Ticker

10/recent/ticker-posts

आयुष्य किती दुमडायचं...?

पूर्वी संरक्षण बाहेरच्यांपासून करावं लागायचं
आता ते ‘आपल्या लोकांपासून करावं लागतंय...


स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करून पुरुषांनाही मागे टाकले असताना तिच्यामागची असुरक्षितता मात्र संपलेली नाही. आजही स्त्रीकडे एक भोगवस्तू किंवा खेळणे म्हणून पाहण्याची प्रवृत्ती कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवरून ही गोष्ट लक्षात येते. घरी दारी नुसती कुचंबणा...आज एकीकडे आपण महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत आहोत तर दुसरीकडे निर्मितीमधील एक महत्त्वाचा घटक असलेल्या स्त्रीला मात्र पुरेशी सुरक्षितता आरोग्य सेवा देऊ शकलेलो नाही. महिलांवरील अत्याचार, कामाच्या ठिकाणी होणारे त्यांचे लैंगिक शोषण, दलित महिलांच्या नग्न किंवा अर्धनग्न अवस्थेत धिंडी आणि सुशिक्षित समाजात सुद्धा त्यांना मिळणारी विषमतेची वागणूक हे सारे प्रकार वाढत चाललेले आहेत. कुणाकडे मागायची दाद.. ? सरकार काही करेल..? पोलीस अपराध्याला पकडतील, फार तर न्यायसंस्था त्याला दोषी ठरवेल आणि त्याला शिक्षा होईल. आणि कायद्याच्या पळवाटा पकडून ते अपराधी पुन्हा मोकाट सुटतील! पूर्वी जेव्हा देशावर बाहेरच्या लोकांची आक्रमणं व्हायची तेव्हा त्याच्या बळी आधी स्त्रियाच व्हायच्या. त्यांच्या शीलावरही ते आक्रमण व्हायचं. आज आपण स्वतंत्र झालोय पण इथली स्त्री आजही त्याच जमान्यात वावरतेय. फरक इतकाच की, पूर्वी संरक्षण बाहेरच्यांपासून करावं लागायचं, आता तेआपल्या लोकांपासून करावं लागतंय.


अलीकडच्या काळात विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी, सोनसाखळी चोरी, अॅसिड हल्ला, चोरटा स्पर्श करणे अशा घटनांमध्ये मोठया प्रमाणावर वाढ झालेली आहे. यापूर्वी स्त्रियांवर चार भिंतींच्या आत अत्याचार होत होते. पण, आता सार्वजनिक ठिकाणीही तिच्या अब्रूची  लक्तरे वेशीवर टांगण्यापर्यंत मजल गेली आहे. एखाद्या स्त्रीच्या बाबतीत असा गुन्हा घडला तर ती किंवा तिचे नातेवाईक अब्रूच्या भितीने त्या विषयी तक्रार करत नाहीत, हे गुन्हेगारांनी चांगले ओळखले आहे. त्यामुळेच स्त्रियांवरचे अत्याचार वाढीस लागले आहेत. मोठया वयाच्या स्त्रियांप्रमाणेच कोवळया मुलींवरही बलात्कार होत आहेत. अशा गुन्हयांना लहान मुली सहज बळी पडतात. त्यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण नाही आणि त्यांच्याकडे गुन्हेगाराला प्रतिकार करण्याचेही बळ नाही. असे प्रकार घरात सांगावेत तर त्याचीही भिती. त्यामुळे असे प्रकार अनेकदा समोर येत नाहीत.


बलात्कार होतात म्हणून काहीजण म्हणतात की, मुलींनी, महिलांनी तोकडे कपडे घालू नयेत, तर काहीजण म्हणतात सातच्या नंतर मुलींनी बाहेर फिरू नये. कुणाशी मैत्री करू नये. अहो, दवाखान्यातून मुलं पळवणंही सध्या वाढायला लागलंय. आता यावर तुमचं उत्तर काय? कि मुले होऊ देऊच नये? का, आणखी काय? सोनसाखळी चोरली जाऊ नये म्हणून बिनसाखळीचं जाणं? मूर्ती चोरीला जातेय म्हणून मूर्तीशिवाय मंदिर बंद ठेवणं आणि मुलं चोरीला जातात म्हणून इस्पितळात बाळंत होणं? शक्य आहे का? मध्यंतरी बसमध्ये बलात्कार झाला म्हणून बसवाल्यांसाठी काय नियम आले आठवा... एकाने रेल्वेतून मुलीला बाहेर फेकून दिले म्हणून रेल्वेचं काय झालं आठवा... अर्थात, उपाययोजना अत्यावश्यक असतात. त्यांना विरोध करण्याचं कारण नाही; पण उपाय करून गुन्हेगारी संपेल का..? की मूळ रोगाची कारणे शोधून ती संपवता येतील. प्रश्न तसाच राहतो आणि आपण मात्र लागतो दृष्याच्या मागं. दागिने घालण्याचेच बंद केल्यावर त्याची रस्त्यावर चोरी होणार नाही, या भाबडया आशावादात थोडं तथ्य आहे. पण चोर सराफी पेढयाही लुटतात. बॅंका लुटतात. लाॅकर्स लुटतात. घरात घुसूनही चोऱ्या करतात. उपायांच्या गर्दीतही चोऱ्या सुरूच आहेत की! कायदे करूनही छेडछाड, बलात्कार, अॅसिड हल्ले विनयभंग होतात, त्यामुळे इथे गरज आहे ती पुरूषांची मानसिकता बदलण्याची.


फॅशनेबल  कपडे वापरणाऱ्या मुली किंवा मोठया वयाच्या स्त्रिया पुरुषांच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडतात, असे सांगितले जाते. पण, मुलींनी तोकडे कपडे किंवा पाश्चात्य पद्धतीचे कपडे घातले तरी त्याचा अशा घटनांशी काही संबंध नाही. हे इथे खासकरून मला सांगावेसे वाटते. मोठमोठया शहरांत, ग्रामीण भागात आजही तीन वर्षांच्या मुलींवर, शाळकरी मुलीवर ते अगदी वयस्कर महिलांवरही बलात्कार होतात. फॅशन  करणाऱ्या गरीबांच्या मुलीही असे सावज ठरतात. अशा मुलींचे आईवडील रोजीरोटीसाठी कुणाच्या तरी शेतात जाऊन राबतात. अशावेळी त्या एकटया मुलीला गाठून तिला शिकार केले जाते. आपण आपल्या मुलांवर कोणते संस्कार करतोय याबद्दल किती पालक जागरूक आहेत? त्यांनी मुलींना समानतेची किमान सन्मानाची वागणूक द्यावी म्हणून आपण प्रयत्न करतो का? पण आज परिस्थिती अशी आहे की, मुलगी झाली की तिला समाजापासून घाबरण्याची, पुरुषांपासून स्वतःला वाचवण्याची शिकवण द्यावी लागतेय. कारण आज कोणत्याही वयाची बाई सुरक्षित राहिलेली नाही.


अमेरीका आणि युरोपमध्ये काही रस्त्यांवरून रात्री आठच्या पुढं प्रवास करायलाही बंदी आहे. बिहारमध्येही काही रस्त्यांवरून रात्री महिला प्रवास करीत नाहीत. ज्या मुलींवर महिलांवर असे प्रसंग ओढवतात... काय चूक आहे हो यात त्यांची? केवळ एवढीच की, ती अशा  देशात जन्माला आली जिथे कायद्याची कुणाला भिती उरली नाही? ती एका अशा समाजाचा भाग आहे ज्यात न्याय मागायची सोय नाही? की अशा लोकांमध्ये ती वावरत आहे ज्यांनी आपले डोळे बंद करून घेतले आहेत? महिलांनी आयुष्य किती दुमडायचं, किती दुमडायचं... आणि पर्समधल्या चोरकप्प्यात ठेवायचं...? काही मर्यादा आहे का नाही?


केवळ कायदे कडक करून, उपाय करून मूळ रोग संपणार आहे का? तरीही उपाय अयषस्वी आणि गुन्हेगार यषस्वी का होतात, याचा विचार एक प्रगत आणि सुसंस्कृत समाज म्हणून आपल्याला करावा लागणार आहे. दृष्याचं कवच भेदून मुळाला भिडावं लागणार आहे. विकृती, विकृती, विकृती की समाजाला लागलेली ही कीड? याच्यावर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे, नाही तर ही कीड संपूर्ण समाजरचनाच खाऊन टाकेल. महिलांना, मुलींना आता रस्त्यावरून फिरणे देखील मुष्कील होऊन गेले आहे. एक आई आपल्या मुलीसाठी रोज डोळयात तेल घालून तिची वाट बघत बसते; तीला षाष्वती नसते की, माझी चिमुरडी घरी सुरक्षित येईल म्हणून. तेव्हा तिला जन्माला घालणाÚया जन्मदात्रींनाच तिच्यासाठी एकत्र यावे लागेल. माता हिच तिचे सुरक्षाकवच बनले पाहिजे. गुन्हयाचा तपास करण्यासाठी मुलींनी, महिलांनी पुढे येऊन पोलीसंात तक्रार करणे गरजेचे आहे. तसेच मुख्यत्वे महिलांविशयीची पुरूशांची मानसिकता बदलण्यासाठी लैंगिकतेचे षाळेपासूनच धडे गिरवणे गरजेचे आहे.


अलीकडे आपले चांगले चालले आहे; दहशतवादी हल्ला झाला की, कडक कायदा हवा. बलात्कार झाला की, कडक कायदा हवा. भ्रष्टाचार वाढला की, कडक कायदा हवा. अस्तित्वात असलेल्या कायद्यांची योग्य अंमलबजावणी करायची नाही आणि मग ते दुबळे आहेत असे म्हणत बोंबलत फिरायचे, असा हा प्रकार आहे. बलात्कार, छेडछाड, विनयभंग असे प्रकार थांबवायचे असतील तर आपल्यापुढील आव्हान असेल ते म्हणजे पोलीस दल सक्षम करण्याचे ताबडतोब अशा पीडीत मुली, महिलांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर राहण्याचे जेणेकरून कायद्याच्या पळवाटा गुन्हेगाराला सापडणार नाहीत. परिणामी, गुन्हेगार गजाआड होतील. जेणेकरून, भविष्यात अशी कृत्ये करणारांना जरब बसेल मुलीबाळी आत्मसन्माने या भारतदेशात फिरतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या