Ticker

10/recent/ticker-posts

आठवड्यातून एक दिवस नो मोबाइलचा संकल्प करूया

नविन वर्षात आठवड्यातून एक दिवस नो मोबाईलचा संकल्प करूया
-दादासाहेब येंधे (dyendhe@rediffmail.com)

आजपासून सुरू होणारे नवीन वर्ष म्हणजे नवीन उत्साह, नवी सुरुवात. वर्षाच्या सुरुवातीला आखलेले नवनवीन संकल्प. मात्र काही लोक मद्यपान, पार्ट्या, डिजेचा गोंगाट अशा गोष्टींचा अवलंब नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी करताना दिसतात. आपणा सर्वानाच माहीत आहे की, अशाप्रकारे आपल्या आनंदाचा उन्माद करणे आपल्यासाठी आणि समाजासाठी घातक आहे. तरीदेखील अशा प्रकारे नवीन वर्षाचे स्वागत करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न आपणच स्वतःला विचारायला हवा. माझे स्वतःचे प्रामाणिक मत असे आहे की, अशा प्रसंगी मद्यपान, पार्ट्या, डिजे इ.गोष्टींचा गाजावाजा न करता साधेपणाने चांगले संकल्प करुन नवीन वर्षाचे स्वागत करावे.


 आपल्या रोजच्या दैनंदिनीत अधिकाधिक वेळ मोबाईल आणि सोशल मीडियाच्या संवादात व्यतित करणारे आपण सर्वचजण आपले कौटुंबिक जीवन व आपली कर्तव्य पार पाडतो का? याचा विचार एकदा तरी नव्या वर्षात करूयात.. सरत्या वर्षाला निरोप देतानाच, नव्या वर्षातल्या अनेक संकल्पांसोबतच एक महत्त्वाचा संकल्प करूया, तो म्हणजे आठवडय़ातून एक दिवस नो मोबाईल डे.. आणि साधूया आपल्या प्रियजनांशी प्रेमाचा संवाद. मोबाईलच्या वापराने माणसामाणसांमधील अंतर कमी झाले हे खरे, पण आपल्यासोबत असणा-या आपल्या कुटुंबात राहणा-या व्यक्तींसोबतचा आपला संवाद मात्र कमी होत चालला आहे हे आपण विसरतो आहोत. दिवसाचे तासन्तास या मोबाईलच्या वापरात गुंग असणा-या या पिढीचा संवाद बाहेरच्या विश्वाशी अधिक दृढ झाला आहे. घरात रात्रंदिवस राबणारी आई, आपल्यासाठी उभे आयुष्य कामांत वाहून देणारे वडील यांच्यासाठी खरंच आपण वेळ देतो का? आठवडय़ातून एक दिवस हक्काचा त्यांना द्या. त्यांच्या रोजच्या सुख-दु:खाचे क्षण त्यांच्यासोबत बसून बोलून पाहा.

निस्वार्थ प्रेम देणा-या या व्यक्तींसोबत घालवलेला वेळ हा नेहमीच आपल्या चेह-यावर समाधान उमटवणारा असतो. घरातील वृद्ध व्यक्तींना त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा दिवस वापरा या संवादातून तुमच्यातील एकोपा नक्कीच वाढीस लागेल.
आयुष्यात तुमच्या कुटुंबाव्यतिरिक्त तुम्हाला समजून घेणारे, तुमची सुख-दु:ख जाणणारे मित्र भेटणे म्हणजे आपले भाग्य समजतो. अशाच या मित्रांना प्रत्यक्ष भेटल्यावर मात्र संवाद हरवतो. सेल्फी आणि सोशल मीडिया अपडेट करण्यात आपला वेळ निर्थक वाया घालवतो. आठवडय़ातून एक दिवस जर अशाच जुन्या मित्रांसाठी, आपल्या आवडत्या जुन्या शिक्षकांच्या भेटीसाठी घालवला, तर नक्कीच आपल्या दु:खांचा विसर पडेल. केवळ सजीव मित्रच नव्हे, तर पुस्तक या मित्राच्या सान्निध्यात घालवलेला वेळ उलगडणा-या प्रत्येक पानातून आपल्याला आनंद देत जातो.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. खरे आहे, मोबाईल आठवडयातून एक दिवस बंद ठेवणे ही काळाची गरज आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. लेख छान लिहिला आहे.मोबाईल आठवडयातून एक दिवस बंद ठेवणे ही काळाची गरज आहे.

    उत्तर द्याहटवा

Please do not enter any spam link in the comment box.