-दादासाहेब येंधे
आपण आपल्या स्वत:च्या आरोग्याची जेवढी काळजी घेतो, तेवढी आपल्या राहत्या घराची म्हणजे इमारतीची काळजी घेत नाही, हे तुमच्या लक्षात आलंय का? इथे काळजी घेणं म्हणजे बाहेरून रंग लावणे, आतमध्ये पेंटिंग करणे, दिवे-पंखे लावणं, एवढंच मला अभिप्रेत नाही. इमारतीची काळजी म्हणजे बांधकामाची निगा आणि त्यादृष्टीने लागणारी पावलं उचलणं, साधी गोष्ट असते. आपल्या राहत्या इमारतीला-बाहेरून विशिष्ट ठिकाणी बुरशी येत असते. त्या ठिकाणी पानवनस्पती उगवत असतात. भिंतींच्या कोपऱ्यामध्ये पिंपळासारखे भक्कम वृक्षही बाह्यरूपामध्ये आलेले असतात. घराला तडा जाणं, भेगा पडणं, ओल येणं, एखादी फरशी उखडून येणं, पायरी डगमगणं हे प्रकार नेहमीचेच. म्हटलं तर किरकोळ! पण इमारत जूनी होतेय, हळूहळू नाशाच्या दिशेने हा संदेश देणाऱ्या.
आपण मात्र ते संदेश गांभीर्याने घेत नाही. उगाचच मनाने काहीतरी अर्धेमुर्धे उपचार करायला जातो. तज्ज्ञांचा सल्ला घेत नाही. गच्चीवरच्या फरश्यामंध्ये किंवा कोळ्यामध्ये भेगा पडतात. त्यात डांबर गरम करून ओतलं की, काम झालं, असं अनेकांना वाटतं. थोडे दिवस गळती थांबतेसुद्धा; पण नंतर उन्हाळा वाढला, तर गच्ची तापते. डांबर तापतं, पातळ होतं. भेगांना दोन्ही बाजूंनी ढकलून ढकलून त्या मोठ्या करतं. रात्रीचं तापमान कमी झालं, थंडी वाढली की, हेच डांबर आकुंचन पावतं. भेगांचा आकार तोच राहतो; पण आतला डांबराचा भाग लहान होतो. म्हणजे पुढच्या पावसाळ्यात जास्त गळती होणं हे ठरलेलं आहे. अनेक जुन्या इमारतींमधल जुनं फ्लोअरिंग रहिवाशी बदलायला जातात. सगळी फरशी उखडून ठेवतात; ठोकाठोक करतात. तो बदल, ठोकाठोक झेलण्याची ताकद त्या इमारतीत आहे की नाही, हे काही बघत नाहीत. भिंतीतून कुठेही झुडूप किंवा रोपटं येताना दिसलं की, रहिवाशी घाईघाईने त्याच्या मुळाशी ऍसिड टाकतात. रोप तर मरतं, पण या ऍसिडचा आतल्या लोखंडी कांबीवर काही परिणाम होतोय का, हे कोण बघणार? रोप नुसतं हाताने उपटलं, तर पुन्हापुन्हा येऊ शकतं; पण त्याच्या मुळाशी घालण्यासाठी सिमेंट-मॉर्टरचं एक प्रकारच संयुग बाजारात मिळतं. ते कुठं घ्यावं, किती घालावं, हा सल्ला तज्ज्ञच देऊ शकतात.
बुरशी विरोधी रसायनं असतात, लीकप्रूफ म्हणजे गळती थांबवणारी उत्पादनं असतात. इमारतीत कुठेही ओल दिसली तर तेवढं पाणी पुसणं पुरेसं नाही. पाणी कुठून, झिरपतय, कुठे मुरतंय, ओलीचा उगम कुठे आहे, हे बघायला पाहिजे. त्या दृष्टीने कायमस्वरूपी उपायाच करायाला पाहिजे. वरवरची मलमपट्टी उपयोगी नसते. परिणामी, आतलं दुखणं वाढत जातं. त्यामुळे पाण्याच्या गळतीचं किंवा पाझरण्याचं कारण काहीही असलं, तरी ते ताबडतोब थांबवले पाहिजे. कारण अखेरीस हा रोग एखाद्या कँसरप्रमाणे पसरत जाऊन इमारतीच्या आयुष्याला धोका निर्माण करतो. भेगा आणि गळतीच्या या तक्रारीसंदर्भात पुढील उपाययोजना करता येतील. बीम कॉलम इत्यादी भागांमध्ये मुळात पाण्याचा पाझर किंवा गळती होऊच नये, याची काळजी इमारतीच्या बांधकामापासूनच घेतली गेली पाहिजे.
त्यामुळे नवीन घर घेताना जर लगेचच त्यात राहायला जायची घाई नसेल, तर शक्यतो बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत घर घ्यावं. कारण प्लॅस्टर लावून दोष झाकले जाण्याआधी विटांच्या किंवा काँक्रिटच्या बांधकामाचा दर्जा तपासून घेता येतो. आपण राहत असलेल्या इमारतीत आपल्या घरातले पाण्याचे किंवा सांडपाण्याचे नळ यातून गळती होणार नाही, याची काळजी घ्यावी. विशेषत: भिंतीआड असलेल्या कन्सिल्ड पाईपसंबंधी ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. फ्लोअरिंगच्या जुन्या लाद्या उखडून त्याजागी नव्या लाद्या बसवण्यासाठी इमारतीचं वय, तिची स्ट्रक्चरल परिस्थिती आणि ताकद लक्षात घ्यावी. एखादी इमारत पडली, दुर्घटना झाली तर अनेकांच्या जीवाला धोका होतो. मालमत्तेवर संकट येतं. यासाठीच वेळोवेळी जसा देहाला डॉक्टरी आधार हवा; तसंच इमारतींचंही आरोग्य जपायला हवं, सांभाळायला हवं. इमारत एकदा बांधली की झालं, पुढे तिचं काही करायलां नको, असं मनातून काढून टाका. कुठेही ओल दिसली, तर त्या पाण्याचा उगम शोधून काढून उगमापासून ते पाणी थांबवावं. पाणी दिसेल त्या ठिकाणी केवळ स्थानिक उपाय करू नयेत. वरीलप्रकारे जर काळजी घेतली गेली, तर आपली घरं ही खरेखरच पावसाळ्यातही आपल्याला निवारा देऊन पावसाळे सुसह्य होतील आणि इमारतीत एखादा अपघात घडल्याच्या बातम्या येणार नाहीत.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.