२५/२/१९

दहशतवाद : परिणामकारक कृती हवी

दहशतवाद : परिणामकारक कृती हवी
-दादासाहेब येंधे (dyendhe@rediffmail.com)
काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. ४० भारतीय जवान यामध्ये शहीद झाले आहेत.  दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला ठेचून काढायला हवे. अशा भावना व्यक्त होत आहे. किती काळ सहन करायचे, असा प्रश्न प्रत्येक भारतवासी विचारत आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकदा आपण युद्ध जाहीर करावे, त्यांना त्यांच्या देशात जाऊन त्यांना मारावे, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटणे साहजिकच आहे; पण मुळात असे लगेच काही करण्याची आवश्यकता नसते. योग्य पद्धतीने आणि पूर्ण नियोजन करूनच कारवाई केली पाहिजे. ती करत असताना निरपराध सर्वसामान्य लोकांना त्याची झळ बसता कामा नये याचीही दक्षता घेणे गरजेचे आहे. 
आपल्या सैनिकांवर हल्ले होत आहेत. दहशतवादी संघटना असे हल्ले वारंवार घडून आणत आहेत. या संघटनेनं कोणाची फूस आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. दरवेळी सीमेपलीकडून घुसखोरी करून जवानांचे आणि निरपराध नागरिकांचे बळी घेणाऱ्या जशास तसे उत्तर योग्य तयारीनिशी देणे गरजेचे आहे. कारण एकाएकी पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना मारणे हा आततायीपणा ठरेल. कारण यामुळे दोन्ही देशांचे अतोनात नुकसान होईल. त्यामुळे उरीवरील हल्ल्यानंतर ज्याप्रमाणे सर्जिकल स्ट्राइक केला होता तशा प्रकारे पाऊल उचलावे लागेल. भारतीय सेना आणि केंद्र सरकार योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊन दहशतवाद्यांचा बिमोड नक्की करील. 
यासोबतच ज्या तयारीने भारतीय लष्करी  वाहनांच्या ताफ्यावर हल्ला हल्ला करण्यात आला  तो पाहता स्थानिक  मदतीशिवाय  करणे केवळ अशक्य आहे. एवढी प्रचंड  स्फोटके  मिळविणे , ती साठवून  ठेवणे आणि संपूर्ण हल्ल्याची  योजना  आखणे आणि तडीला नेणे हे साधे व एका व्यक्तीचे  काम नाही.
काश्मिरी तरुणांचे ब्रेन वॉशिंग करण्याचे वाढलेले प्रमाण आणि त्यातून दहशतवादी तयार  होणे हा भारताच्या
सुरक्षिततेपुढील आणि एकात्मतेपुढे मोठा धोका  निर्माण होत  आहे. त्याकरिता काश्मिरी  तरुणांना  मुख्य प्रवाहात  आणून देशभक्ती  शिकविणे गरजेचे आहे.

१८/२/१९

मुंबईच्या लाल परीला वाचवा...

मुंबईच्या लाल परीला वाचवा...
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

मुंबईत अतिवृष्टी असो, बॉम्बस्फोट असो की, सण-वार वेळच्यावेळी मुंबईकरांच्या सुख-दुःखात बेस्ट धावून आलेली आहे. मुंबकरांसोबत बेस्टचे एक वेगळेच नाते जडले आहे. हा भावनिक मुद्दा असला तरी तिचे अस्तित्व अबाधित ठेवणे सर्वांचे कर्तव्य आहे. 
बेस्टची आर्थिक परिस्थिती चांगली नाही हे जोरजोरात ओरडून सांगितले जात आहे. बेस्टचा विद्युत विभाग हा नफ्यात आहे. पण, बससेवा तोट्यात आहे. विद्युत विभागामुळे बेस्ट उपक्रम तरला आहे. दहा वर्षांपूर्वी बस सेवेचे प्रवासी ४२ लाखांवर होते. तीच प्रवासी संख्या आजघडीला २५ ते २६ लाखांवर आली आहे. दिवसेंदिवस  प्रवासी संख्या कमी होत असताना, त्याचे नियोजन करताना बेस्ट प्रशासन अपयशी ठरत आहे. 
खरेतर बेस्ट ही नफा कमावणारी संस्था मुळातच नाही, ती एक सेवा देणारी संस्था आहे. आणि जर का ती सेवा देणारी संस्था असेल तर ती फायद्यात असूच शकत नाही. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिका हीसुद्धा सेवा प्रदान करणारी संस्था आहे. पण, त्यातील शिक्षण व आरोग्य विभाग हे नफ्यात आहेत का? जर ते नसतील तर बेस्ट फायद्यातच असावी असे कसे म्हणता येईल. त्यामुळे कुठलीही सेवा देणारी संस्था फायद्यात असूच शकत नाही. त्याकरिता राखीव निधीची तरतूद करायला हवी. राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने त्यांना मदत करावयास हवी. 
वर्षानुवर्षे भाडेवाढ न केल्यास तूट वाढत जाते व ती भरून काढण्यासाठी अचानक मोठी भाडेवाढ केल्यास जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. मात्र राजकारणासाठी बेस्टसारख्या संस्थांच्या गळ्याला नख लागले तरी त्याचे राजकीय पक्षांना सोयरसुतक नसते. त्यातच अनेक भागांत रिक्षा व टॅक्सी यांच्या पॉइंट टु पॉइंट सर्व्हिसला आणि शेअर सेवेला परवानगी दिल्याने प्रवाशांचा कल त्याकडे वळला. शेजारील नवी मुंबई, ठाणे वगैरे महापालिकेतील बसना मुंबईत येण्यास परवानगी दिली गेल्याने बेस्टचे कंबरडे पारच मोडले. आता तर ओला, उबर वगैरे टॅक्सी सेवांनी सर्वच महापालिकांच्या परिवहन सेवांपुढे आव्हान उभे केले आहे. वातानुकूलित बसगाड्या हा तर बेस्टसाठी पांढरा हत्ती ठरला. बेस्टच्या सर्वसाधारण भाड्याच्या तुलनेत वातानुकूलित बसचे भाडे तिप्पट असल्याने प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरवली. याखेरीज बसगाड्यांचे सुटे भाग, टायर खरेदीचे वाढलेले भाव हेही बेस्ट पंक्चर होण्याचे एक कारण आहेच. गेल्या काही वर्षांत ब्रिटिशांचे सार्वजनिक वाहतुकीचे मॉडेल मोडीत काढून खासगी मोटारींचे अमेरिकन मॉडेल मुंबईकरांनी जवळ केले आहे. परिणामी मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत वेळीच बेस्टसारखी संस्था आर्थिक अरिष्टातून बाहेर काढणे गरजेचे आहे.
बेस्टसाठी मुंबईत स्वतंत्र मार्गिका असावी ही मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून आहे. पण, बेस्टसाठी स्वतंत्र मार्गिका तयार केली जात नाही, हे दुर्दैव. भायखळा, परेल, फोर्ट, दादर, कुर्ला, घाटकोपर, चर्चगेट, बॉम्बे सेंट्रल, बांद्रा सारख्या इतर बऱ्याच भागांत बेस्टच्या थांब्याच्या १०० मीटर अंतरापर्यंत रिक्षा, टॅक्सी उभ्या असतात त्यावर बंदी घातली जाणे गरजेचे आहे. जेणेकरून प्रवासी बेस्टकडे वळतील.


१२/२/१९

चला, लेण्याद्रीला...

चला, लेण्याद्रीला...
- दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
पुणे जिल्यातील जुन्नर तालुक्यात बऱ्याच  लेण्यांचे समूह असून त्यांना विविध नावांनी ओळखले जाते. तुळजाबाई टेकडीवरच्या तुळजालेण्या, मनमोदी टेकडीवरच्या मनमोदी लेण्या, मनमोदी टेकडीवरच असलेल्या दक्षिणेकडील भीमाशंकर लेण्या, उत्तरेला अंबा अंबिका लेण्या, भूतलिंगा लेण्या, शिवनेरी लेण्या आणि नंतर लेण्याद्रीचा लेणी समूह. येवढं सगळया लेण्या इथं असल्या तरी लेण्याद्री म्हटलं की पटकन डोळयांसमोर येतो तो तिथला मिरीजात्मज गणपती. 
अष्टविनायक गणपतींमधील आठवा गणपती म्हणून लेण्याद्रीच्या गिरीजात्मकाला ओळखले जाते. अष्टविनायक गणपतींमधील डोंगरामधील हा एकमेव असा गणपती आहे. या गणपतीच्या डोंगरात जवळजवळ २८ गुहा आहेत. कुकडी नदिजवळ असलेल्या डोंगरात या गुहा आहेत. हा डोंगर गणेश पहाड म्हणून ओळखला जातो. त्यातील सातव्या गुहेत गिरीजात्मजाचे मंदिर आहे. म्हणूनच या लेणीला गणेश लेणी असंही म्हणतात. या लेण्या अतिशय स्वच्छ असून हा २८ लेण्यांचा समूह आहे. या पूर्वेकडून पश्चिमेकडे पसरल्या आहेत. सहा आणि चौदा नंबरच्या लेण्यांमध्ये चैत्यगृह आहे आणि बाकी सर्व लेण्यांची रचना ही विहाराप्रमाणे आहे वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्या  चढून गेल्यावर प्रथम चैत्यगृहाची लेणी लागते. त्यानंतरच्या म्हणचे सातव्या गुहेत गणपती आहे. ही लेणी मोठी आहे. बाकीच्या लेण्या लहान असून त्यांना दोन ते तीन कक्ष आहेत. बहुतेक लेण्यांसमोर ओसरीही आहे. या समूहातील सहाव्या नंबरची लेणी ही मुख्य चैत्यगृह म्हणून ओळखली जाते. 
चैत्यगृहाच्या मध्यवर्ती घुमटाकार सहा फूट प्रार्थनास्थळ आहे. व्हरांडयाला सहा खांब असून दोन अर्धखांब आहेत. या खांबावर नक्षीकाम आहे. त्यात वाघ, सिंह, हत्ती यांच्या शिल्पकृती आहेत. गुहेच्या मध्यावरती प्रार्थनास्थळ  कोरण्यात आले आहे. ते घुमटाकार असे आहे. काही ठिकाणी अष्टकोनी खांब आहेत. तळाशी  वरच्या टोकाला जलकुंभाची प्रतिकृती आहे. जलकुंभाच्या वरच्या भागात चक्रावर वाघ, सिंह, हत्ती यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. छताला अर्ध गोलाकार लाकडासारख्या कमानी कोरल्या आहेत. 
सातव्या क्रमांकाच्या लेणीत मोठे विहार असून ही सगळयात मोठी लेणी समजली जाते. ही सगळयात मोठी लेणी असून याच लेणीमध्ये गणराज गिरीजात्मज विराजमान झालेले आहेत. मंदिर या वास्तुसंकल्पनेतील खांब, कमानी, मंडप, शिखर यापैकी कुठल्याही गोष्टी  त्या ठिकाणी सापडत नाहीत. खांबविरहीत ५७ फूट लांब, ५२ फूट रूंद, असं गुहेप्रमाणे हे मंदिर आहे. ही मूर्ती इतर अष्टविनायकांप्रमाणे आखीव-रेखीव नाही. केवळ दगडात कोरलेली बालगणेशाची मूर्तीच तिथे पहावयास मिळते. बाहेरच्या सभामंडपात केवळ खिडक्या आहेत. या गुहेचं वैशिष्ट्य म्हणजे जोपर्यंत आकाशात सूर्य असेल तोपर्यंतच या गुहेत प्रकाष असतो. सूर्य मावळला की गुहेत केवळ अंधार पसरतो. थोडक्यात गुहेत एकही बल्ब नाही. मात्र ही गुहा कोणी आणि कधी तयार केली याचा संदर्भ सापडत नाही. मात्र, हिच्या आजूबाजूला असलेल्या काही लेण्यांमध्ये त्या लेण्याच्या रचनेचे काही तुटक तपशील सापडतात. 
चैदाव्या क्रमांकाच्या लेणीतही चैत्यगृह असून त्यात खाबं पहायला मिळतात. येथे स्तुपावर दंडाकृती गोलाकार नक्षी तसेच चौकोनी  हर्मिका असून छतापर्यंत जाणाऱ्या  पायऱ्यांची  रचना ही पिरॅमिडप्रमाणे केलेली दिसते. छतात छत्री कोरलेली आहे. दालनातील खांब अष्टकोनी असून वरच्या बाजूला घटाप्रमाणे आकार आहे. तसेच वरच्या बाजूला छानसा कळसही आहे.
या समूहातील बाकीच्या लेण्या या लहान स्वरूपाच्या आहेत. डोंगर पोखरून त्या तयार केलेल्या  
आहेत. 

९/२/१९

'ठाकरे' म्हणजे साक्षात बाळासाहेब

'ठाकरे' म्हणजे साक्षात बाळासाहेब
-दादासाहेब येंधे(dyendhe@rediffmail.com)
बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन कहाणीवर 'ठाकरे' हा चित्रपट प्रसिद्ध झाला आहे. हा चित्रपट पाहताना जणू बाळासाहेब ठाकरेच समोर उभे आहेत की काय असे वाटते. सदर चित्रपट दंगलीचे बरेचसे सीन आहेत. केवळ बाळासाहेबांनी सांगितले तर दंगल थांबू शकते याचे चित्रण या चित्रपटात दाखवले गेले आहे. ज्यांनी बाळासाहेबांना पाहिले आहे, अनुभवले आहे त्यांना ही गोष्ट पूर्णतः पटते. कारण, खरोखरच बाळासाहेबांच्या हातात नव्हे तर बोटात दंगल  शमविण्याची ताकत होती कारण त्यांच्यावर लोकांचे प्रेम होते. "जमलेल्या माझ्या, तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो" हे शब्द उच्चारताच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात करीत. या शब्दांनी तब्बल पाच दशके मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजविले. बाळासाहेब ठाकरे उभे राहिले की, टाळ्यांचा कडकडाट होत असे. त्यांचे भाषण म्हणजे तुफान टोलेबाजी असे. आव्हान, थट्टा, मिमिक्री, शिव्या, धमक्या आणि शब्दांच्या कोट्या यांनी भाषण भरलेले असायचे. या बिनधास्त शब्द शैलीमुळे मराठी माणसाचे रक्त सळसळत असायचे त्यांच्या भाषणाने मराठी माणसाच्या अंगात एक प्रकारे उत्साह संचारत असे. बाळासाहेब ठाकरे जे म्हणतील त्याला साहेबांचा आदेश मानून जे होईल त्याला निधड्या छातीने सामोरे जाण्याची धमक मराठी माणूस ठेवीत होता. मराठी माणूस तात्काळ त्यांच्या आदेशाचे पालन करीत होते. हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसासाठी बाळासाहेबांनी जो लढा दिला त्यावर या चित्रपटात चित्रण करण्यात आलेले आहे. बाळासाहेब ठाकरे सारखे कणखर नेतृत्व महाराष्ट्राला लाभले. देशातील राजकारण त्यांच्यामुळे ढवळून निघाले. पाकिस्तानातही हिंदूंचा कैवारी म्हणून बाळासाहेबांचे नाव घेतले जाऊ लागले. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसासाठी त्यांनी घेतलेले कष्ट केलेला संघर्ष या चित्रपटातून करण्यात आलेला आहे.

५/२/१९

पती-पत्नीत सुसंवाद ही काळाची गरज

पती-पत्नीत सुसंवाद ही काळाची गरज
विसंवाद हेच संसारातील संकटाचं कारण
- दादासाहेब येंधे 
कुटंब किंवा ज्याला परिवार म्हणतात, ते कुटुंब म्हणजे एक रथ आहे आणि या रथाची दोन चाके म्हणजे पती आणि पत्नी होत. हा रथ सुस्थितीत राहावा, तो सुस्थितीत चालावा, जीवनातील खाचखळग्यांनी उलटून न जाता हा कौटुंबिक रथ शांत, सहज व संथगतीने परंतु संयम व सामंजस्याने पुढे न्यावा अशी  अपेक्षा असते. परंतु अलीकडे कुटुंबाच्या व्याख्या बदलत चालल्या आहेत. परिस्थितीही पूर्वीसारखी राहिलेली नाही. त्यामुळे कुटुंबव्यवस्था मर्यादित होत आहेत. कुटुंब म्हणजे पती-पत्नी अशी  व्याख्या आजकाल करण्यात येते. आई-वडील कुटुंबाच्या व्याख्येतून वगळण्यात आले आहेत. वेगळेपणा जपता-जपता पती-पत्नीत कधी-कधी शुल्लक कारणांवरून खटकेही उडतात. वाद-प्रतिवाद होतात. यामुळे घटस्फोटासारखे प्रकार वाढत आहेत. विभक्त राहण्याचे प्रकार वाढत आहेत. अनेकांचे वाद न्यायालयात आहेत. अनेकांचे स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये आहेत. यामुळेच आजची कुटुंबव्यवस्था खिळखिळी होऊन मोडकळीस आलेली आहे. 
पती-पत्नी नाते दृढ करायला हवे
विवाह हा धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक संस्कार आहे. या विवाह संबंधांना सामाजिक मान्यता आहे याचे भान ठेवावे. एकदा पती म्हणून ज्याचा स्वीकार केला त्याच्याशी प्रामाणिकपणे आपले संबंध अधिक दृढ करण्याची नितांत गरज आहे. पतीनेही पत्नीला समजावून घेतले पाहिजे. पत्नीच्या चुका जाणून घेऊन त्या मार्गी लावण्यात तिला धीर द्यावयास हवा. तिच्या मनातील शं -कुशंकांचे जाळे-जळमट पुसून टाकायला हवे व सर्वस्वी ती आपली सहधर्मचारिणी आहे. या धार्मिक संस्काराची आठवण पदोपदी ठेवून पती-पत्नीचे नाते दृढ करायला हवे. 
एकमेकांच्या भावनांचा आदर करा
पती -पत्नीने विवाह झाल्यानंतर आपले वैवाहिक जीवन व कौटुंबिक जीवन सुखाचे, समाधानाचे राहण्यासाठी आपापसात सहकार्य, सद्भाव, सद्विचार व सद्वर्तन ठेवण्याची नितांत गरज आहे. पती-पत्नीला संपूर्ण आयुष्य  एक-दुसऱ्याच्या  सहकार्यानेच पार पाडावयाचे आहे. एक-दुसऱ्याची सुख दुःखे, यश -अपयश आपापसात वाटून घेऊन जीवन जगावे. एकमेकांच्या सहकार्यातच खऱ्या जीवनाचा आनंद सामावलेला आहे. एक-दुसऱ्याच्या भावभावनांचा आदर करीत सद्भावनेने जीवन जगणे ही काळाची गरज आहे. 
संषयी वृत्ती टाळावी
पती-पत्नीत अगदी किरकाळ कारणांवरून वाद होतात. एकमेकांविशयी संशय घेणे, एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेणे, पत्नीचे पूर्व चारित्र्य जाणून घेणे यामुळे पती-पत्नीत वारंवार वाद होतात व त्याचा परिणाम वाद-प्रतिवाद, आत्महत्या किंवा हत्या करण्यामध्येही होतो. दोघेही पती-पत्नीने संषयी वृत्ती टाळावी. दोघांनीही एक-दुऱ्याशी  एकनिष्ट राहावे व आपले नातेसंबंध टिकविण्यास पोषक विचाराप्रमाणे वागावे व वर्तन ठेवावे. स्वतःचा अहंभाव दोघांनीही टाळावा.
पत्नीने बोलावं...पतीने ऐकावं
पतीला सगळयाच गोष्टी सांगाव्यात, त्याच्याजवळ मन मोकळं करावं असं स्त्रियांना वाटतं; पण त्याची प्रतिक्रिया काय होईल, या विचाराने त्या बोलत नाहीत. मनातलं काय आहे ते बोलणाऱ्या  स्त्रिया फार थोडया असतात. पत्नी आपल्याशी का बोलत नाही याचा विचार पतीनेही करायला हवा. प्रत्येक क्षणात, विचारात, सुखःदुखाच्या प्रसंगात सोबत राहू, असं वचन सात फेरे घेताना दिलं होतं याचा विचार करून पुरूषांनी पत्नीला काय वाटतंय हे समजून घ्यायला हवं. असं बऱ्याच संसारात होत नाही. कारण पती-पत्नीत संवाद नसतो आणि हेच विसंवादाचं कारण बनतं. घरात वाद नको म्हणून बरेचदा स्त्रिया मनातलं बोलत नाहीत; पण न बोलण्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात हे पती आणि पत्नीनेही लक्षात घ्यायला हवं. याचा अर्थ पत्नीने काहीही बोलावं आणि पतीने निमूटपणे ऐकून घ्यावं असा नाही. दोघांच्याही संवादात तारतम्य असायला हवं. भांडणं होतात म्हणून बोलायचं नाही, ही पती-पत्नीची भूमिका चुकीचीच आहे.
संसार दक्षतेनेच करावा लागतो
पुरूष  हे स्वभावतः बहिर्मुख असतात. व्यसनांकडे झुकण्याचा त्यांचा जास्त कल असतो. आपण कमावतो म्हणून आपल्याला कसंही वागण्याची मोकळीक आहे, असा समज पुरूषांनी  करून घेणे सर्वस्वी चूक आहे. आजकाल स्त्रियाही संसारात ताळतंत्र सोडलेल्या पतीप्रमाणे वागू लागल्या तर काय होईल याचा विचार करायला हवा. 
विपरीत परिस्थितीत अनेकांचे संसार टिकून राहतात; कारण अशा जोडप्यांनी दक्षतेने संसार केलेला असतो. एकमेकांना समजून घेत, सांभाळत, आदर करत, परिस्थितीचं भान ठेवत, एकमेकांवर प्रेम करत त्यांनी संसार केलेला असतो. एकमेकांसाठी स्वभावाला मुरड घालणं यातला आनंद लक्षात आला की सुखी संसाराचं वेगळं रहस्य नाही, हे लक्षात येईल.  

४/२/१९

सर्वांना समर्पित असलेला अर्थसंकल्प

सर्वांना समर्पित असलेला अर्थसंकल्प
-दादासाहेब येंधे (dyendhe@rediffmail.com)
गेल्या नऊ वर्षांपासून लोकसभेच्या निवडणुका मे महिन्यात होत असल्यामुळे सरकार अंतिम अंदाजपत्रक सादर करते. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने एक प्रकारे सहा ते सात महिन्याचा काळ धोरणात्मकदृष्ट्या आणि अनिश्चिततेचा असतो. म्हणजे राजकारणाच्या अनिवार्यतेमुळे अर्थकारणाला दुय्यम स्थान दिले जाते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर होणारा अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प असतो. विद्यमान सरकारने एक विश्वासपूर्वक आणि दिशादर्शक अर्थसंकल्प सादर केला. खनिज तेलाच्या वाढनाऱ्या किमती आणि रुपयाची घसरण झाल्यामुळे २०१८ मध्ये भारताची आर्थिक घडी विस्कळीत झाली होती. खनिज तेलाची किंमत शंभरी गाठणार असे वाटत असतानाच दिलासा मिळाला आणि भारताच्या परकीय गंगाजळीवरचा ताणही कमी झाला. या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३.४ टक्के उद्दिष्ट ठेवून सरकारने आर्थिक शिस्त पाळली हे चांगलेच म्हणावे लागेल. 
अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्पात मध्यम वर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे. सध्या अडीच लाख रुपयांचे असलेली करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवून पाच लाख रुपये केली आहे. स्टॅंडर्ड डिडक्शन ४० हजार रुपयांवरून ५० हजार रुपये केले आहे.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच  छोट्या शेतकऱ्यांना दरमहा ५०० रुपये उत्पन्न, असंघटित कामगारांना ३ हजार रुपये मासिक निवृत्तीवेतन सामान्य करदात्यांना ५ लाखांची कर सवलत इत्यादींबरोबरच नवीन उद्योगांना उलाढालीची मर्यादा न ठेवता कंपनी करात ५ टक्के सवलत नोंदणीकृत लघुउद्योग २ टक्के व्याज सवलत आहे. हे एक ऐतिहासिक पाऊल आहे असेच म्हणावे लागेल.
ग्रामीण अर्थकारणात शेती हा महत्त्वाचा भाग आहे. गेल्या साडेचार वर्षात सरकारने राबविलेल्या विविध योजनांच्या आधारे शेतकऱ्यांनी त्यांचे उत्पन्न दुप्पट केले आहे; परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात कृषीआधारित उत्पादनांच्या किमती कमी झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी झाले. म्हणून बियाणे शेती उपयोगी अवजारे मनुष्यबळ यासाठी सहकार्य करण्यासाठी तसेच सावकारांच्या तावडीतून आणि कर्जबाजारी होण्यापासून वाचण्यासाठी यांचा समावेश आहे. अशा शेतकऱ्यांसाठी विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सरकारने काही नवीन योजना आणल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणखी बळ देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आलेला आहे.

दूध उत्पादकांचा रोजगार वाढावा

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com) ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणाऱ्या दुग्धव्यवसायाची तर कोरोनामुळ...