Ticker

10/recent/ticker-posts

वर्तन सुधारणे गरजेचे

मुंबई ,पुणे, ठाणेच काय संपूर्ण भारतातच सर्वसामान्य नागरिकांसाठी ऑटोरिक्षा या प्रवासासाठीअपरिहार्य ठरतात. तर आणीबाणीच्या वेळी टॅक्सीसुद्धा अनिवार्य ठरते. पण, प्रत्यक्षात रिक्षा, टॅक्सी पहिल्या फटक्यात इच्छित स्थळी जाण्यासाठी मिळणे हे वाळवंटात ओअँसिस मिळण्यागत आहे. त्याचप्रमाणे अव्वाच्या सव्वा भाडे आकारणारी रिक्षा-टॅक्सींची मीटर्स हा तर प्रवाशांसाठी डोकेदुखीचा विषय आहे. मुंबई व ठाण्यातील रिक्षांना एकमेकांच्या क्षेत्रात आणण्याची वाहतूक विभागाने परवानगी देऊनही रिक्षांनी ते नाकारणे हेही त्यांच्या मुजोरीपणाचेच लक्षण आहे.


वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर रिक्षा-टॅक्सींची भाडेवाढ अपरिहार्य असली तरी प्रवाशांना वेठीस न धरता वारंवार तपासली जावीत व त्यासाठी जागोजागी भरारी पथके असावीत, सर्वत्र रिक्षा-टॅक्सी स्टँड असावेत व. त्यावर उभ्या असलेल्या वाहनांनी प्रवासी घेतलेच पाहिजेत, अशी सक्ती असावी, त्याचे पालन व्हावे. रिक्षा-टॅक्सीचालकांना त्यांचे नाव, परमीट नंबर वाहनांवर लावणे सक्तीचे करावे. जेणेकरून, प्रवासी त्यांच्याविरुद्ध तक्रार करू शकतील. तरच भाडे नाकारणाऱ्या, रिक्षा-टॅक्सी रिकाम्या असल्या तरी न थांबता मुजोरीपणे पुढे निघून जाणाऱ्या रिक्षा टॅक्सीचालकांना जरब बसेल व ते त्यांचे अरेरावीचे वर्तन सुधारतील.


रिक्षा -टॅक्सीवाल्यांच्या गिऱ्हाईकांना उलटं उत्तरे देणे, जवळचे भाडे नाकारणे, अनोळखी गिऱ्हाईकास मुद्दाम लांबच्या रस्त्याने नेणे, विशेषत: ग्रामीण भागात परतीचे भाडे मिळत नसल्याचे कारण सांगून गिऱ्हाईकांकडून दामदुप्पट पैसे उकळणे अशा तक्रारी सर्रास ऐकावयास मिळतात. याचा त्रास विशेषत: वृद्ध स्त्रिया व अपंगांना फार मोठ्या प्रमाणात होतो. कधीकधी जास्त प्रवासी कोंबून स्वत:च उखळ पांढरं करताना प्रवाशांच्या सुरक्षिततेला तिलांजली दिली जाते. प्रवाशांना या ना त्या कारणावरून वेठीस धरणाऱ्या टॅक्सी -रिक्षाचालकांना प्रवासी व प्रवासी संघटनांनी बहिष्काराचं हत्यार उगारणं गरजेचे वाटतं. सर्वच टॅक्सी-रिक्षा वापरणाऱ्या प्रवाशांनी खंबीर मनाने किमान एक आठवडा तरी टॅक्सी-रिक्षावर बहिष्कार घालून व सार्वजनिक वाहनांचा जास्तीतजास्त वापर करावा. तसेच जेथे पायी चालत जाणे शक्य असेल तेथे पायी जावे वा शेजारच्या वाहनांचा फायदा घ्यावा. 


कारण काही मुजोर रिक्षा-टॅक्सीचालकांना पोटाची खळगी कशी भरावी हे समजणं जरुरीचं आहे. तरच ते वठणीवर येतील. तसेच मीटर दरवाढीनंतर रिक्षा व टॅक्सीसेवा प्रवासीभिमुख करण्यावर आरटीओ'ने भर देणे गरजेचे आहे. त्यासाठी भाडे नाकारणाऱ्या व मीटर डाउन न करता अव्वाच्यासव्वा भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकांना कायद्याचा दाखविणे गरजेचे झाले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या