Ticker

10/recent/ticker-posts

मुलांसमोर कसे वागावे याचा विचार पालकांनी करावा...

कधीकधी मुले आईवडीलांकडून चांगल्या सवयींबरोबर वाईट सवयी देखील शिकत असतात. पालकांच्या अयोग्य कृतीचा प्रभाव देखील मुलांवर पडत असतो...  

लहान मुले ही अनुकरण प्रिय असतात. मोठे जे करतात किंवा समोर जे बघतात त्याप्रमाणे ते कृती करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच भातूकली खेळायला, खोटा खोटा स्वयंपाक करायला, बाबांप्रमाणे ऑफिसला जाण्याचे खेळ खेळायला त्यांना खूप आवडते.  अशा गोष्टी त्यांना कुणीही  शिकविता ते अनुकरणाने शिकतात. प्रामुख्याने आई वडील हे त्यांचे रोल माॅडेल असतात.  त्यांच्या सवयी, व्यक्तिमत्व विकास बऱ्याच अंशी ते आईवडिलांकडून प्रभावित झालेले असतात. आई-वडीलांप्रमाणे अथवा घरातील इतरांप्रमाणे कृती करण्यात त्यांना मोठा आनंदा मिळतो. मात्र, ज्यावेळी मुले अयोग्य कृती करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी आईवडीलांना नक्कीच त्यांचा राग येतो. या मुलांना काय करावे, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होते. अशावेळी मुलांना मारण्यापुर्वी अथवा रागावण्यापुर्वी एकदा आत्मपरिक्षण करावे की ही गोष्ट मुले आपल्याकडून तर शिकली नाहीत ना! कारण कधी-कधी मुले आईवडीलांकडून चांगल्या सवयींबरोबर वाईट सवयी देखील शिकत असतात. पालकांच्या अयोग्य कृतीचा प्रभाव देखील मुलांवर पडत असतो. 

 

सध्या ८० ते ९० टक्के पालकांची ओरड आहे की, मुले टिव्ही समोरून उठत नाहीत. पण, मुलांना दोष देण्याआधी आपण दिवसातून किती वेळा टिव्ही पाहतो ते पालकांनी तपासून घ्यावे. घरातील आईच बराचसा वेळ टिव्हीवरील मालिका बघण्यात घालवत असेल तर मुलेही तेच करणार ना? आईबरोबर मुलेही टिव्ही बघू लागतात आणि नंतर आईच्या अनुपस्थितीतही मुले टिव्ही बघणे सुरू करतात. अती प्रमाणात टिव्ही बघितल्यामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर नकारात्मक फरक पडतो. अशा परिस्थितीत मुलांना टिव्ही बघू नका असा सल्ला देण्याऐवजी प्रथमतः स्वतःच्या सवयींवर नियंत्रण ठेवावे टिव्हीवरील कार्यक्रमांच्या वेळेस काही गंमतीशीर खेळात किंवा अभ्यासात मुलांना गुंतवावे, मुलांसमोर बरेचदा आपण अयोग्य शब्दांचा वापर करतो, मुलांना रागवतानाही अनेकदा अपशब्द तोंडातून निघतात.  मुले ते ऐकतात आणि शिकतात. मुलांनी एखाद्या वेळेस चुकून अयोग्य शब्दांचा उपयोग केला तर फारसे काळजीचे कारण नाही. मात्र, वारंवार असे शब्द तुम्ही मुलांसमोर वापरत असाल तर ते चुकीचे आहे.  चुकून तुमच्या तोंडातून अपशब्द निघाला तर मुलांना समजावून सांगा की, हा शब्द चुकून तोंडात आला आणि भविष्यात अशा शब्दांचा वापर पुन्हा होणार नाही

 

मुले बाहेरून असे काही शब्द शिकून येत असेल तर त्याला लगेच रागावण्याऐवजी प्रथम प्रेमाने समजवावे की, असे षब्द वापरणे चुकीचे आहे.  तुम्ही मुलांसमोर वारंवार चिडत असाल, भांडत असाल, मुले मस्ती करत असतील तर संयम ठेवून बोलण्याऐवजी त्याच्यावर हात उगारत असाल तर अशा  गोष्टींचाही मुलांवर परिणाम होतो. तुम्हाला वारंवार चिडताना बघून मुलेही तेच करतात. भाऊ,बहीण, मित्रांसोबत वाद झाल्यास त्यांचा लगेच संयम सुटतो आणि तो त्यांच्याशी भांडू लागतो. त्यांना मारतो.  अशावेळी आपले वागणे बदलण्याचा प्रयत्न करावा.  कमीतकमी मुलांसमोर तरी शांत डोक्याने काम करावे. चुकून भांडण झालेच तर तसे मुलाना समजावून सांगावे.  मी असे करायला नको होते असे कबूल करावे.  यामुळे ही गोष्ट चुकीची आहे असे मुलांच्या मनात ठसेल

 

खाण्याच्या सवयींचाही असाच प्रभाव मुलांवर पडत असतो. आईच जंकफुड, पॅकिग केलेले फूड खात असेल तर मुलेही तेच खाणार. मुलांसमोर शक्यतो असे पदार्थ खाऊ नयेत.  घरीच भाज्या वेगवेगळे बनवलेले पदार्थ स्वतः खावे आणि मुलांना तशी सवयही लावावी. घरचे पदार्थच थोडे आकर्षक सजवून मुलांसमोर ठेवले तर ते आनंदाने खातील. मुलांच्या सवयी त्यांच्या जडणघडणीत खूप महत्त्वाच्या असतातत्यामुळे त्या वेळेस बदलणं खूप गरजेचं असतं.  त्यासाठी पालकांनी नक्कीच प्रयत्न करायला हवेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या