महिलांची सुरक्षितता हा आपल्याकडे सातत्याने चर्चेत असणारा विषय आहे. जग प्रचंड गतिमान बनले आहे आणि जगण्याच्या लढाईत महिलांनीही गती पकडली आहे. त्यामुळे लोकसंख्येने अर्ध्या असलेल्या महिला सर्वच क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने धावताना दिसतात. मात्र महिलांच्या संदर्भात सातत्याने घडणाऱ्या घटना एकूणच चिंता व्यक्त कराव्या अशा आहेत. मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकलमध्येही महिलांना अनेकदा वाईट अनुभव येतात.
अलीकडच्या काळात ज्येष्ठ महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनल्याचे चित्र दिसत आहे. ज्येष्ठ महिला रस्त्यावरही सुरक्षित नाहीत आणि घरातही सुरक्षित नाहीत. मुंबई किंवा ठाण्यात रस्यावरून चाललेल्या वृद्धेला, पुढे दंगल झाली आहे तेव्हा तुमचे दागिने काढून पिशवीत ठेवा, असे सांगून दागिने घेऊन पलायन करण्याची घटना वारंवार ऐकावयास मिळत आहे. तसेच आयुष्याच्या संध्याकाळी एकटयाने आयुष्य व्यतीत करीत असताना विश्वासाने ठेवलेल्या नोकरांकडूनच बहुतांश हत्या घडत असल्याचे आतापर्यंतच्या उदाहरणांवरून दिसून येते. किंवा मग चोरीच्या उद्देशाने बळजबरीने घरात घुसून हत्या केल्या जातात. एकटया राहणाऱ्या महिलांचे जगणे दिवसेंदिवस असुरक्षित बनत चालले आहे. आयुष्याच्या संध्याकाळी आलेले एकटेपणाचे किंवा एकाकीपणाचे दुःख सोबत घेऊनच वाटचाल करताना कधी कोणत्या रूपाने मृत्यूचे संकट येईल, अशा भीतीच्या छायेत वावरायला लावणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आधारासाठी कुणाकडे पाहायचे, असाच प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. एकूणच ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांकडे अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे. त्यांना सुरक्षित वाटेल अशी परिस्थिती निर्माण करण्याची गरज असून पोलीसांबरोबर समाजातील सगळयाच घटकांची ती जबाबदारी आहे.
मुंबईत आज ज्येष्ठ नागरिकांचे जीवन हे अनेक दृष्टीने कष्टप्राय बनत चालले आहे. रस्ता पार करणे, पदपथावरून चालणे, घरातील अन्य मंडळी नसताना जर काही गोष्टींची आवश्यकता भासली तर त्यासाठी कमालीचा आटापिटा करावा लागणे. दूरध्वनी बंद पडणे वा मोबाईल गरजेच्या वेळीच नाॅट रिचेबल लागणे. फ्लॅट संस्कृती आणि त्यातील माणसांना स्वतःच्याच मोबाईलवर बोलणे किंवा गेम खेळत बसणे यामुळे शेजाऱ्यापाजाऱ्यांकडे बघायला वेळच नसतो. हेच आमचे दुर्दैव आहे.
पूर्वी चाळी असायच्या. दारासमोर मुले खेळत तरी असायची. आज फ्लॅट्समध्ये ती सोय नाही. बिल्डिंगच्या खालीही मुले खेळताना दिसत नाही. पोलीस ठाणे देखील दूर असते. एकूणच परिस्थिती एवढी आत्मकेंद्रित होऊन गेली आहे की, कोणीच कोणाकडे बघायला तयार नसतो. परिणामी, एकाकी वृद्धांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वृद्धांना निराधार अवस्थेत सोडून आपले घरकुल थाटण्याचा नव्या पिढीचा हट्ट समाज बिघडण्यास कारणीभूत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. तरूणांना जगण्याचा आनंद घेण्याचा जेवढा हक्क आहे, तेवढाच हक्क वयोमानामुळे असहाय्य झालेल्या वृद्धांनाही आहे, याचा विसर पडू लागला आहे.
फ्लॅट संस्कृतीमध्ये राहताना सुरक्षेबाबत केवळ पोलीसांवर विसंबून राहू नये, तर आपल्या शेजारी राहणाऱ्यांविषयी चांगले संबंध राखावे. तसेच घरात नवीन नोकर ठेवताना त्याची संपूर्ण माहिती घेऊन ती पोलीसांना कळवावी. एकटे राहणाऱ्या वृद्धांना शेजाऱ्यापाजाऱ्यांनी मदत केली पाहिजे. त्यांच्या अडीअडचणींची चौकशीही केली पाहिजे. येता-जाता शक्य असेल, तर घरात जाऊन चौकशी करायला हवी. एकाकी वृद्ध व्यक्ती ही सामाजिक जबाबदारी आहे, याची जाणीव निर्माण व्हायला पाहिजे. एकंदरीत, ज्येष्ठ नागरिकांचे अमूल्य जीवन सुरक्षित नसून त्याकरिता प्रशासन, पोलीस जबाबदार आहेत, की त्यांच्या कुटुंबातील मंडळी जबाबदार आहेत, याबाबत समाजात गंभीरपणे चर्चा होणे आवश्यक आहे.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.