पाण्याचा योग्य वापर होण्यापेक्षा त्याचा गैरवापरच आपण जास्त प्रमाणात करतो आहोत. त्यामुळे गरजेच्या वेळी आपणाला पाण्याचा तुटवडा जाणवतो...
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
अमर्याद वाढणारी लोकसंख्या आणि पाण्याचा बेबंद वापर यामुळे पाण्याची टंचाई महाराष्ट्राला नेहमीच जाणवते. अनेक शहरांतून व गावांतून आता नळ योजनेतून संर्बांना पाणी मिळण्याची सोय झाली आहे. पण, आदल्या दिवशी साठविलेलेच पाणी शिळे झाले म्हणून दुसऱ्या दिवशी फेकून दिले जाते. खरंतर पाणी व्यवस्थित स्वच्छ भांड्यात झाकून ठेवले तर खराब्र होत नाही. नळावर येणारे पाणी धरणामध्ये अनेक दिवस साठवलेले असते ना?
मोठी महापालिका क्षेत्रे वगळल्यास इतर शहरांतून आजही घरांच्या, सोसायट्यांच्य परिसरात मोकळी जागा उपलब्ध असते. ज्या नगरपालिका अथवा नगरपरिषदेच्या क्षेत्रात॑ भुयारी गटारे नाहीत, अशा ठिकाणी घर किंवा सोसायटीचे बांधकाम करतानाच ड्रेनेज पाईपची विशिष्ट तऱ्हेने रचना केली तर ते सांडपाणी केळी, माडासारख्या झाडांना किंवा बागेपर्यंत पोहोचू शकते. आपण वैयक्तिकरित्यादेखील पाणी वापरामध्ये बचत करू शकतो. जसे बादलीत आंघोळ केली तर १८ लिटर पाणी लागते. पण, शॉवरखाली आंघोळ केली तर कमीतकमी १०० लिटर पाणी वापरले जाते. नळ सोडून दाढी केली तर १० लिटर; मगमध्ये पाणी घेऊन दाढी केली तर तेच काम १ लिटरमध्ये होते.
वाहत्या नळाखाली हात धुतले तर १० लिटर पाणी वापरले जाते, परंतु मगमध्ये पाणी घेऊन- हात धुतले तर अर्ध्या लिटरमध्ये काम होऊ शकते. हॉटेल्स, रेस्टाँरट यासारख्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी जर छोटे ग्लास वापरले तर पाण्यामध्ये बरीच बचत होऊ शकते. बहुतेकवेळा मोठ्या ग्लासमधील अर्ध्यापेक्षा जास्त पाणी फेकूनच दिले जाते. परिणामी, पाण्याचा योग्य वापर होण्यापेक्षा त्याचा गैरवापरच आपण जास्त प्रमाणात करतो आहोत. त्यामुळे गरजेच्या वेळी आपणाला पाण्याचा तुटवडा जाणवतो. म्हणूनच जनसामान्यांमध्ये पाणीबचतीचे चळवळीत रूपातर झाले पाहिजे; तरच येणाऱ्या पाणीटंचाईवर आपण मात करू शकू.
महाराष्ट्राला दोन-तीन वर्षाच्या अंतराने दुष्काळाशी सामना करण्याची वेळ येते. पण, शासनाकडून यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याऐबजी तुटपुंजे किंवा तात्पुरते उपाय केले जातात. खरं तर पाणी बचतीच्या दृष्टीने योग्य उपाययोजना केली तर अशा संकटावर सहज मात करता येऊ शकते. इस्त्रायलसारख्या देशात आपल्या तुलनेने खूप कमी पाऊस पडतो. परंतु तिथं कधी दुष्काळ पडला किंवा पाणी राखून ठेवण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे ऐकीवात नाही, वरून पडणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब न थेंब सत्कारणी लावला जातो. पाणी वाया जाऊ दिले जात नाही. एकदा वापरलेल्या पाण्याचे पुन्हा शुद्धीकरणन करून ते परत परत वापरले जावे अशा प्रकारच्या उपाययोजना आपल्याकडेही होणं गरजेचं आहे. केवळ मोठमोठी धरणे बांधून प्रश्न सुटणार नाही. पाणी जमिनीत मुरले पाहिजे. अडवलं पाहिजे आणि त्यादृष्टीने शास्त्रशुद्ध उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. किमान यापुढे तरी सरकारने पुढच्या वर्षी अजिबात पाऊस पडणार नाही हे गृहीत धरून योग्य नियोजन करायला हवे. आपल्याकडे पावसाचे पाणी कसे वाचवायचे, कसं साठवायचे याविषयी प्रचंड चर्चा होतात आणि पावसाळा आला की त्याच्या पाण्यासोबत आपल्या योजना आणि या चर्चादेखील वाहून जातात.
आजचे मरण उद्यावर ढकलल्याच्या आनंदात आपण असतो. विसरून जातो आणि पुन्हा पुढच्या वर्षी त्याच गांभीर्याने तशाच चर्चा सुरू होतात. हे कुठेतरी थांबायला हवे आणि पाण्याचे शाश्वत नियोजन करण्यासाठी खरोखरच गंभीर प्रयत्न व्हायला हवेत.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.