शेतकरी जगला तरच देश चालेल
महाराष्ट्रात कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या ही बाब आता नित्याचीच होऊन बसली आहे. शेतकरी आत्महत्येसारखे भीषण कृत्य का घडते. कुठं चुकतय. यात चूक कोणाची, निसर्गाची, शेतीची की बळीराजाची? पाऊस न पडणे, दुष्काळ पडणे, अवकाळी पाऊस पडणे हे कोणाच्याच हातात नसते. शेती व्यवसाय अन्य व्यवसायापेक्षा तुलनेने अधिक कष्टाचा आहे. अंगमेहनतीचा आहे; शिवाय त्याला पाऊस, पाणी, तापमान अशा अनुकूल हवामान परिस्थितीचीही जोड मिळणे आवश्यक आहे. पण, अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी काहीअंशी का होईना अगोदर व्यवस्थापन, नियोजन या गोष्टी महत्त्वाच्या असतात. खरीप हंगामापासून पूर्ण वर्षभरासाठी. खरीप हंगामापासून पूर्ण वर्षभरात घेण्यात येणाऱ्या पिकांचं नियोजन खर्च किती येणार आहे या सगळयाची नोंद वही तयार करणे, पाऊस कमी पडल्यास अगोदर पाण्याची सोय, रोग, किडींचा प्रभाव वाढल्यास त्यावर लागणारा खर्च त्याचा लेखाजोखा आधीच करणं जरूरी आहे. यासाठी आपल्याच शेतात बीजोत्पादन करणे, तसेच पीक पेरणीपूर्वीचे अर्थशास्त्र समजावून घेणे यासाठी काही प्रमाणात तज्ज्ञांचा सल्ला घेणे, एवढे करूनही शेतात पिकलेल्या मालाला योग्य भाव न मिळाल्यास ही आपली चूक नाही हे धरून चालणे. यातून मार्ग काढणे म्हणजे बाजारभावाची मागाणी व पुरवठयाचा विचार करून योग्य पीह नियोजन करणे. तो माल बाजारात आणणे. अशा प्रकाराने व्यवस्थापन केल्यास कोणत्याही संकटावर मात करता येते. मात्र कर्जे काढून सण साजरे करू नका.
बहुतेक वेळा शेतकऱ्यांकडे पैसा शिल्लक नसतो. त्यामुळे अगदी नांगरटीपासून ते बाजारात माल घेऊन जाईपर्यंत प्रत्येक गोष्टींसाठी शेतकऱ्याला अगोदर खर्च करावा लागतो. त्यानंतर बाजारभाव काय मिळेल आणि पैसा हातात किती येईल याची खात्री नसते. बऱ्याचवेळा उत्पादनखर्चही निघत नाही हे चक्र आयुश्यभर चालूच असते व त्यामुळे शेतकऱ्याला कर्जे काढण्याशिवाय पर्याय नसतो. बँक, सोसायटी यांच्याकडून कर्ज मिळाले नाही तर मग सावकार अडत्या यांच्याकडे धाव घ्यावी लागते. सावकारी व्यवहारात शेतकऱ्यांची पिळवणूक होते. शेतकरी मात्र मोठया प्रमाणावर सावकार विरोधात तक्रारी द्यायला धजावत नाही ही वस्तुस्थिती आहे. खरे म्हणजे सावकारग्रस्त शेतकऱ्यामागे गावातील मंडळी उभी राहणे आवश्यक आहे. कर्जाच्या बदल्यात जमीन जाते आहे. याबद्दल तीव्र प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी द्यायला पाहिजेत. तरच सावकारी पाश तोडता येतील. बँकांकडून कर्जे काढण्याची अनेकांची सवय, ते कशासाठी तर उत्पादन काढण्यासाठी. परंतु बऱ्याच जणांना अनुत्पादित कामाकरिता कर्ज काढण्याची सवय असते म्हणजे कर्ज अशा गोष्टींसाठी काढले जाते ज्यातून परत काहीच येणार नाही काही वेळा ते अपरिहार्य असते. पण, अशी कर्जे काढताना शेतकऱ्यांनी विचार करणे गरजेचे आहे. उदा. मुुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाला गरजेपेक्षा जास्त कर्ज काढून प्रतिष्टेसाठी प्रचंड खर्च करणे, लग्न थांबवणे हे जमत नाही, कर्ज काढावेच लागते. पण प्रतिष्ठेसाठी जो अनाठाई खर्च हातो तो कमी करता येईल का? यावर विचार होणे गरजेचे आहे.
मोठा मांडव किंवा कार्यालय, ए.सी. हाॅल, गावजेवण, वरात अशा भपकेबाजपणाला आळा घातला तर कर्जाचा बोजा व्याजासहित कमी होईल. काही तासांच्या झगमगासाठी आतशबाजीसाठी पुढील काही वर्षे अंधारात का घालवायची? हा प्रश्न आपणच आपल्याला करायचा आहे. व्याजावर व्याज वाढतेय हे पाहून शेतकरी वैफल्यग्रस्त होतो आणि शेवटचा पर्याय म्हणून आत्महत्या करतो. मात्र, खरी कसोटी तर पुढेच आहे घरातला कर्ता पुरूष गेला तर कुटुंब कोलमडेल, सगळा भार घरातल्या महिलेवर येतो व मुलांवर त्याचा वाईट परिणाम होऊन त्यांच्या शिक्षणातही खंड पडतो. महिलांमधील असुरक्षितता वाढणे अशा वैफल्यग्रस्त कुटुंबाची घडी विस्कटते याचा विचार व्हायला हवा. आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरचा तोडगा नाही. या सगळयांचचा विचार बळीराजा तुला करायचाय. कुठल्याही परिस्थितीत मी मोडणार नाही, वाकणार नाही असा दृढ संकल्प करायला हवा.
एकूणच, बळीराजा अरे बळीचे राज्य बसवायचे सोडून स्वतःला तू बळी देतो आहेस. विवेकाचे दुसरे नाव विचार आहे. आणि आज चांगलेच होत आहे, चांगलेच होईल. पुढेही चांगलेच होत राहील अशी आपल्या मनी खुणगाठ बांध आणि कामाला लाग. बळीराजा तू जर शेती केली नाही तर आम्हाला, या अख्ख्या भारत देशाला अन्न कोण पुरवेल. झटकून टाक हा आत्महत्येचा विचार, कर प्रभावीपणे शेती. उद्याची सोनेरी पहाट तुझीच वाट पाहतेय...
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.