पालकांनो मुलांच्या प्रश्नांना उत्तरे द्या.
या वयात त्यांना काहीतरी नवीन जाणून घेण्याची इच्छा असते...
आदर्श आईबाप कसे असावेत याच्या वेगवेगळया व्याख्या कल्पना आहेत. या वेगवेगळया व्याख्या कल्पना पाहिल्या, वाचल्या की नुकतेच पालक झालेल्या लोकांच्या मनाचा गोंधळ उडतो. कोणाचे खरे मानायचे हे त्यांना कळत नाही. पालकनीतीबाबत अनेक गैरसमज आढळतात. ते दूर केल्याखेरीज चागंले पालक होता येणार नाही. मुलांना कसे वाढवायचे, त्यांच्यावर कोणते संस्कार करायचे याबाबत आपल्याला वेगवेगळी मते नेहमी ऐकू येतील. कोण म्हणते मुलांचे जास्त फाजील लाड करू नका, कोण म्हणते मुलांना फार स्वातंत्र्य देऊ नका तर कुणी म्हणते मुलांना मिलिट्रीसारखी शिस्त लावा.
कोण म्हणते मुलांच्या अंगाला अजिबात हात लावू नका, अशी वेगवेगळी मते ऐकून नुकतेच आई-बाबा झालेल्यांचे डोके चक्रावून जाते. कोणाकोणाचे ऐकायचे असे प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहतो. असा गोंधळ उडाल्यामुळे काही तज्ज्ञ लोकांची चाईल्ड फिजीकोलाॅजीची पुस्तके आणली जातात. तर काही जणांनी उत्तम पालक कसे व्हावे, आदर्श पालक असे व्हावे अशा अर्थाची पुस्तके लिहिलेली आहेत. ती वाचा, असे कोणीतरी सांगते. त्यामुळे तशा स्वरूपाची पुस्तके वाचायला सुरूवात होते. खरेतर मुलांना कसे वाढवायचे किंवा पालकनीतीबाबत विशिष्ट असा फॉर्मुला सांगता येणार नाही. मुलांना वाढवताना अमुक अमुक पद्धतीने वाढवा असा आग्रह धरून चालत नाही. मुलांना शिस्त लावली म्हणजे आपण आदर्श आई-बाप होतो. असा फार मोठा गैरसमज पालक मंडळींमध्ये आढळून येतो. त्यामुळे मुलांनी सहा वाजता उठलेच पाहिजे, आठ वाजता शाळेला जायला घराबाहेर पडले पाहिजे, संध्याकाळी सात वाजता अभ्यासाला बसलेच पाहिजे. असे फतवे आई-बाप काढत असतात. पण, मुलांवर ओझे लादताना त्याला मोकळा श्वास घेता येईल हेही पाहणे गरजेचे आहे.
मुलांना सारखे लेक्चर दिले, तर मुले सुधारतात- मुलांना सारखं काही तरी उपदेश देत राहणे काही मंडळींना आवडत असते. त्यामुळे येता-जाता, तू असे कर, तसे कर असे लेक्चर दिले जाते. आम्ही किती गरिबीत दिवस काढले, कशा परिस्थितीत मोठे झालो, असेही मुलांना सारखे सांगितले जाते. पण, अशा प्रकारचे लेक्चर देवून मुले कंटाळतात व आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत.
सध्या प्रत्येक परिस्थितीसाठी ज्ञानाची साधने उपलब्ध आहेत. जमेल तेव्हा मुलांना अर्थपूर्ण अनुभव द्या. त्यांच्या जिज्ञानेची प्रष्नांची उत्तरे द्या. अभ्यासक्रमाचं एखादं पुस्तक शिकविण्यापेक्षा अनुभवजन्य ज्ञान देणं केव्हाही सोपं आहे हे पालकांनी लक्षात घ्यावं. मुलं जसजशी मोठी होतात. तसतसे रोजच्या कामकाजातून ती सहजपणे शिकू शकतात. मुलगा जर सायकल घेऊन दुकानात खरेदीला गेला किंवा पिशवी घेऊन बाजार आणायला गेला तर वस्तूची खरेदी भाजीचे भाव किलोपासून पाव किलोपर्यंतचे दर अशा व्यवहारातील गोष्टींची समक्ष माहिती त्यांना होईल. त्याला प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव येतो. ही प्रत्यक्ष माहिती सुद्धा माणसाला मोठं शहाणपण शिकविते.
लहान मुलांना अनेक गोष्टींबद्दल प्रश्न पडतात. त्यामुळे हे असे का ते तसे का मग असे का होत नाही. असे झाल्यावर काय होईल, एक ना अनेक प्रश्न विचारून विषेशतः लहान मुले आई वडिलांना भंडावून सोडतात. बाहेरची दगदग, ऑफिसातला कामाचा व्याप यामुळे वैतागलेल्या अनेक पालकांना प्रश्नांची अशी सरबत्ती म्हणजे डोकेदुखी वाटते. पण, खरेतर ती रेफ्रेशमेंट एन्जाॅय करण्याची, लहानांच्या उत्साहासोबत आपणही पुन्हा ताजंतवानं होण्याची ती एक उत्तम संधी असते. तेव्हा पालकांनो मुलांच्या प्रश्नांना उत्तरे द्या. या वयात त्यांना काहीतरी नवीन जाणून घेण्याची इच्छा असते.
तुमच्यासोबत मुले प्रवास करीत असताना त्या सहवासाचा लाभ घ्या. आपण प्रवास करीत असलेल्या भागाची ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक माहिती मुलांना द्या. यामुळे प्रवास मजेशीर तर होईलच पण मुलांच्या ज्ञानातही भर पडेल.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.