Ticker

10/recent/ticker-posts

कायदा - सुव्यवस्थेचे धिंडवडे

मुंबईतील महालक्ष्मी भागातील शक्ती मिल कंपाऊड येथे एका इंग्रजी मासिकाच्या महिला छायाचित्रकारावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ती महिला छायाचित्रकार म्हणून महालक्ष्मी भागातील शक्ती मिलच्या परिसरात छायाचित्रे काढण्यासाठी गेली असता तिथे तिला धमकावून तिच्यावर पाच जणांनी पाशवी बलात्कार केला. एकेकाळी मुंबई हे महिलांसाठी अत्यंत सुरक्षित शहर म्हणून ओळखले जात होते. रात्रीच्या वेळेसही मुंबईतल्या महिला शहरात मनमोकळेपणाने फिरू शकत होत्या. पण, आता मात्र तशी स्थिती राहिली नाही. कारण काही दिवसांपुर्वीच मुंबईतील लोकलमध्ये एका परदेशी महिलेवर ब्लेडने वार करून तिच्याकडील पैसे लुटण्याचा प्रकार घडला होता. त्या घटनेच्या एक-दोन दिवस आधी एक महिला नर्सवर सकाळच्या वेळेस लोकलच्या महिला डब्यात विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला होता. पण, त्या महिलेने त्याचा जोरदार प्रतिकार केला आणि मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यामुळे पळून जात असलेल्या गुन्हेगाराला इतर प्रवाशांनी पकडले आणि पोलीसांच्या ताब्यात दिले. सदर नर्सच्या सावधानतेमुळे तो गुन्हेगार ताबोडतोब जेरबंद करता आला. 


मुंबईतल्या महिला कशा असुरक्षित आहेत याची चर्चा सुरू असतानाचा अशी सामूहिक बलात्काराची घटना घडावी हे धक्कादायक असून महाराष्ट्र पोलीसांच्या व गृहखात्याच्या प्रतिमेला कलंक फासणाऱ्या आहेत.नेहमीप्रमाणे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपींना लवकरात लवकर पकडू असे पोकळ आश्वासन महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी दिले आहे. महिलांवरील अत्याचाराची कुठलीही गंभीर घटना घडली की, सरकार लगेच गंभीर दखल घेते, अनेक उपाययोजनाही जाहीर करते. पोलीस यंत्रणाकामाला लागते. मात्र, काही दिवसांनी ‘ये रे माझ्या मागल्या’ सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होते. गुंडांवर पोलीसांचा धाक राहत नाही. परिणामी, अशा घटनांना ऊत येतो. 


महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणेचे नेमके दुखणे तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला सध्या पडला आहे. सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणावर कोरडे ओढण्याचा आणि जनसामांन्यांशी असलेली बांधिलकी जपण्याचा विरोधी पक्षातील नेत्यांचा अधिकार कुणीच नाकारणार नाही. परंतु संवेदनक्षमताच हरवून बसलेल्या सत्ताधाऱ्यांना काहीही आणि कितीही बोलेले तरी राज्यातील परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा करणेच आता भाबडेपणाचे ठरणार आहे. असेच दिवसेंदिवस महिलांवार वाढत असलेल्या घटनांवरून वाटते.


एकीकडे महिला पुरुषांच्या बरोबरीने समाजाच्या प्रवाहात येत असताना पुरुष अजूनही तिच्याकडे मादीच्याच नजरेने पाहतोय. स्त्री ही उपभोगाची वस्तू असून एखाद्या सावजाप्रमाणे तिला टिपून हेरायचं ही त्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे सारं चित्र पाहिल्यावर माणसाचं माणूस म्हणून आवश्यक असणारे संस्कारच हळूहळू ढासळत आहेत असं वाटल्यावाचून राहत नाही. पुरुषांची महिलांकडे पाहण्याची नजर जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत महिलांची सुरक्षितता धोक्यातच राहणार आहे. 


हे चित्र बदलण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. आपल्याकडील राजकारणी वेळ आली की, तेवढयापुरतं त्याविषयावर बोलतात. पण, नंतर पाणी वाहून गेल्यासारखंच वाटू लागतं. त्यावर बंधारा बांधून ते अडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नाहीत. आज गुन्हे करणाऱ्यांना भय वाटावं, अशी यंत्रणा आपल्याकडे अस्तित्वात नाही. अशा  गुन्हयांत अडकलेल्या गुन्हेगारांना शासन होण्यासाठी कायदे आहेत. पण, त्या कायद्यांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही. या पार्श्वभूमीवर बलात्कार, विनयभंग यांसारखे प्रकार रोखण्यासाठी नवनवीन कायदे करण्यापेक्षा आहेत त्याच कायद्यांची नीट अंमलबजावणी व्हायला हवी. कायद्यांतर्गत गुन्हेगाराला त्वरित शिक्षा होणं गरजेचं आहे. अन्यायाविरोधात चालवले जाणारे खटले हे जलदगती न्यायालयात चालवले जाऊन त्याअंतर्गत होणाऱ्या चौकशीत अधिकाधिक स्त्रीच्या बाजूने विचार व्हायला हवा. जी स्त्री अत्याचाराला बळी पडली आहे तिच्यासमक्षच अपराध्याला शिक्षा होण्याची गरज आहे. त्यामुळे तिचं खच्चीकरण होणार नाही. तिच्यावरील अन्यायाला मिळालेला न्यायच तिला जगण्याचं बळ देणारा ठरेल.  





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या