Ticker

10/recent/ticker-posts

निसर्गरक्षकांच्या संरक्षणाची गरज

पर्यावरण संवर्धनात मृत प्राण्यांच्या संवर्धनात मृत प्राण्यांच्या अवषेशांची विल्हेवाट 
लावण्यात गिधाडे महत्त्वाची भूमिका बजावतात... 


गिधाड... डोक्यावर यमदूत फिरत असल्याप्रमाणे बरोबर एखाद्या प्राण्याच्या मृत्यूच्या वेळेआधी घृणास्पद आणि किळसवाणा असा पक्षी. मेलेल्या सडक्या मृतदेहाचे लचके तोडत थाटात पोटात ढकलणारी गिधाडं आपल्या दृष्टीने कितीही घाणेरडी असली तरी ती निसर्गरक्षक आहेत. याची जाणीव फारच कमी जणांना असते.  गिधाडंच नसती तर ज्या प्राण्यांच्या मृतदेहांवर गिधाडं जगतात, त्या प्राण्यांचे मृतदेह असेच सडले तर काय होईल..?  रोगराई पसरेल.  हे आपलं साधं उत्तर. पण, त्यामुळे निर्माण होणारा धोका अजूनही आपल्या लक्षात आलेला नाही. कधी काळी कोटींच्यावर असलेली गिधाडांची संख्या गेल्या काही वर्षांत इतकी झपाटयाने रोडावली की, आता भारतातून गिधाडं नामषेश होणार की काय, अशी भिती सतावत आहे. 


संपूर्ण भारतात नगरपालिकांद्वारे केरकचरा, घाण, घनकचरा, ओला कचरा, सुका कचरा गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्याचे काम करीत असतात, तर गावच्या ठिकाणी नगरपरिशदा, नगरपंचायत व ग्रामपंचायत ही कामे करीत असतात.  परंतु काम करता करता मध्येच लाक्षणिक संप, बेमुदत संप असे विविध प्रकारचे संप जाहीर करून ते वेळोवेळी जनतेला वेठीस धरतात. परंतु निसर्गाचे तसे नाही. निसर्गात स्वच्छता कायम राखण्याचे कार्य सतत सुरू असते. हे महत्त्वाचे काम जसे कावळे करीत असतात म्हणजेच उंदीर, घुषी, पाली, सरडे असे इतर प्राणी मृत पावले असता त्यांची विल्हेवाट लावून स्वच्छता राखण्याचे काम करीत असतात. पण, हे झाले लहान स्वच्छतेबद्दल. अशीच मोठमोठी जनावरे, गाई, म्हषी, रानरेडे व इतर मोठे प्राणी जेव्हा मृत पावतात तेव्हा त्यांची संपूर्णपणे विल्हेवाट लावून स्वच्छता ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य ही गिधाडे अविरतपणे करीत असतात. गिधाडांची संख्या घटण्याचं कारण पूर्वीही डायक्लोफिनॅक होतं आणि आताही तेच आहे. वेदनाशमक डायक्लोफिनॅक लस दिलेल्या गुरांचा मृत्यू झाल्यानंतर त्या प्राण्याचं मांस गिधाडांनी खाल्ल्यास गिधाडांचं मूत्रपिंड निकामी होतं आणि २४ तासांच्या आतच ती दगावतात. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर २००६ मध्ये भारत, पाकिस्तान आणि केरळ सरकारने या लसीवर बंदी घातली. 


डायक्लोफिनॅकचा अंश  असलेल्या मृत गुरांच्या संख्येत २००७ ते २००८ या कालावधीत ४० टक्क्यांनी घट झाली. पण, जोपर्यंत गुरांच्या शरीरातील या लसीचा अंश पूर्णपणे नष्ट होत नाही. तोपर्यंत गिधाडांचे जीव जातच राहतील. असं स्पष्ट मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. या लसीऐवजी मेलोक्सीकॅक हे औषध गुरांसाठी वेदनाशामक म्हणून वापरावं असं सूचित करण्यात आलं.  हे औषध गिधाडांसाठी सुरक्षित असल्यानं सरकारनेच त्याच्या वापरासाठी प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. त्यासाठी काही उपायांची पूर्तता होणे गरजेचे आहे. 


प्रादूर्भाव होऊन मृत पावणाऱ्या डायक्लोफिनॅक इंजेक्शनचा वापर त्वरित थांबवावा. विविध फलक, हँडबिल चित्रपटांद्वारे या विषयाची गंभीरता जनसामांन्यात आकाशवाणी, विविध चॅनेलस्, वृत्तपत्र यांच्यामार्फत समाजासमोर पुरवावी.  जेणेकरून, समाजामध्ये याविषयी जागरूकता निर्माण होईल. दरवर्षी महाराष्ट्र सरकारने पक्षीमित्रांच्या सहकार्याने जुलै -ऑगस्ट महिन्यातील गिधाडांच्या संख्येचा अहवाल तयार करून तो परिपत्रकाद्वारे जाहीर करावा. मृत पावलेल्या आणि नष्ट झालेल्या गिधाडांची संख्या पूर्वीसारखी कशी तयार करता येईल याविषयीही गांभीर्याने विचार करून जिल्हानिहाय गिधाड प्रजनन केंद्र उभारावीत. गिधाडांना व त्यांच्या पिलांना संपूर्ण संरक्षण मिळेल या दृष्टीने नवीन उपाययोजना तसेच नियमावली तयार करावी. 


मुंबईतील देवनार तसेच इतर बेकायदेशीर चालविण्यात येणारे कत्तलखाने तसेच अमरावती, नागपूर आणि विविध जिल्हयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या कत्तलखान्यांमुळे गिधाडांना त्यांचे खाद्य मिळत नाही आणि त्यामुळेदेखील गिधाडांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत चाललेले आहे. पर्यावरण संवर्धनात मृत प्राण्यांच्या संवर्धनात मृत प्राण्यांच्या अवषेशांची विल्हेवाट लावण्यात गिधाडे महत्त्वाची भूमिका बजावतात.  २० मिनिटांत गिधाडांच्या झुंडी ५०० किलो मांस फस्त करीत असल्याने निसर्गाचा समतोल राखला जातो. मात्र, गेल्या काही वर्षात शिकार, विषप्रयोग, अन्नाची कमतरता यामुळे गिधाडांची संख्या वेगाने कमी होत आहे.  त्यामुळे निसर्गाचा समतोल आणि साखळी बिघडून मानवाच्या अस्तित्वाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. निसर्गातील पक्षी, विविध रंगांचे प्राणी, जंगले, नद्या, वनसंपदा, जैविक विविधता तसेच डोंगर हे एकदा का नष्ट झाल्या की, मनुष्याला एकटे राहाणे कठीण होऊन बसेल. कारण मनुष्य हादेखील निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहे हे त्याने विसरता कामा नये.  हे सारे जर नष्ट झाले तर काय होईल याचा अगदी मनापासून प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या