संघटित झाले आणि त्यांनी नक्षलबारी येथे पहिला उठाव केला. तेव्हापासून ‘नक्षलवाद' या अत्यंत भयानक अशा  राक्षसाचा जन्म झाला. खरेतर तिबेटी भाषेमध्ये नक्षलवादाचा मूळ अर्थ हा शांतता हा आहे. परंतु या उठाव करणाऱ्यांनी त्याच्या मूळ उद्धिष्टांपासून, मूळ लढयांपासून पूर्णपणे फारकत घेतल्याने ही भारतासाठी मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे. सध्या बिहार, आंध्रप्रदेश, ओरिसा, छत्तिसगड तसेच महाराष्ट्रातील गडचिरोली आदी घनदाट झाडी असलेला भाग नक्षलवाद्यांनी व्यापलेला आहे. याच भागात राहणारी सामान्य जनता त्यांना आरोग्य, शिक्षण, दळणवळणाची साधने, मुलांचे शिक्षण इतर बऱ्याचशा सुविधा तर सोडाच पण दोन वेळची भाजी-भाकरी तथापि रोजगार देण्यात आपले सरकार अपयशी कुचकामी ठरत आहे आणि नेमका याचाच फायदा हे नक्षलवादी घेतात. बंदुकीच्या जोरावर गावकऱ्यांना हे नाचवितात. प्रसंगी कारवाई करण्यासाठी गेलेल्या जवानांना, पोलीसांनाही ते ठार मारून टाकतात. रस्त्यांच्या मधोमध भूसुरूंग पेरून पोलीसांच्या गाडया उडवून नरसंहार करतात. आजपर्यंत तेथे कारवाईसाठी गेलेले कित्येक जवान ठार मारले गेले आहेत.


खरेतर सध्याच्या आर्थिक विकासातील असमानता हेच नक्षलवादाचे मुख्य कारण आहे. मोठया कंपन्यांत वापरण्यात येणाऱ्या स्वयंचलित यंत्रांमुळे स्वस्तात उत्पादन होते हे खरे; पण यामध्ये सर्वसामान्य जनतेचा रोजगार हिसकावून घेतला जातो. एकीकडे मूठभर लोकांना कोटयावधी रूपये मिळत आहेत, तर दुसरीकडे सर्वसामान्य जनतेची परवड होत आहे. या कारणामुळेच युवक नक्षलवादी विचारांकडे वळत आहेत. जनतेच्या या दुःखाचा लाभ काही माफिया विचारांच्या व्यक्तींनी घेऊन नक्षलवादाला प्रोत्साहित केले आहे. यासाठी या विचारसरणीच्या लोकांवर लष्करी कारवाईची गरज आहे; पण याबरोबर सर्वसामान्य जनता नक्षलवादाकडे वळणार नाही याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. युवकांमध्ये परिवर्तन घडविण्याची गरज आहे. 


जवळपास ४० वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये नक्षलवादी कृत्यांचा फैलाव झाला होता. ही समस्या सोडविण्यासाठी दुतर्फी रणनीती अवलंबली गेली होती. लष्करी कारवाईने पश्चिम बंगाल सरकारने भूमी सुधारणा कायदा लागू केला होता. यामध्ये सर्वसामान्य जनता दूर कशी राहील, याची विषेश काळजी घेण्यात आली होती. सध्याच्या नक्षलवादविरूद्धच्या कारवाईत सर्वसामान्य जनतेत परिवर्तन घडविण्याचा कोठेही विचार दिसत नाही, ही गोष्ट नुकसानकारक आहे. यामुळे नक्षलवाद नष्ट होण्याऐवजी तो अधिकच पसरेल, सर्वसामान्य जनतेच्या भावना अधिकच भडकतील. सद्यःस्थितीत भूमी सुधारणा कायदा लागू करून नक्षलवादाचा प्रश्न सुटेल अशी स्थिती नाही. शेतीमालाचे भावही स्थिर ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे. वाढत्या संख्येमुळे जमिनीचे तुकडेही पडत आहेत. यामुळे भूमी सुधारणेबरोबरच रोजगाराचेही विविध पर्याय उपलब्ध करण्याचे धोरण राबविण्याची नितांत गरज आहे. 


तसेच नक्षलवाद्यांना जेथून रसद पुरविली जाते ती तोडायला पाहिजे. ज्या राजकीय मंडळींचा नक्षलवाद्यांशी हितसंबंध आहे त्यांना शोध घेऊन त्यांना योग्य त्या वाटाघाटीसाठी तयार करणे गरजेचे आहे. दारिद्रयात खितपत पडलेल्या  (नक्षलग्रस्त भागातील) जनतेला त्यातून बाहेर काढणे, त्यासाठी सरकारी योजना अत्यंत सचोटीने, काटेकोरपणे राबवायला हव्यात. पोलीस आणि जवान नक्षलवाद्यांना भारी पडतील असे पोलीसांना प्रशिक्षण देऊन अत्यंत प्रगत सजो शस्त्रे पुरविली पाहिजेत. शिवरायांसारखे गनिमी कावे करून दहशतवाद पसरविणाऱ्या नक्षलवाद्यांना जेरीस आणायला हवे. देशाला हितोपयोगी ठरतील अशा मोहीम तथा कार्यक्रम राबविण्यासाठी नक्षलवाद्यांविरोधी कठोर पावले उचलायला हवीत. नक्षलवादी जे गुरील्ला युद्ध खेळतात ते ओळखून त्यांना  काटशह देण्यासाठी आपल्या पोलीसांनी आणि जवानांनी सदैव सजग राहून नक्षलवाद्यांचा निःपात केला पाहिजे. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या