Ticker

10/recent/ticker-posts

चमत्कार कसला डोंबल्याचा… हि तर हातचलाखी

बाराखडीतील कोणत्याही एका अक्षरावरून सुरू होत असलेल्या भारतातील एखाद्या गाव, शहरातून आवाज येऊ लागतो की, अमूक-अमूक बाबा आला आहे.  तो, मोठा तांत्रिक असून आजार-व्याधी, मुसीबत, तकलीफ त्याच्या आशीर्वादाने दूर पळून जातात. तो लोकांना सुखी,समाधानी बनवितो.  लगेच, ताबडतोब लाॅजमधील रूमवर भेटा...  त्याच्या चमत्काराच्या बाता हवेतून पसरायला लागल्या आणि त्या बाबाला बकरे मिळायला लागले.  लोकांच्या पिडा दूर झाल्या की, नाही ते माहित नाही.  पण, बाबा बनलेला तो माणूस मालदार बनून दुसऱ्या गाव शहरांत निघून गेला.


काही दिवसांपूर्वी मुंबईतील लोकल ट्रेनच्या डब्यांत अशा सिद्धि प्राप्त तांत्रिक बाबा-बुबांच्या जाहिराती बऱ्याच प्रमाणात पाहावयास मिळत होत्या. वर्तमानपत्रांत असायच्या. 'काळी जादू च्या उपासकांचे धंदे ज्यामुळे तेजीत आले होते.  लोकांच्या तक्रारी वाढल्या, लोकल टेªनचे प्रशासन खाते अचानक जागे (रेल्वे प्रशासन नेहमी तक्रारीनंतरच जागे होते, बाकी वेळेस झोपलेलेच असते) झाले आणि या जाहिराती रातोरात गायब झाल्या.

 

हे बाबा,बुवा फक्त पैसेच मागत नाहीत तर आपल्या बोलण्यात लोकांना गुंतवूण अडलेल्याला नरबळी करितासुद्धा विवश करतात. यौन शोषणही करतात. काही दिवसांपूर्वी बऱ्याचशा वर्तमानपत्रांत, टीव्हीवर बातम्यांचे किळस येईल असे समाचार ऐकावयास मिळाला, ज्यात एका तांत्रिकाच्या मदतीने मुंबईतील भेंडीबाजार येथे राहणाऱ्या एका सख्ख्या बापाने आपल्या मुलीवर बलात्कार केला होता. हे तर अडाणी, गावरान लोकच करतील अशी भावना प्रत्येकाची होईल पण शहरातील शिक्षित वर्गही अशी कृत्ये करतात हे या घटनेवरून सिद्ध होते.

 

मंतरलेले पाण्यापासून प्रश्नांचे निराकरण करणारा राजस्थानातील बापू नावाच्या मांत्रिकाचा गुन्हा उघडण्याआधी त्याचा जादूटोण्याचा धंदा जोमात चालला होता. हिन्दी फिल्मी दुनियेतील एका वेळेची स्टार जोडीदेखील मुलं होण्यासाठी या बापूने मंतरलेलं पाणी पित होती. आई-बाप होणं लांबच पण या बापून मंतरलेल्या पाण्याच्या जिवावर त्यांच्याकडून हजारो रूपये लुटले.

 

भारतीयांची कमनशिबी ही आहे की, त्यांचे सरकार कितीही मजबूत असो पण, धार्मिक विरोध झाला की तेही आपले एक पाऊल मागे घेते.  येथे शासन कसे असावे याचे एक सुंदर उदाहरण राजवी शायर मझलूमी जो पाजोद (पाजोद- जुन्या काळचा राजा) च्या दरबारी होता. एक दिवस एक गरीब गावकरी त्याच्याकडे गोंधळलेल्या अवस्थेत एक तक्रार घेऊन येतो. त्याला रोज रात्री त्याच्या चूलीतील राखेमधून कुंकवाने लिहिलेली एक चिट्ठी मिळायची की, अब्दुल चे लग्न कर. (अब्दुल - गावकऱ्याच्या मुलाचे नांव) चूलीच्या आजूबाजूला कुंकवाच्या हाताचे छापेदेखील असायचे. गावकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची, आता काय करायचे असा प्रश्न त्याला पडत असतो.  पाजोद ही केस हातात घेतो आणि शोधून काढतो की, गावकऱ्याच्या मुलगाच हे धंदे करत होता.  त्याने कुणाचे तरी बघून या गोष्टी आपल्या घरी चालू केल्या होत्या. देवदेवी अशाप्रकारे कुणालाही त्रास देत नाहीत हे पाजोदने सर्वांना समजावून सांगितले आणि अब्दुलचे पितळ उघडे पडले.

 

दुसऱ्या एका गोष्टीत एका गावात एक डोंबाऱ्याचा खेळ करणारे एक कुटुंब येते.  त्यांनी लोकांत एक गोष्ट पसरवली की, तुमच्या दुःखाचे कारण अमूक अमूक गावात राहणारी कुसूम नावाची बाईच गावाच्या हानीला कारणीभूत आहे.  ती चेटकीण आहे.  तीला गावातून हाकलून द्या.  दरबारी पाजोद याला ही गोष्ट माहित पडताच त्याने त्या डोंबारी कुटुंबाला बोलावून दम दिला.  'खबरदारअशा, अफवा पसरवाल तर!' तुम्हालाच या गावातून हाकलून देण्यात येईल.  यावर ते डोंबारी कुटुंब म्हणाले, आम्ही जेव्हा गावात आमचा खेळ केला त्यावेळेस त्या बाईने आम्हाला पैसे दिले नाहीत म्हणून आम्ही तिच्याविरूद्ध हा कट रचलाआम्हाला माफ करा.

 

काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे एक भाविक येऊन म्हणत होता, आमचा बाबा तर खरच देवाचं साक्षात रूप आहे.  चमत्कारी पुरूष आहे. तो आपल्या चमत्काराने शर्टाच्या बाहीमधून घडयाळ, चैन काढतो आणि ती भक्तांना प्रसादरूपे देतो. आता बोला. काय झालयं या लोकांना तेच कळत नाही. तुम्ही जर अशा  लोकांना म्हणाल तशी घडयाळे, चैनी काढतच जा, ज्यामुळे देशातील देव घटतील. लोक तुझेे दर्शन घेतील आणि देशातील घडयाळांचे कारखाने बंद करून तेथे दुसरे काहीतरी बनवू असे म्हटले तर त्यांना अपमानास्पद वाटेल. उलट तुमच्यावरच ते तुम्ही नास्तिक आहात, तुमच्यात सैतानी शक्ती आहे म्हणून तुम्ही असे बोलता आहात असा आरोप लावला जाईल.

 

नारळामधून कपडयाचा तुकडा काढून दाखविणे, हात चोळून राख काढणे यासारखे चमत्कार बाबा-बुवाच नाही. तर अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सदस्यदेखील करून दाखवितात म्हणजेच तो काही चमत्कार नाही तर हातचलाखीतील एक खेळ असतो. हे आपण वेळीच लक्षात घेतले पाहिजे. नाहीतर, आपण फसले गेलो आहोत असे वेळ गेल्यावर लक्षात येईल. तेव्हा अशा बाबा-बुवांपासून स्वतः सावध राहून इतरांनाही त्यांच्यापासून चार हात लांब राहण्यास सांगा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या