Ticker

10/recent/ticker-posts

देवा एकदा तू देवळाबाहेर येऊन तुझ्या डोळ्यांनीच बघ!

पैसासत्ताराजकारण आणि स्वार्थ या सर्वात देवळं अडकली आहेत


आजकाल जेथे पाहावं तेथे देवधर्माचा पगडा वाढताना दिसतोय. म्हणून माणूस फार नैतिकतेने वागू लागला असे मात्र नाही. उलट नैतिकता आणि धार्मिकता यांचा काहीच संबंध नाही असे वाटू लागते. माणूस फार धार्मिक असला तर तो नीतिमान असेलच असे नाही. उलट कदाचित तो अनैतिक आणि काळाबाजार करण्याचीच जास्त शक्यता असते. साईबाबा, तिरूपती बालाजी आदी देवतांच्या मंदिरांत कोट्यवधींच्या देणग्या दिल्या जातात. त्या देणग्या गुप्त असतात. देणाऱ्याचे नाव कळत नाही. किलो किलोचे सोन्याचे मुकूट आणि दागिने या देवांना दिले जातात. हा सारा पैसा केवळ भक्तिपोटीच नव्हे तर काळा पैसा पांढरा करणे आणि देव देव करून मनातील साऱ्या काळ्या धंद्यामुळे निर्माण झालेला अपराधीत्वाचा भाव कमी करणे हाच असतो


देवासाठी कुणी कष्टाचा एवढा पैसा देताना सहसा दिसत नाही. गावा-गावात वाढणारा बुवाबाजीचा धंदा, बुवांचे भरणारे दरबार आणि करोडोंची संपत्ती जी सतत वाढणारी, त्यांची आलिशान राहाणी, राजकीय नेत्यांची त्यांच्याशी वाढती जवळीक, मतांसाठी बुवाच्या भजनी लागलेले नेते, बुवा- अम्मा, माँ यांचे फोफावणारे मठ, टीव्ही- चॅनेलवर अध्यात्माचं एकदम बाजरू प्रस्थ, नवनव्या महाराजांचे चॅनेलवर प्रवचन आणि त्यांचा बहरणारा सांप्रदाय. गावागावात करोडो रुपये खर्च करून बांधली जाणारी देवळे असा हा बाजारूपणा म्हणजे धर्म वाढतो आहे असे लोकांनाही वाटत आहे, नव्हे ते त्यांना पटवून दिले जात आहे. लोकांच्या पैशांवर वर्गणी, चंदा जमवून उत्सव साजरे करण्याच्या टोळ्या वाढत आहेत आणि त्यांनाच धर्मरक्षक समजले जात आहे. याविरुद्ध बोलणारे हे धर्माचा विध्वंस करणारे ठरतात. त्यांना साऱ्या समाजात नावे ठेवली जातात. त्यांच्यावर धर्म बुडविल्याचा ठपका ठेवला जातो. याविरुद्ध लिहिणारे, बोलणारे, चित्र काढणारे कोणतीही अभिव्यक्ती करणारे वाईट ठरविले जातात. त्यांच्या बाजारूपणाबद्दल आवाज बंद पाडण्यासाठी देवळाची, मंदिराची टीव्हीवर बातमी द्यायची. लाखो लोक दर्शनाला आले इतका पैसा (कोटीत) जमा झाला. वर्तमानपत्रात बातम्या, फोटो हे सर्व पाहिलं की वाटतं, ज्या देवाने माणूस निर्माण केला, त्याला बुद्धी दिली, त्यानेच देवाला देवळात बंद केलं आणि त्याची जाहिरात करून पैसा गोळा करणं सुरू केलं आहे


लोकांच्या  श्रद्धेचा हा फायदा घेतला जात आहे. ज्या देवळात लाखोने लोक येतात, देवाच्या दर्शनासाठी तासनतास उभे राहतात. त्याच देवदर्शनासाठीही वेगळे पैसे मागितले जातात. पूर्वी देवळं असत. गावापुरती मर्यादित कुठे भपका नाही. विजेची रोषणाई नाही. की भक्तीचा बाजार नाही. भक्तीसाठीच माणस एकत्र यायची. आनंद लुटायची. त्या आनंदात स्वार्थाला थारा नव्हता. माणसांच्या रांगा नव्हत्यां आणि दानपेटीच्याही. कोण किती पैसे टाकतो; कोण किती दान करतो याकडे लक्ष नसे. कारण; सर्वच कष्ट करणारे! कुणाकडे पैसा असणार सोन्याचा मुकुट करून द्यायला किंवा लाखो, करोडो रुपये दानपेटीत टाकायला? सारं-कसं चालायचे ते फक्त भक्तीपोटी, आनंदासाठीअशी देवळं आताही असतील पण त्याचं प्रमाण, निश्चितच कमी आहे, म्हणूनच हल्लीच्या विजेच्या रोषणाईच्या चकाकणाऱ्या देवळात गर्दीत देवाचं दर्शन घ्यावं असं वाटतच नाही. 


खरंच एवढी रोषणाई, गर्दी, लाखो रुपये सोन्याचे दागिने देवाला हवेत..? देव मुळातच श्रीमंत आहे. हे सारं विश्व त्याच्या मालकीचं आहे. सारं काही लागतं ते फक्त माणसाला, देवाला नव्हे. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यातला लोकमान्य टिळकांचा केवढा उदात्त हेतू होता. आज त्याचे स्वरूप काय झाले आहे. पैसा, सत्ता, राजकारण आणि स्वार्थ या सर्वात देवळं अडकली आहेत. तेव्हा देवा आता तू देवळातून एकदा बाहेर येऊन तुझ्या डोळ्यांनीच बघ तुझ्या नावाखाली या सर्वांनी स्वत:ची तुंबडी भरण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. त्यांना सुबुद्धी दे. या सर्वांपासून अलिप्त होण्यासाठी त्यांना आशीर्वाद दे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या