३१/५/२०

जीव घ्यायला लावतं ते कसलं प्रेम?

जीव घ्यायला लावतं ते कसलं प्रेम?
-दादासाहेब येंधे

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एका २५ वर्षीय शिक्षिका असलेल्या तरुणीला भररस्त्यात पेट्रोल टाकून जिवंत पेटवण्यात आले. विकेश नामक इसमाने सदर कृत्य केले. ३फेब्रुवारी २०२० रोजी ही घटना घडली. या घटनेत जबर भाजलेल्या त्या पीडितेचा नागपूरच्या रुग्णालयात मृत्यू झाला. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली. पण, त्यांना यश आले नाही. त्या पीडितेची मृत्यूशी झुंज आठव्या दिवशी संपली.

खरंच, खरं प्रेम असा जीव गेला शिकवतं का? आणि जीव घ्यायला शिकवते ते कसलं हो प्रेम? असा प्रश्न यानिमित्ताने समोर उभा ठाकला आहे. आपल्यासोबत असा अनर्थ घडेल याची पुसटशी कल्पनाही तिच्या मनात उमटली नसेल. त्यामुळेच अगदी बिनधास्तपणे सकाळी घरून कॉलेजला जाण्यासाठी निघाली कॉलेजला गेल्यावर मुलांना शिकवायचं, कॉलेज संपवून घरी आल्यानंतर मैत्रिणींबरोबर वेळ घालवायचा. इतरांप्रमाणे असे अनेक विचार हिंगणघाट येथील त्या पीडित तरुणीच्याही डोक्यात आले असतीलच. तोच एकतर्फी प्रेम करणारा नव्हे, तर एक विकृत, हैवानियत डोक्यात संचारलेला माथेफिरू युवक येतो आणि त्या निरागस, निष्पाप तरुणीच्या मागे धावून तिच्या अंगावर पेट्रोल ओततो. जळत असलेला एक टेंभा तिच्या अंगावर फेकतो. का बरं, आपल्यालाही बहीण, मुलगी आहे असा साधा विचारही त्याच्या मनात येत नाही? असंच पेट्रोल ओतून आपल्यालाही जिवंत जाळलं तर त्या वेदना आपल्यालाही सहन होतील का?असा विचार आजच्या या तरुणपिढीनं, युवावर्गानं करायला नको का? एखाद्याला नकार देणं म्हणजे तिला जीव गमवावा लागणं. हा एवढा गंभीर गुन्हा आहे का...? मुलींनाही भावना असतात, त्यांनाही जगण्याचं स्वातंत्र्य आहे हे या अशा विकृतांना केव्हा कळणार?

एकतर्फी प्रेमातून हत्याकांडे, हल्ली हा प्रकार महाराष्ट्राला काही नवीन नाही. वृत्तपत्रांची पाने उलटताच किंवा न्यूज चॅनेल सुरू करताच एकतर्फी प्रेमातून खून, हत्याकांड, हल्ला आशा बातम्या वाचावयास, ऐकावयास मिळतातच मिळतात. उल्हासनगरचा रिंकू पाटील हत्याकांडाने याची ठळक सुरुवात झाली होती. ३१ मार्च १९९० रोजी हरेश पटेल व त्याच्या साथीदारांनी परीक्षा केंद्रात वर्गात रिंकूवर वार केले व पेट्रोल टाकून जिवंत जाळले होते. हरेशचे रिंकुवर प्रेम होते. तिने त्याला नकार दिला. तो सैरभैर झाला. त्याने तिचा जीव घेतला. त्यानंतरच्या हत्याकांडाची जी काही मालिका सुरू झाली ती आजही कायम आहे. माहीममध्ये विद्या मोहिते हिला भररस्त्यात ठार मारण्यात आले. सांगलीच्या शास्त्री चौकात सुनीता देशपांडे हिची भरदिवसा हत्या करण्यात आली. 'मला नकार देतेस, तू माझी होऊ शकत नाहीस. तर मग तू कुणाचीच नाही, तुला जगण्याचा अधिकार नाही'. ही मानसिकता यातून दिसून येते. रिंकू, विद्या, सुनिता.. अशी काही निवडक बळीतांची माहिती प्रसिद्ध झाली ती प्रसिद्धी माध्यमांच्या सतर्कतेमुळे. त्यांनी सदर प्रकरणांना प्रसिद्धी दिल्यामुळे बाकीच्या घटनांची प्रसिद्धी झाली नाही. त्यातील बळी त्यांची नावेही कुणाला ठाऊक नाहीत.

 हिंगणघाट येथील घटनाही अशाप्रकारेच प्रेमाला प्रतिसाद न देण्यातून घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेतील आरोपी विवाहित असून त्याला छोटी मुलगीही आहे. आपल्या मनासारखे घडत नाही म्हणून शिक्षकेस जिवंत जाळण्याची मानसिकता एकदम भयानक अशीच म्हणावी लागेल. असे विकृत मानसिकता आणि त्यास बळी पडणाऱ्या तरुण अथवा पुरुषांना रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे.

फक्त प्रत्येक वेळेला घटना घडून गेल्यानंतर कठोर कायदे करावे असे म्हणून चालणार नाही. तर त्यासाठी समाजाची एकंदरीत मानसिकता बदलण्याची गरज आहे. कायदेशीर पातळीवरच कठोर काम करत असताना समाजात स्त्री- पुरुष समानता हा विचार खोलवर रुजवायला हवा. हे काम सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून लोकसहभागातून करता येईल. वाढत्या अत्याचाराच्या घटना आजचे सामाजिक वातावरण जबाबदार आहे. मुलांना बालपणापासूनच चांगले संस्कार झाले तर ते वाईट गोष्टींच्या नादाला लागणारच नाही घरातूनच स्त्रीबद्दल आदर करण्याचा आदर्श निर्माण व्हायला हवा.

असे असंख्य माथेफिरू समाजात उजळ माथ्याने वावरत आहेत. पण, त्यांच्यातील विकृतीचं काय? हा प्रश्न कायम राहतो. ही प्रवृत्ती आता वेळीच ठेचून काढणं गरजेचं आहे. नाहीतर मुली निर्धास्तपणे घरातून बाहेर पडू शकणार नाहीत. स्त्री ही हाडामासाची आपल्यासारखीच माणूस आहे तिला वेदना आणि संवेदनाही आहेत. त्याचा आदर करण्याची सुबुद्धी जेव्हा पुरुषांमध्ये येईल. तेव्हाच बलात्कार आणि अत्याचार थांबतील.


२८/५/२०

पुन्हा 'मिनी भोपाळ'..?

पुन्हा 'मिनी भोपाळ'..?
-दादासाहेब येंधे
एलजी पॉलिमर इंडस्ट्री या विशाखापट्टणम येथील कंपनीच्या टाकीतून (७ मे २०२०रोजी) वायूगळती झाल्याने ११ जणांचा मृत्यू झाला. अनेकजण बेशुद्ध पडले. चालता-चालता लोक चक्कर येऊन पडत होते असे एकंदरीत चित्र पाहायला मिळत होते. भारतीय नौदल, अग्निशमन दल, पोलीस तसेच वैद्यकीय पथक यांच्या अथक प्रयत्नामुळे व त्यांनी वेळेवर केलेल्या बचावकार्यामुळे अनेकांना वाचवण्यात यश आले.
साडेतीन दशकांपूर्वी झालेल्या (३डिसेंबर १९८४) भोपाळमधल्या घटनेनंतरही देशात वायुगळतीच्या अनेक घटना वारंवार आजही घडत आहेत. मुंबई मधील शीव येथील क्लोरीन वायूगळती, केंद्र सरकारच्या पेट्रोलियम कंपनीत झालेली वायुगळती, तारापूर परिसरात अनेकदा झालेली वायुगळती, डोंबिवलीत हिरवा पाऊस, नगर जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये बायोगॅस प्रकल्पात झालेला कामगारांचा मृत्यू अशा कितीतरी घटना येथे नमूद करता येतील. परंतु, त्यातून आपण आपत्ती व्यवस्थापनाचे काही धडे गिरवले आहेत का..! तर या प्रश्नाचे उत्तर नाही असेच येत आहे. भोपाळ आणि विशाखापट्टणम येथील दोन्ही घटनांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे दोन्ही ठिकाणी वायू गळतीच्या घटना पहाटेच घडल्या. गाढ झोपेत असलेल्यांना पुन्हा श्वास घेताच आला नाही. विशाखापट्टनम मधली घटना उन्हाळ्यात घडल्याने वायुगळतीचा परिणाम पाच किलोमीटर परिसरापुरता मर्यादित राहिला आणि लोकसंख्येची घनता कमी असल्याने जीवितहानी कमी झाली. विशाखापट्टणम येथे १९६१ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प हिंदुस्तान पॉलीमर्सच्या मालकीचा होता. १९९७ मध्ये त्याची मालकी दक्षिण कोरियाच्या एलजी या कंपनीकडे आली. विशाखापट्टणमचा प्रकल्प दक्षिण कोरियाचा आहे.
स्टायरिन  प्राथमिक उपयोग हा  पॉलिस्टीरीन प्लास्टिक आणि रेझिन्स (राळ) बनविण्यासाठी होतो. स्टायरिन वायू हलकासा पिवळ्या रंगाचा असतो.  स्टायरिन हा ज्वलनशील वायू असून त्याला गोड असा वास येतो. बेन्झीन आणि इथिलिनपासून या वायूची कारखान्यांसाठी निर्मिती केली जाते. कंटेनर, पॅकेजिंग, सिंथेटिक मार्बल, फ्लोरिंग टेबलवेअर, आणि मोल्डेड फर्निचर मध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक आणि रबराच्या निर्मितीसाठी याचा वापर होतो. हवेतल्या स्टायरिन वायूमुळे डोळे जळजळणे, घशात घरघर, खोकला आणि असे प्रकार होतात. डोकेदुखी, मळमळ, उलट्या अशक्तपणा चक्कर येणे अशी लक्षणे आढळतात.
स्टायरिन लवकर आग पकडतो आणि आग लागल्यावर त्यातून विचार विषारी वायू  निघतो. आता या वायू गळतीच्या घटनेने अन्य शहरांना सावध केले आहे. गोव्यापासून कल्याण-डोंबिवली, पालघर, तारापुर, बोईसर, नागोठणे, रोहा अशा शहरांपर्यंत आणि ठिकाणी असलेल्या रासायनिक कंपनीसाठी हा एक धोक्याचा इशारा मानावा लागेल या सर्वच कंपन्यांना आता सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनांची खातरजमा करावी लागणार आहे.

भारतात मात्र सातत्याने छोट्या मोठ्या औद्योगिक दुर्घटना घडत असतात आणि प्रत्येक वेळी आपण त्या घटनेला 'मिनी भोपाळ' असे म्हणतो आणि पुढे सरकतो औद्योगिक विकास गरजेचा आहेच पण त्यासाठी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन ही व्हायला हवे. आपल्या देशात रासायनिक कारखाने म्हणजे विषारी वायूचे ज्वालामुखीच बनले आहेत की काय असे वाटते. कधी कुठल्या ज्वालामुखीचा उद्रेक होईल हे सांगता येत नाही विषारी रसायने जमिनीत मिसळण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण आणण्यात आपण यशस्वी ठरललो नाही. विषारी वायूची विल्हेवाट विषारी कचऱ्याचे विघटन यासारखे विषयही आपल्या व्यवस्थेत सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहेत ही मानसिकता बदलणे नितांत गरजेची आहे. देशात इतके विविध प्रकारचे कारखाने उद्योग कार्यरत आहेत त्यांची सुरक्षितता किती आणि कशा पद्धतीची आहे हे तपासून पाहण्याची यंत्रणा विकसित व्हायला हवी. 


१८/५/२०

नियोजनशून्यतेचे बळी

नियोजनशून्यतेचे बळी
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

कोरोनाने अख्ख्या जगाचीच झोप उडवली आहे. त्यातच आपल्याकडे लॉक डाऊन जाहीर झाल्यामुळे हातावर पोट असलेल्यांच्या हालाची तर परिसीमाच राहीली नाही. ज्यांनी रोजंदारीवर ठेवायचे त्याच ठेकेदारांनी जर हात आखडता घेतला तर दाद मागायची कुणाकडे...? असा जटिल प्रश्न सध्या बांधकाम, हॉटेल व्यवसाय, विटभट्ट्यांवर काम करणाऱ्या, रोजंदारी करणाऱ्या मजुरांना लॉक डाऊनमुळे पडला आहे. कोरोनाच्या साथीमुळे देशभर लॉक डाऊन जाहीर झाल्याने अन  देशातील सारे व्यवहार ठप्प झाल्याणमुळे  हातावर पोट असणाऱ्यांची रोजीरोटी हिरावली गेलीय. मुंबईत राहणे, खाणे परवडत नाही आणि लॉक डाऊनमुळे छोटी-मोठी हॉटेल, हातगाड्या, खाउगल्ल्या बंद असल्यामुळे खाणेही मिळत नाही. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या तसेच कामधंदा गमावून बसलेल्या मजुरांना 'गड्या आपुला गाव बरा' असे म्हणण्याशिवाय पर्याय उरला नाही. कोरोनाच्या भीतीमुळे अन खायला अन्न मिळत नसल्यामुळे परप्रांतीय कामगारांनी ठाणे, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे अशा महानगरांमधून काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे. कधी सायकल, तर कधी सिमेंटचा मिक्सर, दुधाचा टँकर मधून, काहीजण आपले सामान डोक्यावर, मुला-बाळांना कडेवर घेऊन पायी चालत, तर कधी ट्रकच्या टपावरून आदी जे जे मिळेल त्यातून प्रवास करीत मजुर आपल्या जन्मस्थळाकडे जाण्यासाठी धडपड करताना दिसून येत आहेत. एवढेच नव्हे तर सात-आठ महिन्यांच्या गर्भवती महिला भर उन्हात चालताना बातम्यांतून दिसल्या. काही रस्त्यातच बाळंत झाल्या. मुंबई ते वाशिम हे अंतर एक गर्भवती महिला मे महिन्याच्या भर उन्हात चालत गेली.  खरेतर हे योग्यच नव्हे तर आपल्यासोबतच आपल्या कुटुंबांचाही जीव धोक्यात घालणारी जीवघेणी धडपड म्हणावी लागेल. मजुरांना त्यांच्या राज्यात घेऊन जाणाऱ्या अशा ट्रकवर पोलीस कारवाई करतानाची दृश्ये टीव्हीवर बातम्यांमधून रोज पहावयास मिळत आहे.

जेवढं अन्न आपल्याला रोज हवे आहे ते न मिळाल्यास आपण किती दिवस पोट मारून जगू शकतो याचा प्रत्येकाने विचार करावा. रोजंदारी नसल्यामुळे एखादा मजूर परप्रांतात किती दिवस राहणार? तरीही गेला दीड महिना मजुरांनी तग धरलाच ना..? आणि मग लोक घराबाहेर पडले अन पोलीस रस्त्याने जाऊ देत नाहीत म्हणून लपूनछपून मार्ग काढीत राहिले. आणि त्यातील काहींनी मग रस्त्याऐवजी रेल्वे ट्रॅकची निवड केली असावी. सिंगपूरहून लोकांना आणायला एअर इंडियाचे विमान सोडण्यात आले. 'लॉकडाऊन' होण्याअगोदर अशी दहा-पंधरा विमाने इतर देशातही पाठवण्यात आली होती. मात्र, ज्या असंघटित क्षेत्रातील मजूर आणि कामगारांच्या दुखण्याची आपण चर्चा करतो आहोत; त्यांच्यासाठी साधी बस अथवा रेल्वे उपलब्ध करून देण्यात येऊ नये हेच आमचे दुर्दैव.
औरंगाबाद-जालना रेल्वे मार्गावर झोपलेल्या काही मजुरांना मालगाडीने चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात सोळा मजुरांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. सटाणा शिवारातील एमआयडीसीच्या उड्डाणपुलाजवळ पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जालना येथील कारखान्यात काम करणारे हे मजूर पायी चालत असताना जालना येथून औरंगाबाद रेल्वे स्टेशन कडे निघाले होते. घटनास्थळावरील दृश्य बातम्यांतून पाहताना अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारे होते.  जालना येथून मध्य प्रदेशात जाण्यासाठी रेल्वे नसल्याने त्यांनी पोलिसांच्या नाकाबंदी मुळे जालना-औरंगाबाद रोड महामार्ग न वापरता त्याला समांतर जाणाऱ्या रेल्वे लाईनचा मार्ग अवलंबला. त्यानुसार ते सर्वजण १२ वाजेच्या सुमारास पायी चालत निघाले. जालना पासून करमाड पर्यंत ४० किलोमीटरचे अंतर चालून हे मजूर सटाणा शिवारातील रेल्वेच्या १३९/७ या नबरींग पोलपर्यंत पोहोचले. थकवा आल्याने आणि लॉक डाऊनमुळे या मार्गावर रेल्वे येणार नाही, असे समजून २० पैकी १८ मजुरांनी रुळावर अंथरून टाकून अंग टाकले. यातील तीन मजूर रूळ सोडून बाजूला झोपले. थकल्यामुळे सर्वांना गाढ लगेच झोप लागली. शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता जालना कडून  पानेवाडीकडे (मनमाड) मालगाडी जात होती. जवळ आल्यावर या मालगाडीच्या चालकाने रोडवर झोपलेल्यांची गर्दी पाहता जोरजोरात हॉर्न वाजविला. मात्र, त्यातील कोणीही न उठल्याने मालगाडी त्यांना चिरडून पुढे निघून गेली. या भीषण अपघातात १४ जण जागीच ठार झाले. तर दोन जखमींना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मुत्यू झाला.

हे मजूर रेल्वेने मध्य प्रदेशात परत जाण्यासाठी जालन्यावरून औरंगाबादकडे पायी निघाले होते. पण, मालगाडीच्या रूपाने मृत्यूच जणू त्यांच्यासमोर धडधडत आला अन या मजुरांचा जीव घेऊन गेला. त्यांचा अपराध हाच की ते रेल्वे रुळांवर झोपले होते. पण, त्यांचावर ही आत्मघाताची वेळ का आली, याकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही. एकीकडे देशभर लॉक डाऊन जाहीर होऊन जवळजवळ दीड महिना होऊन गेला आहे. उन्हाच्या झळा वाढत असल्याने त्यात होरपळलेल्यांचीही संख्या वाढत आहे.
खरेतर या देशातील गरिबांना कुणी वालीच नाही की काय अशी एकंदरीत स्थिती झाली आहे. जातीधर्माच्या नावाखाली आणि गरिबांच्या गरिबीचं राजकारण करायचं आणि सत्ता उपभोगायची एवढेच येथील राजकारण्यांना माहीत आहे. गरीब व्यक्ती जगली काय अन मेली काय! कुणालाही कशाशीही काही देणेघेणे नाही. 

आता महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी आवाज उठवल्यामुळे गेल्या आठवड्यापासून स्थलांतरित कामगारांसाठी विशेष लोकल सोडण्यात येत आहे. असे असले तरी वैद्यकीय प्रमाणपत्रापासून ते तिकिटांच्या खर्चापर्यंत अनेक गोष्टींत स्पष्टता आणि नियोजनाचा अभाव यामुळे पुन्हा अराजकाची स्थिती निर्माण झाली आणि घराची ओढ लागलेले मजुर सैरभैर झाले. त्यामुळे या मजुरांचा बळी मालगाडीने घेतला की नियोजनशून्यतेने याचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.१३/५/२०

कोरोनानंतर देशात बरेच काही बदलेल

कोरोनानंतर देशात बरेच काही बदलेल
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
काळ सगळं काही बदलून टाकतो, असा फार जुना समज आहे.पण, आपला इतिहास असे सांगतो की, काही घटना जग बदलून टाकतात किंवा जगाला नाईलाजाने का होईना बदलावे लागते. अशा घटना मानवनिर्मित असतात किंवा नैसर्गिक, पण वास्तव असे सांगते की, अशा घटनांनंतर नागरिकांच्या जीवनातील गरजाही बदलून जातात. त्यातूनच काही नव्या गोष्टींचा उदय होतो. जसे की,  २६ /११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पोलीस दलात अद्ययावत शस्त्रे, बोटी, बुलेट-प्रुफ जॅकेट असे कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यात आली जागोजागी सीसीटीव्ही सुद्धा बसविण्यात आले. एचढेच नव्हे तर कित्येक देशांत दहशतवाद्यांनी हल्ले केल्यानंतर विमानतळावर सुरक्षा कडक केली. स्कॅनिंग पद्धतीत मोठे बदल केले गेले. 
असाच काहीसा बदल कोरोना नंतर आपल्या देशात होऊन आपले आयुष्य बदलून टाकेल. आज कोरोना आपत्तीमुळे देशापुढील अनेक  आव्हानांसोबतच अनेक चांगल्या गोष्टी सुद्धा समोर आल्या आहेत. देशात गरजेनुसार आरोग्य सुविधांसाठी आवश्यक अशा समुग्रीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जात आहे.  यात सामान्य नागरिकसुद्धा मागे नाही. अनेक नागरिक आपापल्या परीने मास्क, सॅनिटाझर निर्मिती तर काही संशोधन संस्था कोरोना बधितांसाठीच्या चाचणीचे अल्प दरातील यंत्र, पी.पी.ई. किट इत्यादींचे उत्पादन करताना दिसत आहे. भारतातील काही कारण ग्रहांमधील कैदी सुद्धा रात्रंदिवस मास्कचे शिवणकाम करीत आपल्या देशभक्तीचा परिचय देताना दिसत आहेत. अनेक सामाजिक संघटना सरकारी यंत्रणेच्या मदतीशिवाय आणि दीनदुबळ्यांची मदत करण्यात व्यस्त आहेत. एकूणच गरज ही शोधाची जननी म्हटल्यास भारतात अनेक उद्योग कुटिरोद्योग असो की अन्य, सुरू करण्यास उपयुक्त वातावरण निर्माण झाले आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मेड इन चायना ऐवजी दोन रुपयांनी जरी महाग असले तरी 'मेड इन इंडिया' उत्पादने सामान्य भारतीय खरेदी करण्यास प्राधान्य देतील.
कोरोननानंतर पर्यटन क्षेत्रातही मोठे बदल होतील. लोक गर्दीच्या ठिकाणांना टाळून निसर्ग पर्यटनाला पसंती देतील. देशांतर्गत, त्यातल्या त्यात राज्यातल्या पर्यटनस्थळांकडे पावले वळतील. पर्यटन स्थळांवर अधिक काळजी घेतली जाईल. रिसॉर्टमध्ये निवास, प्रवासाच्या नियमांतही मोठे बदल होतील. 
आपण कोरोनाला हरविल्यावर 'हेल्थ अँड हायजिन' हेच आपले सर्वोच्च प्राधान्य असेल. व्यक्तिगत स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येईल. भविष्यात आपल्या देशात आरोग्यसेवा या चांगल्या प्रतीच्या व सर्वांना परवडतील अशा होतील. सरकारी रुग्णालयांची स्थिती बऱ्याच प्रमाणात सुधारेल. साबण, सॅनिटाझर, मास्क व इतर काही औषधांची मागणी वाढेल. म्हणजे हायजीनवर सर्वात जास्त लक्ष दिले जाईल. लोक योगा, व्यायाम, जॉगिंग, चालणे अशा गोष्टींकडे जास्त प्रमाणत वळतील. शालेय शिक्षण जास्तीत जास्त ऑनलाइन पद्धतीने चालविले जाईल. 
१२/५/२०

ऋषी कपूर : एक कसदार अभिनेता

ऋषी कपूर : एक कसदार अभिनेता
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
'बॉबी'  या चित्रपटाने जसे अल्पवयीन प्रेमप्रकरणांना समाजातील मुख्य विषयांच्या बरोबरीने चर्चेत आणले, तसे ऋषी कपूर यांचा चेहरा या अल्लड प्रेमाचे प्रतीक बनून फुलत राहिला. नीतू सिंग या सहअभिनेत्रीसह त्यांची जोडी पडद्यावर फुलली आणि आयुष्यातही. पहिल्या टप्प्यात ४० हून अधिक एकल नायकाचे चित्रपट,  अनेक मल्टीस्टार चित्रपट   यांतून  चॉकलेट हिरोची कारकीर्द  त्यांनी घडवली. त्यात 'लैला मजनू',  'रफू चक्कर', 'सरगम', 'कर्ज', 'प्रेमरोग', ,खेल खेल में', 'कभी कभी', 'हिना', 'नगीना' 'चांदणी', 'सागर', 'अमर अकबर अँथनी', 'हम किसीसे कम नही', 'दामिनी' अशी अनेक नावे घेता येतील. त्यांना याच काळात नवीन हीरोइनसाठी  'लकी चेहरा' मानले जात होते.
त्यांनी 'आ अब लौट चले' मध्ये दिग्दर्शनही आजमावून पाहिले आणि 'अग्निपथ' मध्ये नकारात्मक भूमिकाही केली. त्यांच्या 'द बॉडी' या प्रदर्शित झालेल्या शेवटच्या चित्रपटात, ते खुनाचे चौकशी करणारे पोलिस अधिकारी होते. त्याच दरम्यानच्या काळात 'मुल्क', 'कपूर अँड सन्स', 'दो दूनी चार' आदी चित्रपटांतून संस्मरणीय आणि त्यांच्या प्रतिमेशी कधीही जुळू न  शकणाऱ्या आव्हानात्मक भूमिकाही त्यांनी केल्या. वयाच्या साठीत असताना ते समाज माध्यमात विशेषता ट्विटरवर अत्यंत सक्रिय होते. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता जे योग्य वाटते त्यावर ते बिनधास्तपणे व्यक्त होत होते. प्रियांका चोप्राच्या पार्टीला गर्दी करणाऱ्या परंतु विनोद खन्नाचा अंत्यसंस्काराला न येणाऱ्यांवर ताशेरे ओढणारे, मद्यपानाच्या शौकाबद्दलचे त्यांचे ट्विट वादग्रस्त ठरले. पण, त्याचे ट्विट्स परखड विचार दाखवणारेच ठरतात.
वर्ष १९७९ मध्ये आलेला ऋषी कपूर आणि जयाप्रदा या दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या हिंदी पदार्पणातच 'सरगम' या म्युझिकल हिट सिनेमाने तिकीट बारीवर केलेली कमाई आजही विक्रमी मानली जाते. १९८० मध्ये आलेल्या पुनर्जन्मावरील  कथेवर आधारित 'कर्ज' हाही म्युझिकल हिट ठरला. तर १९८२ मध्ये विधवा पुनर्विवाहाच्या मध्यवर्ती कथेवरील 'प्रेमरोग' हा ऐंशीच्या दशकातला सर्वाधिक चर्चेचा सिनेमा ठरला. आपल्या प्रेयसीचे लग्न अन्यत्र ठरल्याचे समजल्यानंतर नायक तिच्या हवेलीमध्ये जातो, त्यावेळी नायिका (पद्मिनी कोल्हापूरे) 'ये गलिया, ये चौबारा, यहा आना ना दोबारा...' हे गीत गट असते. त्यावेळी जे भाव ऋषी कपूरच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतात, तिथेच त्याच्यातल्या एक कसदार अभिनेता आपल्या नजरेस पडतो.
पत्नी नीतू सिंग कपूरसोबत तब्बल १५ रोमँटिक सिनेमे करणाऱ्या ऋषी कपूर यांनी अमिताभ बच्चनसोबत 'कुली' (१९८३), कमल हसनसोबत 'सागर' (१८८५) आणि नुकतेच २०१२ साली हृतिक रोशनसोबत 'अग्निपथ' असे सिनेमे करत आपल्या प्रभावी अभिनयाचे दर्शन घडवले. श्रीदेवीसमवेत 'नगीना', 'चांदनी', मीनाक्षी शेषाद्रीसोबत 'दामिनी', माधुरी दीक्षितबरोबर 'साहिबां', रेखासोबत 'आझाद देश के गुलाम', जुही चावलासोबत 'बोल राधा बोल', दिव्या भारतीसोबत 'दिवाना' अशा नव्या-जुन्या पिढीतील तब्बल ४५ नायिकांसोबत ऋषी कपूर यांनी रोमँटिक सिनेमे दिले.
२००० नंतर मात्र ऋषी कपूर चरित्र भूमिकांकडे वळला. ज्या ताकदीने त्याने लव्हरबॉय रंगवला त्याच ताकदीने त्याने चरित्र भूमिका आणि अगदी खलनायकही रंगवला. 'फना', 'औरंगाजेब', 'पटियाला हाऊस', '१०२ नॉट आऊट', 'ओम शांती ओम', 'नमस्ते लंडन' 'लक्ष बाय चान्स', 'चिंटूजी', 'दिल्ली६', 'अग्निपथ', 'डी-डे' या आणि अशा सिनेमांमधून त्याने चरित्र भूमिका व्यवस्थित वठविल्या. त्याला प्रेक्षकांचीही तेवढीच पसंती लाभली. 'राजमा चावला' सिनेमातली त्याची राज माथूर ही भूमिकाही प्रेक्षकांना भावली.
मागील बरीच वर्षे कॅन्सरशी त्याचा लढा सुरू होता. तो उपचारही घेऊन आला होता. मात्र, अखेर त्याची लढाई अपयशी ठरली. लव्हरबॉय ते चरित्रनायक आणि खलनायक असा प्रचंड सिनेप्रवास असलेला अभिनेता, सिनेमासृष्टीतले संवेदनाशील आणि नैसर्गिक, कसदार अभिनयाचे पाईक म्हणून गणले जाणारे ऋषी कपूर आता आपल्यात नाही, हे मान्य करणे तितकेसे सोपे नाही.


११/५/२०

पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती

पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती ही गोष्ट आज घडीला सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हवी. पाणी म्हणजे जीवन असल्याने ते सर्वांना गरजेचे आहे. पण, याच पाण्याची उधळपट्टी न करता , पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी आज प्रत्येकानंच जलसाक्षर होणं गरजेचं आहे. यापुढील युद्धे ही पाण्यासाठी होतील असं भाकीत केलं जातंय. त्यामुळे सर्वात आधी या समस्येकडं आपण लक्ष दिलं पाहिजे.
आपल्याकडे पाण्याचा जास्त वापर हा शेतीसाठी होतो. पण, शेतीसाठी आता आपण पारंपरिक पद्धती सोडून ठिबक सिंचन तसेच तुषार सिंचन पद्धतीचा वापर केल्यास आपल्याकडे जेवढे पाणी उपलब्ध आहे त्या उपलब्ध पाण्यात आपण तीनपट पीक घेऊ शकतो, हे बऱ्याच उदाहरणांवरून सिद्ध झाले आहे. तरीही अजूनही बऱ्याच शेतकरी या नव्या पद्धतींचा वापर करताना दिसून येत नाहीत.
शेतीसोबतच आपल्याकडे पाण्याचा जास्त प्रमाणात वापर होतो तो उद्योगधंद्यांसाठी. येथे वापरलेलं पाणी बऱ्याच ठिकाणी वापर झाल्यानंतर पुन्हा नदीत सोडलं जातं. परिणामी, रासायनिक प्रक्रिया झालेले दूषित पाण्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होतो. अशा दूषित पाण्यामुळे नदीकाठी वसलेल्या शहरांमधील नागरिक बेजार झाले आहेत. पण जर या पाण्यावर शुद्धतेची प्रक्रिया करून ते पाणी इतर कशासाठी वापरता येते का ते पाहणे गरजेचे आहे.
साधारणपणे पिण्यासाठी आपण एक ग्लासभर पाणी घेतो. पण, बऱ्याचदा एखादा घोट पिऊन उरलेले पाणी आपण फेकून देतो. असं आपण घरी किंवा समारंभात नेहमी बघतो. हे प्रत्येक समारंभात वाया झालेलं पाणी आपण मोजले, तर एका वेळेला आपण किती पाणी वाया घालवितो, फेकून देतो याचा अंदाज येऊ शकतो. समजा, पाण्याची एक बाटली आपण विकत घेतो व नंतर उरलेले पाणी फेकून देतो तसे न करता तहानलेल्या व्यक्तीला ते पाणी दिल्यास त्याची तहान भागेल आणि पाणीही वाचेल.
पाण्याचा प्रत्येक थेंब हा महत्त्वाचा आहे, ते नागरिकांना कितीही ओरडून सांगितले तरी अजूनही त्यांच्या अंगवळणी पडत नाही. घरात २४ तास पाणी येते, म्हणून आपल्याकडून वारेमाप पाणी वापरले जाते. पण, एक दिवस पाणी आले नाही तर, तोंडचे पाणी पळते. मग, वर्षोनुवर्षे उन्हाळ्यात दुष्काळी परिस्थितीशी झुंजत असलेल्या, पाण्यासाठी वनवण फिरणाऱ्या लोकांना त्याचे महत्त्व किती असेल. म्हणून पाणी जपून वापरले पाहीजे, पाण्याचे योग्य नियोजन केले तर ज्यांना पाणी मिळत नाही, अशा नागरिकांचा पाण्याचा प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतो.
कित्येकदा आपल्या जवळपास नळ सुरू असल्याचा आवाज ऐकू येतो. त्या पाण्याचा आवाज ऐका. पाणी कुठे वाहतेय. याचा शोध घेऊन तो नळ बंद करा. विनाकारण कोणी पाणी वाया घालवत असेल तर त्याला पाण्याचे महत्त्व समजावून सांगा.


५/५/२०

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे काम प्रशंसनीय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे काम प्रशंसनीय
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्यापद्धतीने मुंबईतील, राज्यातील स्थिती संयमाने हाताळत आहेत त्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. समाज माध्यमांतूनही त्यांचे कौतुक होत आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री नागरिकांसोबत फेसबुक, ट्विटर, न्यूज चॅनेलच्या माध्यमातून संवाद साधत नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन करीत आहेत. तत्परता दाखवत संसर्ग रोखण्यासाठी लॉक डाऊनची अंमलबजावणी सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केली. वेळोवेळी जनतेसमोर येत, जनतेबरोबर संवाद साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील तमाम जनतेला कुटुंबप्रमुखाप्रमाणे काळजीचे संदेश देत आहेत.

ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे राज्याची एकूणच परिस्थिती हाताळत आहेत. त्याचा आम्हा प्रत्येकाला अभिमान आहेच. पण, त्यासोबतच त्यांच्या नेतृत्वाचा आदरही आहे. श्री. उद्धव ठाकरे हे मेहनती, संयमी, शांत व त्यांच्याकडे असलेला मुख्य गुण म्हणजे उत्कृष्ट नेतृत्व. या नेतृत्वाचा योग्य उपयोग करत ते जनतेला सोबत घेत कोरोनाविरुद्ध मजबुतीने लढा देत आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

मुख्यमंत्री पद सांभाळत असताना नागरिकांना घराबाहेर पडू नका असे सांगत असतानाच, 'तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो'. असे म्हणत त्यांनी लोकांची मने जिंकली आहेत. 'आकाश पांघरुनी जग शांत झोपलेले' अशा कवितेच्या ओळी म्हणत, 'तुम्ही आजपर्यंत मला जे सहकार्य केले त्या सहकार्याच्या जोरावर तर मी हे सर्व करत आहे. दुसरं आहे तरी कोण? असं जनतेला उद्देशून म्हणत असताना त्यांचा साधेपणा मनाला भावतो.

त्यांचा जनतेबरोबर सुरू असलेल्या संवादामध्ये कुठेही आरडाओरड नाही की, कुठेही आक्रमकपणा नाही की, कुठेही शब्दांची लाखोली दिसत नाही. एक आपल्याच घरातील ज्येष्ठ बंधुच जणू आपल्याला आपली काळजी घेण्यासाठी काही सूचना करतोय असेच करोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉक डाऊनच्या काळात उध्दवजींनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या संवादामधून एकंदरीत दिसून येत आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री, एक आक्रमक नेता असा कुठलाच आविर्भाव त्यांच्या संवादातून दिसत नाही. कोरोनाच्या संकटकाळात आपल्याशी एकदम साधेपणाने, मनापासून, कळकळीने आणि नेमक्याच संवादातून जनतेला घरातच राहण्याचा सल्ला ते देत आहेत, या संकटकाळात जनतेचा उध्दव ठाकरेंवरील विश्वासही कमालीचा वाढलेला दिसून येतोय.३/५/२०

अष्टपैलू अभिनेता : इरफान खान

अष्टपैलू अभिनेता : इरफान खान
-दादासाहेब येंधे(dyendhe1979@gmail.com)
'लंच बॉक्स', 'हिंदी मिडीयम', 'पिकू', 'तलवार', अशा अनेक चित्रपटांत विविध भूमिका, नैसर्गिक अभिनय आणि अप्रतिम संवादफेक अशा अनेक वैशिष्टयांमुळे इरफान खान यांनी आपल्या चाहत्यांच्या मनात एक विशेष स्थान मिळवले होते.
चित्रपटच नव्हे तर टीव्हीवरील मालिकांमध्ये चाणक्य, भारत एक खोज, सारा जहाँ हमारा, बनेगी अपनी बात, चंद्रकांता यातल्या त्यांच्या अभिनयाचे वेगळेपण नेहमी लक्षात राहील असेच आहे. अभिनेता इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला आहे. भारतीय चित्रपटसृष्टी ते हॉलिवूड हा त्यांचा प्रवास होतकरू कलावंतांना एक वस्तूपाठ ठरेल. दुर्धर असा कॅन्सर रोग झाला असतानाही खचून न जाता , सकारात्मकतेने इरफान खान यांनी हे वास्तव स्वीकारले आणि उपचार सुरू असताना पुन्हा त्याच उत्साहात ते उभे राहिले. पण, दुर्दैवाने त्यांच्यावर काळाने घाला घातला.
बॉलिवूडमध्ये त्यांच्या चित्रपटांत 'मकबूल'च्या रूपाने इरफान यांच्या कमालीचा अभिनय पाहायला मिळाला. 'रोग' या चित्रपटाच्या रूपाने पहिल्यांदा हिरोची भूमिका साकारण्याची त्यांना संधी मिळाली होती. 'लाइफ इन मेट्रो' या चित्रपटातील विनोदी छटेची भूमिका फिल्मफेअर अवार्ड मिळवून देणारी ठरली. तर पान सिंग तोमर वास्तवाधारीत चित्रपटातल्या भूमिकेने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. 
बॉलीवूडमधला गुंडे, हैदर, लंचबॉक्स, कारवा, हिंदी मिडीयम सारख्या त्यांच्या अभिनयाच्या शैलीला न्याय देणाऱ्या भूमिका करीत असताना आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीवर त्यांनी आपला दबदबा निर्माण केला. अँजेलीना जोलीबरोबरचा 'अ मायटी हार्ट' आणि 'द दार्जिलिंग लिमिटेड' यासारख्या हॉलिवूडपटांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यानंतर 'स्लमडॉग मिलेनिअर' यासारख्या त्यांच्या चित्रपटाला ऑस्कर मिळाल्याने जगात त्यांच्या नावाची चर्चा झाली. लाइफ ऑफ पाय, द नेमसेक, द अमेझिंग स्पायडर मॅन, ज्यूरासिक वर्ल्ड अशा आंतरराष्ट्रीय चित्रपटांतून आपले योगदान दिले .  
पैसा, प्रसिद्धी, नाव यात न गुंतता इरफानने मनापासून अभिनय केला. त्यामुळेच अभिनेता इरफान खान याचे निधन भारतीय चित्रपटसृष्टीसाठी, कलाजगतासाठी एक मोठा धक्काच आहे. त्यांच्या अकाली निधनाने एक दमदार, संवेदनशील माणूस, लढाऊ व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले आहे. भारतीय चित्रपटसृष्टी ते हॉलिवूड असा त्यांचा प्रवास होतकरू कलावंतांना स्फूर्तिदायी असाच होता. ज्या वयात अधिक सकस अभिनय करायचे दिवस होते अगदी त्याच वेळी इरफान जग सोडून गेले त्याचे चित्रपटसृष्टीतील कार्य त्याच्या चाहत्यांसोबतच नवोदित कलाकारांना नेहमीच प्रेरणादायी ठरेल.


दूध उत्पादकांचा रोजगार वाढावा

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com) ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणाऱ्या दुग्धव्यवसायाची तर कोरोनामुळ...