धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धेचा बाजार खुलेआम सुरू आहे. तो कुठेतरी थांबायला हवा...
कोणत्याही गोष्टीवर श्रद्धा असणे केव्हाही चांगले. मात्र, त्याच श्रद्धेचा अतिरेक झाला की, त्याचे रूपांतर अंधश्रद्धेत होते. माणूस परावलंबी होतो. आज घडीला महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. परंतु दुर्भाग्याची गोष्ट अशी की, याच महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या सर्वाधिक घटना उघडकीस येतात. महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटले जाते. संतांनी नेहमीच सत्याची वागणूक दिली आहे. प्रत्येक धर्म सहिष्णुतेचा मार्ग अनुसरण्याच्या मार्गाने जाण्याचा संदेश देतो. मात्र काही, धर्मगुरू आपला, धर्म कसा वेगळा, किती पावरफुल आहे हे भासवून देण्याच्या नादात अंधश्रद्धेलाच खतपाणी घालत असतात. काही बंगाली बाबा या नावाने तर मुंबईतील लोकलमध्ये जाहिराती लावत सुटले आहेत. मुठकरणी, प्रेम में धोखाधडी, मा-बाप का प्रेमविरोध, सौतन को दूर करना, घर और नौकरी में क्लेश, भूत-प्रेत उतारना अशा प्रकारच्या जाहिराती लोकलच्या डब्यांमध्ये चिटकवलेल्या आढळतात. या जाहिरातींना भुलून लोक त्यांच्याकडे जातात व फसतात. काही दिवसांपुर्वी महाराष्ट्र पोलीसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे अशा जाहिरातींचे पीक सध्या कमी झाले आहे.
आपल्या पुर्वजांनी संस्कृतीच्या नावाखाली सण, उत्सव यांची ऋतूपरत्वे सुरेख सांगड घालून दिली आहे. यामागील विज्ञान लक्षात घेतले तर त्याचे महत्त्व लक्षात येते. निसर्गाचा समतोल राखण्यास साहयाभूत ठरणाऱ्या चालीरिती, पोषाख, आहार, यात्रा, मेळे, उत्सव यांचे विचारपूर्वक आयोजन पूर्वजांनी केले. आपल्या देशातील शेतीची कामे चक्राकार रितीने निसर्गातील बदलानुसार सुरू असतात. मात्र, बदलत्या कालमानानुसार सण, उत्सव साजरे करण्यात बीभत्सपणा वाढत चालल्याचे दिसून येते आहे. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी माणूस आजही श्रद्धा-अंधश्रद्धेच्या गर्तेत गुरफटला जात आहे. कारण त्याची नाळ पारंपारिक संस्कृतीशी जोडली गेली आहे. पारंपारिक संस्कृतीच्या आंतरिक रूपाने मनावर व आत्म्यावर झालेले संस्कार परिणामकारक आणि दिर्घकाळ टिकणारे असतात. याचा फायदा भोंदू बाबा, बुवा आणि धर्मगुरू घेतात. चमत्काराला नमस्कार अशा प्रवृत्तीचा वापर करून ते बेमालूमपणे जाहिरातींचे जाळे पसरवतात व लोक याच गोष्टीला फसतात. आपली फसवणूक झाली आहे हे जर कुणाला समजले तर आपले हसू होईल या भावनेतून ते एकतर गप्प बसतात, नाहीतर त्या भोंदू बाबाची जाहिरात करतात.
जनतेला शिक्षण देण्याचे कार्य प्रामुख्याने समूह माध्यमांद्वारे करण्यात येते. पण, अंधश्रद्धाबाबतच्या सर्वाधिक जाहिराती विविध चॅनेलवर दावविल्या जातात. आज घडीला प्रत्येक चॅनलवर एक तरी बाबा अध्यात्मिक प्रवचनाच्या नावाखाली अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम करीत आहे. यास सरकारदेखील तेवढेच जबाबदार आहे. आज धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धेचा बाजार खुलेआम सुरू आहे. तो कुठेतरी थांबायला हवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.