जीवनातील सर्वात सुखद आणि रंगबेरंगी काळ म्हणजे तारूण्य आणि याच तारूण्यात सर्वात सुखद काळ म्हणजे महाविद्यालयीन जीवनातील सोनेरी दिवस! उर्जा, उत्साह, उमेद, भविष्यातील उज्जवल आयुष्याची स्वप्ने आणि मैत्रीचा बहर म्हणजे तारूण्य! पण, याच तारूण्याचा खरा उपयोग, त्यांची उर्जा जेव्हा एखाद्या सकारात्मक कार्यासाठी वापरली जाते तेव्हा सशक्त देशाची सुजाण पिढी घडते. मात्र याच उर्जेचा वापर विचित्र विकृतीसाठी होतो तेव्हा रॅगिंगसारखे भयानक प्रकार घडतात.
खरेतर नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांमधील भीती कमी व्हावी, आत्मविश्वास वाढावा तसेच सीनीअर विद्यार्थ्यांना नव्या विद्यार्थ्यांची ओळख व्हावी म्हणून ओळखपत्र इथपर्यंत सर्व ठिक असते, परंतु एखाद्याला मानसिक अथवा शारिरिक कष्ट पडावे, त्रास व्हावा या उद्देषाने ज्या क्रिया केल्या जातात त्यांना रॅगिंग असे म्हटले जाते ज्या विद्यार्थ्यांची ज्युनिअर असताना रॅगिंग केली जाते तेच विद्यार्थी वरच्या वर्गात गेल्यावर आपल्या ज्युनिअरकडून रॅगिंग करून घेतात असे हे दुष्टचक्र कुठेतरी थांबायला पाहिजे.
या सर्वांचा परिणाम त्याच्या कुटुंबावरही होवून एक घर उद्धवस्त होऊ शकते. कारण कळत नकळत झालेले रॅगिंग. या रॅगिंगमध्ये सामील झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सामील झालेल्या विद्यार्थ्यांविरुद्ध मोठी कारवाई होऊ शकते. रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्याला संस्थेतून काढले जावू शकते, मेस किंवा होस्टेलमध्ये बंदी केली जाऊ शकते; परिक्षेला बसण्यास मनाई केली जावू शकते. कोणत्याही संस्थेत प्रवेश नाकारला जाऊ शकतो. अशा प्रकारच्या शिक्षा विद्यार्थ्यांस होऊ शकतात. कदाचित या शिक्षा झालेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्यदेखील अंधकारमय होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रॅगिंगच्या प्रकारात न अडकलेलेच बरे.
ज्यावेळी एखाद्याचा तुम्ही स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून, माणूस म्हणून आदर करायला शिकाल त्याचवेळी कुणालाही त्रास होईल असे कृत्य कदापिही तुमच्या हातून घडणार नाही याची खबरदारी घ्या. यासाठी विध्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासूनच मूल्याधिश्ठित शिक्षण पद्धती व तिचे महत्त्व पटवून सांगायला हवे. हल्लीच्या संगणक व यंत्राच्या दुनियेत माणूस यंत्रवत होताना मानवता, सदाचार व सद्वर्तन ही मूल्ये विसरत चालला आहे. त्याचाच परिणाम म्हणून रॅगिंगसारख्या विकृती जन्माला येतात. अशा विकृतींपासून आपले आणि इतरांचे जीवन उध्वस्त करणाऱ्या कृत्यापेक्षा महाविद्यालयांमधील तरूणाईच्या उर्जेचा वापर विधायक, रचनात्मक व सकारात्मक कृत्यांमध्ये केला पाहिजे.
मुळात तारूण्य आणि आजची तरूण पिढी अचाट बुद्धी असणारी देशाची शक्तीस्थाने आहेत. मात्र, तरूणाईच्या अनिर्बंध स्वातंत्र्याला, संस्कारांची, मूल्यांची आणि मानवतेची चौकट देण्याची जबाबदारी आता आपल्यावर आली आहे. जगातील सर्व देशांतील लोकसंख्या वार्धक्याकडे झुकली असताना फक्त आपला देश हा चिरतरूणांचा देश म्हणून उदयाला आला आहे. या तरूण उर्जेला, तरूण मनगटांना गरज आहे ती फक्त योग्य व परिपूर्ण मार्गदर्शनाची आणि या तरूण पिढीच्या मनगटांवरच आपला देश उद्याची महासत्ता बनणार आहे. येणाऱ्या पिढयांना मग एकेकाळी रॅगिंग होत होती, ती कशी केली जात होती हे फक्त इतिहासाच्या पुस्तकातच वाचायला मिळेल. तो सुदिन लवकर यावा. रॅगिंगला योग्य वेळीच आळा बसला तर फार मोठया चिंतेतून विद्यार्थी वर्गाची पर्यायाने समाजाची काळजी मिटेल. रॅगिंग रोखण्यासंदर्भात शासन विशेष आक्रमक असून त्यासाठी विद्यार्थीवर्गाचीही साथ त्यांना हवी आहे. तेव्हा चला अन् कॅम्पसमधील रॅगिंग थांबवा...
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.