अन्नधान्याची नासाडी हा सध्या अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे. एकीकडे जगात अनेक ठिकाणी दुष्काळ, कुपोषण, तसेच निकृष्ट आहारामुळे अनेकांचे बळी जात असताना दुसरीकडे दरवर्षी संपूर्ण जगात दोन अब्ज टन अन्नधान्याची नासाडी होत आहे. दोन प्रमुख कारणांमुळे अन्नधान्य अक्षरशः फेकून दिले जाते. एक म्हणजे अनेक देशांमध्ये धान्य साठविण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने अन्नधान्य खराब होते आणि पंचतारांकित हाॅटेल्स, मोठमोठे लग्नसमारंभ, माॅल्स, पिझ्झा हट किंवा फास्टफूडच्या दुकानांवर मालाची विक्री न झाल्यामुळे, तसेच गिऱ्हाईकांनी ऑर्डर देऊनही अर्धवटच खाल्ल्यामुळे मोठया प्रमाणावर शिजवलेले अन्न फेकून दिले जाते. आपल्या संस्कृतीमध्ये अन्नाला पूर्णब्रह्म म्हटले जाते. मानवजातीचा सर्व व्यवहार हा अन्नधान्यामुळे चालतो. सर्वांना पोटभर अन्न मिळावे, कोणीही उपाशी राहू नये, अशी सर्वसाधारण प्रत्येकाची अपेक्षा असते. जगाचा विचार सोडून देऊ, परंतु आपल्या देशाचा किंवा अगदी मुंबईचा जरी विचार केला तरी अशाप्रकारच्या अन्नधान्याची प्रचंड प्रमाणावर नासाडी होताना दिसते. मुंबईतच रेल्वे स्थानकावर आपली पोटाची खळगी भरण्याकरिता लहान वयातली मुले दिसून येतात. रेल्वे स्टाॅलच्या आजुबाजूला फिरणारी ही मुले आपल्यालाही एकेक वडापाव मिळावा अशा आशाळभूतपणे उभी असतात. झोपडपट्टयांमध्ये राहणारी कुटुंबे आपल्या घरातल्या लहान मुलांना रोज कपभर दूधसुद्धा पाजू शकत नाहीत. पौष्टिक अन्न, कडधान्य किंवा फळफळावळ या गोष्टी त्यांच्या आहारामध्ये येणे तर खूपच दूर. बेरोजगारी, महागाई, गरिबी आणि दारिद्रयामुळे याच श्रीमंतनगरीतले पन्नास टक्के लोक अतिशय सामान्य पद्धतीचे जीवन जगतात.
आजही गरिबाच्या घशात चार चांगले घास जाऊ शकतील. मात्र, त्याची नीट अंमलबजावणी झाली पाहिजे. भारतातल्या धान्य साठवणुकीच्या अपुऱ्या सुविधांमुळे दरवर्षी लाखो टन धान्य सडत असल्याचे आढळून आले आहे. पावसाने कुजणारे हे धान्य वाया घालवण्यापेक्षा ते गरिबाच्या घरात पोहोचले तर त्याचा जास्त उपयोग होईल. अन्नधान्याची नासाडी होण्याचा आणखी एक संतापजनक प्रकार म्हणजे मोठमोठया हाॅटेलमध्ये रोज रात्री बारानंतर प्रचंड प्रमाणात शिजवलेले अन्न फेकून देण्याची वेळ येते. मोठमोठया हाॅटेलमध्ये या महागडया अन्नपदार्थांची ऑर्डर दिली जाते. तिथे येणारे धनदांडगे हे तिथल्या भोजनापेक्षाही स्वतःची श्रीमंती मिरवायला येत असतात. ऑर्डर दिलेल्या मेनूपैकी निम्मे मेनू अक्षरशः वाया जात असल्याचे हाॅटेल चालकांच्याही लक्षात येते. दुर्दैवाने यावर हाॅटेल चालकही कोणताही उपाय करू शकले नाहीत. हल्ली तर दर आठवडयाला पाटर्या देण्याचे फॅड निर्माण झाले आहे. एवढेच नव्हे तर साध्या लग्नसमारंभापासून ते बडया धेंडांच्या लग्नसोहळयांमध्ये वेगवेगळया पदार्थांची एवढी रेलचेल असते की, खाणारासुद्धा काय खावे आणि काय खाऊ नये असा गोंधळून जातो. तेथे जेवणाकरिता इतके वेगवेगळे पदार्थ केले जातात की, त्याचा कोणताही अंदाज न आल्यामुळे त्याची अक्षरशः नासाडी होते. यामधून केटररचे तर भले होते, पण देणाऱ्याकडेही पैसा बक्कळ असल्यामुळे त्याला त्याचे काही वाटत नाही. परंतु एकूण अन्नधान्याची नासाडी करून आपण राष्ट्रीय संपत्तीचा नाश करत आहोत, याचे भान त्यांना राहत नाही.
सहलीच्या ठिकाणी वाया जाणारं वेगळं. पोरांच्या टिफिनमधून वाया जाणारं अन्न वेगळंच. अनेकजण बिसलरीची बाटली विकत घेतात. दोन-चार घोट पाणी पितात, उरलेली तेथेच ठेवून जातात. त्यांच्या लक्षात येत असेल की नाही, माहीत नाही; पण बाटलीत पाणी शिल्लक राहत नाही, तर पैसेच शिल्लक असतात. लिटरभर पाण्याला जागेनुसार पंधरा ते वीस रूपये मोजत असतो आपण; पण असं पाणी शिल्लक ठेवण्यातही अनेकांची प्रतिष्ठा दडलेली असते. सरकार दरवर्षी संसदेत आकडेमोड करून सांगत असतं, की आपल्या देशात शुद्ध पाणी न मिळाल्यानं अमुक लाख लोक मरतात. कुपोषणामुळं अमुक बालकं दगावतात. साठ टक्के लोक अर्धपोटी; तर तीस टक्के बालकं जवळपास उपाशी असतात. अन्न नाही म्हणून...भाकरीचा तुकडा न मिळाल्यानं अमुक लाख पोरं गुन्हेगार बनतात. आपल्या देशात रोज आठ-दहा रूपयांत लाखो लोक भाकरीसाठी लढाई करीत असतात. अजूनही कितीतरी हकीकती सांगता येतील. आपण वाया जाणारं अन्न जरी वाचवू शकलो, तरी अनेक प्राण वाचवल्यासारखं हाईल.
आजच्या शिकल्या-सवरलेल्या आपल्या देशामध्ये अन्नधान्याचा योग्य वापर करावा याचीही जाणीव राहत नसेल तर त्या शिक्षणाचा नेमका उपयोग काय? आज आपल्याला पाणी जपून वापरा हे सांगावे लागते. आता अन्नधान्यसुद्धा जपून वापरा, असे शिकवण्याची वेळ आली आहे.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.