Ticker

10/recent/ticker-posts

दूध अमृत की विष ..?

दुधात भेसळ करणाऱ्याच्या दुकानांचे परवाने रद्द करून त्यांना कठोर शिक्षा करणे गरजेचे आहे


माणसाच्या आयुष्यात दुधाला फार महत्त्व आहे. केवळ भारतातच नव्हे, तर अन्य राष्ट्रांतही दुधाचे महत्त्व अबाधित आहे. पण गेल्या काही वर्षांपासून भारतात मोठ्या प्रमाणावर दुधामध्ये भेसळ करण्याचे प्रमाण वाढले आहे. इतर अनेक पदार्थांमध्ये ज्याप्रमाणे भेसळ केली जाते, अगदी तशीच ती आता दुधामध्येही होताना दिसून येत आहे. एखाद्या ठिकाणी अशी भेसळकेली गेली की, त्याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध होतात. अशा बातम्यांची आपल्याला आता इतकी सवय झाली आहे  की, त्याविषयी काहीच वाटत नाही. आतापर्यंत करण्यात आलेल्या दुधाच्या तपासणीमध्ये युरियासाखर, स्टार्च पावडरची भेसळ झाल्याचे उघड झाले आहे. असे प्रकार करणाऱ्या  वा किरकोळ कारवाई होत असल्यामुळेच संबंधित संस्था पुन्हा पुन्हा दुधात भेसळ करत आहेत. त्यांच्यावर कायमस्वरूपी वचक बसविण्यासाठी ठोस कारवाई होणे आवश्यक आहे. अशा प्रकारे दूध भेसळ करणाऱ्यांवर अन्नभेसळ नियंत्रण कायदा १९५४ नुसार कारवाई होऊ शकते. तथापि, ती होत नाही आणि त्यामुळे भेसळ करणाऱ्याचे चांगलेचं फावते


भेसळयुक्त दूध सर्वासाठीच घातक आहे. गर्भवती महिला, गर्भातील भ्रूण, हृदय आणि किडनीचे विकार असलेल्या लोकांसाठी भेसळयुक्त दूध अतिशय धोकादायक आहे, हे दूध राजस्थान, महाराष्ट्रासह, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक इत्यादी अनेक राज्यांमध्ये तयार होते. युरिया, कॉस्टिक सोडा, रिफाईंड तेल, शॅम्पू, डिटर्जट पावडर वापरून हे दूध तयार होते. या दुधामुळे शरिराला कोणताही फायदा होत नाही. उलट त्यापासून धोकाच अधिक संभवतो. हे दूध तयार करण्यासाठीचा खर्च हा अत्यल्प असतो. पण, त्यापासून मोठा फायदा मिळवला जातो. असे प्रकार करून आपण नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहोत, याचे भान या मंडळींना नसते


दुधात कशाची भेसळ होते 

दुधात पाण्याची भेसळ होते. त्यावेळी विक्रेते दुधाचा घट्टपणा आणि घनता वाढवण्यासाठी दुधात पीठ, मैदा, शिंगाड्याची पावडर, स्टार्च अशा पिष्टमय पदार्थांची भेसळ करतात. दुधातील पाण्याची भेसळ ग्राहकाला समजू नये, म्हणून दुधात साखरही मिसळली जाते. दूध लवकर आंबट होऊ नये म्हणून किंवा दूध फाटू नये म्हणून तसेच बरेच विक्रेते कृत्रिम दूध निर्मितीसाठी रसायनांचाही वापर करतात. केवळ भेसळच नव्हे, तर दुधाची फॅट आणि डिग्री वाढवण्यासाठी विविध युक्त्याही शोधून काढल्या जात आहेत. युरिया, पामतेल, खोबरेल तेल, कपड्यांची पावडर यासह गूळ, साखर आदींची भेसळही मोठ्या प्रमाणावर होत आहे. काहींनी तर पिशव्यांतून इंजेक्शनच्या सुईद्वारे दूध त्यामध्ये तेवढेच पाणी मिसळण्याचा उद्योगही चालविला आहे


भेसळयुक्त दुधाचे दुष्परिणाम 

भेसळयुक्त दुधाच्या सेवनाने मानवी आतड्याला इजा पोहोचू शकते. त्याचप्रमाणे उलट्या - जुलाब, मळमळ होण्याचे प्रकार वाढतात. अशा दुधामुळे लहान मुलांची रोग प्रतिकारशक्‍ती कमी होऊ शकते. तसेच भेसळयुक्त दुधामुळे हृदयविकाराला निमंत्रण मिळते. डोळ्यांचे त्रास संभवतात. मधुमेहाचा विकार जडू शकतो. स्मरणशक्‍तीवर परिणाम होऊ शकतो. दुधात ग्लुकोजची भेसळ असल्यास असे दूध मधुमेह असणाऱ्याना धोकादायक बनते. दुधामध्ये पाण्याची भेसळ असेल, तर त्यामुळे शरिराला आवश्यक असणाऱ्या प्रमाणात कॅलरी मिळणार नाहीत. त्यामुळे मुलांच्या आगेग्यावर त्याचा दुष्परिणाम झालेला आढळतो. मुलांचे वजन आणि त्यांच्या शारीरिक वाढीवरही त्याचा विपरित परिणाम झालेला दिसतो


कशी ओळखाल दुधातील भेसळ 

दूध भेसळयुक्त आहे की, नाही हे ओळखण्याची काही तंत्रे आहेत. त्यासाठी दहा मिलि. दूध एका थाळीत घेऊन त्यामध्ये आयोडिनचे काही थेंब टाकावेत. दुधाचा रंग निळा झाला. तर त्यामध्ये स्टार्च मिसळले आहे, हे ओळखावे. दुधामध्ये पाणी मिसळलेले असेल, तर त्याचे थेंब एका जागी थांबता, पाणी वाहते त्याप्रमाणे सरकतील. दुधात युरिया मिसळला आहे की, नाही हे परीक्षा नळीद्वारे ओळखता येते. त्यासाठी परीक्षा नळीमध्ये पाच मिली. दूध घ्यावे. त्यामध्ये काही थेंब ब्रोमोथायमल ब्ल्यू सोल्यूशन टाकावे, त्यामध्ये युरियाची भेसळ असेल, तर दहा मिनिटांत त्याचा रंग निळा होईल.

 

भेसळयुक्त दूध विकणे हे स्लो पॉयझर्निंगचं आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पण, दूधमाफिया आणि सत्ताधाऱ्यांच्या अभयामुळेच सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार सुरू आहे. त्यासाठी दुधात भेसळ करणाऱ्याच्या दुकानांचे परवाने रद्द करून त्यांना कठोर शिक्षा करणे गरजेचे आहे. हा भेसळयुक्त धंदा केवळ दुधापर्यंतच मर्यादित नसून, भेसळयुक्त दुधापासून मिठाई तयार करण्याचे कामही भेसळखोरांकडून केलं जातंय. परंतु त्याविषयी संघटितपणे, सातत्यपूर्ण आवाज उठवला जात नाही, तोपर्यंत हा विषारी विळखा सुटणार नाही.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या