Ticker

10/recent/ticker-posts

अमृताहुनी... गोड, नाव तुझे आंबा...

 गोड खाणाऱ्याला देव देणार...

-दादासाहेब येंधे

पहिले प्रेम, वर्षाचा पहिला पाऊस अशा पहिल्यावहिल्या गोष्टींतली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोसमातला आंबा. आंबा आला, आला म्हणता, तो कोणत्या ठिकाणी आहे त्याची शोधाशोध करून मोसमातलं ते पहिलं फळ खाण्याचा आनंद म्हणजे स्वर्गसुखच! म्हणूनच म्हणावेसे वाटते अमृताहुनी...गोड, नाव तुझे आंबा...



'आमच्या लहानपणी जानेवारी, फेब्रुवारीपासूनच आंब्याची वाट पाहत असायचो. कधी एकदा शाळेला मे महिन्याची सुट्टी पडतेय आणि आम्ही गावाला आजीकडे जातोय असे आम्हाला वाटायचे. एकत्र कुटुंब पद्धती त्याकाळी असल्यामुळे सगळेच जण आंब्याविषयी उत्सुक असायचे. चर्चा रंगायच्या. गावाला गेल्यावर पहिले लक्ष जायचे ते रायवळ आंब्यांच्या झाडांकडे. दुपारचे उन जरा खाली झाले की, सुट्टीत जमलेल्या आम्हा मुलांचा घोळका हळूच घरातून बाहेर पडायचा. तोही, आजीचा डोळा चुकवून. डोक्यावर उन मी म्हणत असताना आणि घामाच्या धारा अंगावरून वाहत असतानाही त्या पुसत पुसतच आम्ही झाडाखाली वेगवेगळया ठिकाणी उभे राहत होतो. हळूच वाऱ्याची झुळूक कुठूनतरी आली की, त्या कडक उन्हाच जोर जरा हलका व्हायचा. गप्पा मारत असताना नजरा मात्र झाडांवरील पिवळया लालसर फळांकडे एकवटलेल्या असायच्य वाऱ्याचा जरा जोर वाढला की, झाडाच्या फांद्या-पानांची वळवळ व्हायची आणि पिकलेला आंबा धपकन खाली पडायचा. मग व्हायची ती आमची पळापळ आंबा कोणाला सापडतोय आणि कोण तो पहिला खातोय. प्रत्येकालाच ते अप्रूप असायचं.


जेवणाला चव येते

आंब्याच्या मोसमात घराघरात आंब्याच्या आढ्यांचा घमघमाट सुटलेला असायचा. सुट्टीच्या दिवसांत आजीकडे गावाला जायचा बेत ठरलेलाच असायचा. आंब्याच्या रचलेल्या आढ्यांतून कोण किती आंबे रिचवतोय याचा काही हिशोब नसायचा. पडलेला आंबा खायचा हा एक अनुभव काही निराळाच आनंद अजूनही देऊन जातो. झाडाखाली पडलेली एखादी कैरी घेऊन आमची बहिण गाऊनमध्ये लपवून हळूच घराकडे पळायची आणि ती कैरी कापून त्यात तिखट-मीठ टाकून प्रत्येकाच्या हातावर एक-एक फोड द्यायची. (बघा, आलं की नाही, पाणी तुमच्या तोंडाला... आंब्याचा गुणधर्मच असा आहे) कोवळ्या कैरीपासून पिकलेल्या आंब्यापर्यंतची बरीचशी आंब्यांची रूपं मानवाच्या सोबतीला आहेत. पाटा-वरवंट्याखाली, नुसत्या तिखट मिठाबरोबर वाटलेली कैरीची चटणी खाऊनही बऱ्याच जणांनी आनंद उपभोगला असेल. कडक उन्हातून घरात शिरलं की, कैरीचं थंडगार पन्हं नुसतं नजरेला पडल्याबरोबरच घशाला पडलेली कोरड शमल्याचं समाधानही बरेचदा आनंद देऊन जातो. कच्च्या कैरीचं लोणचं, पिकलेल्या आंब्याचा मुरांबा-गुळांब्यानं कित्येकांच्या जेवणाला चवही दिली आहे.


सध्या बाजारात बऱ्याच प्रकारचे आंबे दिसून येतात, महाराष्ट्रात मुख्यत: हापूस आंबा, पायरी आणि तोतापुरी आंब्याच्या जाती आढळून येतात. रत्नागिरी आणि देवगडचा हापूस आंबा विशेष प्रसिद्ध आहे. गोड खाणाऱ्याला देव देणार असे म्हटले जाते. पण, प्रत्येकाची आवड-निवड वेगळीच असते. कुणाला हापूसची हौस असते, तर कुणाला रसाळ पायरी आवडतो. आंब्याच्या प्रकारानुसार त्याचं रंगरूप,  आकारमान, चव असं सगळंच बदलत जाते. पण हे सगळे आंबे ओळखायचे तरी कसे हे आपण आता समजून घेऊ या.


हापूस आंबा : महाराष्ट्रातील देवगड, कोकण पट्ट्यातील हा आंबा म्हणजे खाणाऱ्यांचा जीव की प्राण. समुद्रापासून १२ किलोमीटर अंतरावरच्या विजयदुर्ग ते मालवण या भागातच हा आंबा येतो. याचं खास वैशिष्टय म्हणजे त्याची साल खूप पातळ असते. रंग पिवळसर आणि नाकाला लावल्यावर खाण्याची इच्छा झालीच पाहिजे असा हा आंबा. अशा या फळाला आंब्यांचा राजा म्हणून ओळखले जाते. साधारणत: हा आंबा गोल असतो. आमरसासाठी हा आंबा प्रसिद्ध आहे. आंब्याच्या मोसमात हापूस आंब्याचा आमरस पुरीबरोबर खाल्ल्याशिवाय कित्येक जणांना समाधान मिळत नाही.


रत्नागिरी आंबा : रत्नागिरी पट्ट्यात हा आंबा साधारणपणे ८० ते ९० टक्के तयार झाल्यावर थोडा लवकरच झाडावरून उतरवला जातो. या आंब्याची साल थोडी जाड असते. या आंब्याला गोलाई असते.


राजापूर आंबा : या आंब्याचीही साल जाडसर असते. आकाराला थोडा लांबट असा असतो. या आंब्याच्या सालीवर पांढऱ्या-करड्या रंगाचे दाट स्पॉट असतात.


रायवळ आंबा : रायवळ हा आंबा महाराष्ट्रात साधारणपणे घाटमाथ्यावर जास्त प्रमाणात आढळतो. त्यातल्या त्यात पुणे जिल्ह्यातील जुन्नरचा हा आंबा खायला रसाळ असा मानला जातो. हा आंबा आकाराला लहान असून आमरसासाठीही प्रसिद्ध आहे. 


तोतापुरी आंबा : तोतापुरी आंबा लांबट  असून त्याची साल गुळगुळीत अशी असते.


या आंब्याचा रस काढता येत नसला तरी जेवताना तोंडी लावायला म्हणून या आंब्याच्या फोडी करून जास्त प्रमाणात हा आबा खाल्ला जातो.



पायरी आंबा : हा आंबा साधारणपणे थोडासा लांबट असा असून त्याला टोक असतं. याची साल जाडसर असते. रंग पिवळट, लालसर असतो. पण हा रंग सगळयाच पायरी आंब्याला असेल असं नव्हे. पायरी तयार झाला की देठाकडे चांगलाच खोल काळ्या रंगाचा खड्डा पडतो. हा आंबा पिकल्यावर लगेचच खावा लागतो. तो जास्त काळ टिकू शकत नाही.


लंगडा आंबा : लंगडा आंबा ही बनारस क्षेत्रात पैदा होणाऱ्या आंब्याची सुप्रसिद्ध जात आहे. हा आंबा मोसमातक देशाच्या सर्व भागात पाठविला जातो. महाराष्ट्रात मिळणाऱ्या आंब्यापेक्षा अनेक पटीने हा आंबा स्वस्त असतो.


केशर आंबा : कोकणातल्या आंब्याचा मोसम संपत आला की, या आंब्याची आवक सुरू होते. हा आंबा गुजरातमधून येतो. याची चव काही प्रमाणात हापूसप्रमाणेच असते. 


आंबा या फळाच्या नुसत्या दर्शनातच एक जादू आहे. पाहिल्या-पाहिल्याच खवय्यांच्या नजरेत तो भरलाच पाहिजे. नुसतं फळ नव्हे तर आंब्याचं प्रत्येक पानदेखील माणसासाठी उपयुक्त आहे. वाळल्या पानांचा धूर डास पळवतो आणि घसाही साफ करतो; तर आंब्याच्या काही खास गुणांमुळे त्याची पाच देववृक्षांत गणना झालेली आहे. गुढीपाडव्याला घरावर उभारलेल्या गुढीत आंब्याची पाने हटकून टाकतात. दारावर लावलेल्या तोरणात आंब्याचे पान असते. सरस्वती पूजन किंवा मंगल कार्यात आंब्याचे पान आवश्यक असते. कैरीचे पन्हे उष्माघातासारखे आजार रोखते. अख्खा आंबा खाल्ला तर शरीराला भरभरून हिमोग्लोबीन मिळते. कोयीपासून स्टार्च बनवितात. जळणासाठी कोयींचे इंधन उपयुक्त ठरते. त्यामुळे अशा या आंब्याला चवीचा दूतच नव्हे तर एक कल्पवृक्ष म्हटल्यास वावगे ठरू नये.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या