Ticker

10/recent/ticker-posts

दुग्धोत्पादनातील अडथळा ठरतोय जीवघेणा

कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गायी-म्हणी पाळणे, हां जोडधंदा सध्या गावांकडे चांगलाच फॉर्मात येत आहे. पण त्याचबरोबर गायी-म्हशींना होणाऱ्या लहान-सहान रोगांकडेही वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. त्यातील स्तनदाह हा रोग गाई म्हशींमध्ये आणि प्रामुख्याने संकरित गाईमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. या रोगास 'कासखुजी' किंवा 'दगडी कास' असेही म्हणतात. स्तनदाह हा रोग दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱयांचा महाभयंकर शत्रू आहे. अधिक दूध देणाऱ्या जनावरामध्ये हा रोग केव्हाही उद्भवतो. परंतु, व्यायल्यानंतर या रोगाचे प्रमाण मुख्यत्वेकरून दोन प्रकारे दिसून येते. तीव्र स्वरूपाचा दाह व कमी स्वरूपाचा दाह. तीव्र स्वरूपाच्या दाह असेल, तर यामध्ये एखाद दुसरा सड कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. कमी स्वरूपाचा दाह असेल, तर यामध्ये लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे शेतकरी बेसावध राहतो. परिणामी, अशा गाई किंवा म्हशींचे दूध कमी येत जाते. त्यामुळे न दिसून येणारे नुकसान होते. हा प्रकार अतिघातक आहे.


लक्षणे- प्रथमत: दुभत्या गायीला ताप येतो, दूध देणे एकदम कमी होते. कास व आजूबाजूचा आणि बेंबीजबळचा भाग सुजतो. सूज आलेल्या सडातून गुलाबी, लालसर रंगाचे दूध येऊ लागते. बऱ्याचदा दूध येण्याचेच बंद होते, असा सड पिळल्यास, दुधाच्या गाठी येतात. काही वेळेस रक्त आणि पूसुद्धा येऊ लागतो.


जिवाणू व विषाणूंमुळे हा रोग होत असतो. गोठ्यातील अस्वच्छता, धार काढण्याची अस्वच्छ भांडी इत्यादी गोष्टीमुळे रोगाचा प्रसार होतो. रोगजंतूच्या वाढीसाठी दूध हे उत्कृष्ट माध्यम असल्याने, रोगावर त्वरित नियंत्रण मिळवणे कठीण होते. या रोगाची लागण होऊ नये, म्हणून पूर्व दक्षता घेणे नेहमी फायद्याचे ठरते. त्यासाठी दुधाळ जनांवरांचे गोठे नेहमी स्वच्छ असावेत, गोठ्यात कोणत्याही प्रकारचे खाचखळगे नसावेत, जेणेकरून गोठ्यात मलमूत्र साचून त्यामध्ये जंतूची वाढ होणार नाही. धार काढताना अर्धवट धार काढू नये, कासेतील दूध पूर्णपणे काढून घ्यावे. धार काढण्यापूर्वी कास तुरटी किवा पोटेशियम पॅरमॅग्नेट पाण्यात टाकून त्या पाण्याने धुवून काढावीत व नंतर स्वच्छ कापडाने कोरडी करून घ्यावी. पूर्ण दूध काढून झाल्यानंतर कास पुन्हा एकदा तुरटी किवा पोटॅशियम पॅरमॅग्नेटच्या पाण्याने धुवून स्वच्छ करण्यासाठी क्लोरीन, सॅव्हलॉन किंवा इतर कोणत्याही जंतुनाशकांचा वापर केला तरी चालतो. धार काढणाऱ्या व्यक्तीचे हात स्वच्छ धुतलेले असावेत. हाताची नखे वाढलेली नसावीत.


गाई -म्हशींची धार योग्य पद्धतीने काढावी. सडांना कोणत्याही प्रकारची जखम होऊ देऊ नये. धार काढण्याच्या वेळा कायम ठेवाव्यात, धार काढल्यानंतर स्तनांच्या सडांची छिद्रे काही काळ उधाडी राहतात. जनावर धार काढल्यानंतर जर लगेच खाली बसत असेल, तर गोठ्यातील जंतू स्तनातून आत प्रवेश करतात व या रोगाची लागण होते. म्हणून धार काढल्यानंतर दुभत्या जनावरांना लगेच खाली बसू देऊ नये. त्यासाठी पशुखाद्य अथवा थोडी वैरण खायला घालावी. जेणेकरून, जनावर लगेचच खाली बसणार नाही.


उपचार करण्यास जिंतका अधिक वेळ, तितका या आजाराचा धोका वाढतो. त्यामुळे दुधाळ जनावरं काही अंशी, अथवा पूर्णत: निकामी होण्याची शक्यता असते. जनावरांना या रोगाची लागण झाल्यास, कोणत्याही प्रकारचे अंधश्रद्धाळू उपचार करत बसू नयेत. पशूवैद्याकडूनच ताबडतोब उपचार करावेत. वरीलप्रमाणे उपाययोजना केल्यास, निश्चितच दूध उत्पादन वाढेल व जनावरांनाही त्रास होणार नाही. परिणामी, शेतकऱ्याचाच फायदा होईल. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या