प्रत्येकाने ठरवायचंय की, आपले शरीर सिगारेट, तंबाखूच्या ताब्यात द्यायचे की, त्यापासून दूर राहायचे...
माझ्या ऑफिसमधला एक शिपाई, कामात एकदम हुशार पटापटा कामे आटोपून मध्येच कुठेतरी निघून जातो. इतरांना विचारले असता समजले की, त्याला सिगारेटची सवय लागली आहे. सिगारेट ओढण्यासाठी तो अर्ध्या ते एक तासाने ऑफिसच्या बाहेर जाऊन सिगारेट ओढून येतो. २ दिवस मीही त्याचा माग काढत जाऊन पाहिले तर काय सिगारेट ओढताना त्याला मधून मधून खोकल्याची उबळ येत होती. दुसर्या हाताने रुमालाने तोंडातून गळत असलेली लाळ पुसत पुसतच तो मला म्हणाला, 'दादा, मला सिगारेट ओढल्याशिवाय जमतच नाही; नाही ओढली तर काम करताना घाम येतो व हातपाय थरथरतात. कितीतरी प्रयत्न केले पण पाय तिकडे वळतातच'. त्याला सिगारेटचे दुष्परिणाम समजावून सांगितले असता, समजले की, दिवसातून १०-१५ सिगारेट ओढल्याशिवाय त्याचे कामात मन रमत नाही.
टीव्ही, चित्रपट इतकंच काय त्या सिगारेटच्या मोठ्या अक्षरांत 'तंबाखू जानलेवा है, स्मोकिंग इज इंजिरिअस टू हेल्थ', सिगारेट पिणे सिगारेट आरोग्यास हानिकारक आहे, असं लिहिलेलं असतं. त्यात ते जाहिरातवाले तर सिगारेट मरणाला टेकलेला ऐन तारुण्यातला, पंचविशितलाच तरुण दाखवतात, काही तर हृदयाचे २ तुकडे करून त्यातून भळाभळा बाहेर पडणारा निकोटिनही दाखवतात. हे सर्व बघून अंगावर सर्रकन् काटा येतो खरा; पण हे खरंच असं होतं की, फक्त आपल्याला घाबरवण्यासाठी ही मंडळी असं काहीतरी भयानक दाखवतात, असा विचार मनात येतो. कारण एवढं सगळं दाखवूनही चांगली शिकली सवरलेल्या मंडळींचा सिंगारेटशिवाय दिवस जाऊ शकत नाही याला काय म्हणायचे.
गाढवासारखा
प्राणीही ज्या विषारी वनस्पतींच्या पानालाही तोंड
लावत नाही, ती वनस्पती नक्कीच
जानलेवा असेल, नाही का? फक्त थ्रील किंवा फॅशन म्हणून स्मोकिंग सुरू केलेल्या दोस्तांनो
सिगारेटमुळे मर्दानगी येते, फ्रेश वाटतं हे सबकुछ झुठ...! या बोटभर सिगारेटने इम्प्रेशन
मारता येतं, असे जर का तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे; कारण रोज सिगारेट
पिणाऱ्या व्यक्तीच्या दातांना हळूहळू दाट असा पिवळा रंग चढू लागतो. स्मोकिंग करणाऱ्या
स्मोकरच्या तोंडाला नेहमीच एक उग्र असा वास येतो.
एका विशिष्ट कालावधीनंतर खोकल्याची प्रचंड उबळ येऊ लागते. ओठ काळे पडू लागतात. सिगारेट पिण्याचा क्रम जरी चुकला तरी छातीत जळजळ सुरू होते. पाण्याचे १० ग्लास पिऊनही ही आग थांबत नाही; कारण ती आग असते 'निकोटीन'च्या व्यसनाची, निकोटिनच्या अतिसेवनामुळे आयुष्याला पडणारा कॅन्सरचा विळखा अधिकाधिक घट्ट होऊ लागतो. त्यामुळे हे व्यसन तोंड, नाक, घसा, छाती, पोट या अवयवांचा कॅन्सर होऊन आपला जीव घेऊ शकते. कधी हृदयाचा झटका येणे किंवा अस्थमा यावरही जाऊन पोहोचतो. सिगारेटची चटक लागताच प्रत्येक दिवसाची सुरुवात एखाद्या झुरक्याशिवाय करताच येत नाही. एखादी साधारण वजनाची वस्तू उचलताना देखील संपूर्ण शरीरातून घामाच्या धारा वाहू लागतात व प्रचंड धाप लागते. हे होतं सगळं निकोटिनच्या अतिव्यसनामुळे. निकोटीन तुमच्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी करतं, त्यामुळे कामात साध्या-साध्या चुका झाल्या तरी काळीज धडधडू लागतं, प्रचंड प्रमाणात भीती वाटते. श्वसनाचा त्रास जाणवू लागतो. त्यातूनच बेचैनी वाढत जाते आणि एकाग्रता साधता येत नाही.
सिगारेट फुंकल्याशिवाय काही काम सुचतच नाही. या गैरसमजामुळेच कित्येकांचे सिगारेट फुकून-फुकून शरीराचे पोकळ सांगाडेही झाले आहेत. आपल्या तरुणांसाठी किंवा इतरांसाठी समोर दिसत असलेली फुंकलेली ५ ते १० रुपयांची सिगारेट म्हणजे 'नल्ला' गोष्ट आहे; परंतु हीच छोटीशी सिगारेट आपल्या आयुष्यात एक महाभयंकर जीवन-मरणाचं युद्ध घडवून आणते. परिणामी, भावी पिढीच्या आरोग्याची धूळधाण होत आहे. सर्व तंबाखूजन्य आजार व अकाली मृत्यू टाळता येण्याजोगे आहेत. तेव्हा प्रत्येकानेच ठरवायचंय की, आपले शरीर सिगारेट, तंबाखूच्या ताब्यात द्यायचे की, त्यापासून दूर राहायचे. चॉइस इज युवर्स.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.