२९/८/२०

एकाच जागी तासनतास बसल्याने वाढू शकतो स्थूलपणा...

ऑनलाईन शिक्षण.. पण, आरोग्याचे काय?
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
ऑनलाइन शिक्षण हे केवळ पालक आणि शिक्षकांच्या मनाचं समाधान म्हणून चालू आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. काही शाळांनी अत्यंत कमी वेळ ऑनलाईनला दिला आहे. याशिवाय अनेक कल्पक उपक्रम मुलांकडून करून  घेण्यावर भर देत आहेत. इथे धोका कमी आहे, कारण केवळ स्क्रीन समोर बसावे लागत नाही. विविध उपक्रमांत गुंतून राहील्यामुळे मुलांच्या बुद्धीला चालना मिळते. पण, काही शाळा मात्र तीन ते चार तास मुलांनी स्वतः स्क्रीन समोर बसावे अशा अपेक्षा धरून आहेत. त्यांनी शिस्त राखावी म्हणून गणवेश घालून बसण्याची सक्ती करत आहेत. भरपूर लेखी अभ्यास करून घेत आहे. त्यामुळे पालक त्यातही विशेषतः आई वर्ग मुलांना दामटून स्क्रीन समोर बसवण्यात गुंतलेला दिसून येत आहे.

घरोघरी लॅपटॉप, कॉम्प्युटर नाही. त्यामुळे मोबाईलवर शिक्षण ही एक नवी संकल्पना आपण जन्माला घातली आहे. आजपर्यंत मुलांनी जास्त मोबाईल बघू नये यासाठी सर्वांनी आटोकाट प्रयत्न केले, आणि आता काळ असा आहे की पालक आणि शिक्षक मुलांच्या हातात मोबाईल देत आहेत त्यावर शिकावं म्हणून सतत मुलांवर लक्ष ठेवून असतात. आणि मुलं मात्र व्हिडिओ स्टॉप करून त्यापासून पळ काढत आहेत.

कोरोनाच्या संकट काळात सरकारने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला आहे त्याचे तासन तास चालणारे क्लासही सुरू झालेत मात्र त्याचा मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका वैद्यकीय तज्ञ व्यक्त करीत आहेत. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप या गरजेच्या वस्तू असल्या तरी त्याचा अतिरेक शरीरावर विपरीत परिणाम करू शकतो, शक्यतो, तीन वर्षांपर्यंत मुलांना कोणताही व्हिडिओ किंवा स्क्रीन दाखवणे, लहान मुलांच्या हातात शक्यतो मोबाइल देऊच नये असे केल्याने मुलांना मोबाईलचा अतिवापर किंवा टीव्ही पाण्याचे व्यसन लागू शकते. सतत मोबाइल स्क्रीन पाहिल्यास फुलांच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. एकाच ठिकाणी बसल्याने स्थूलपणा वाढू शकतो. सतत मोबाईल पाहण्याने मुलांना मनका व मानेसंबंधित आजार होण्याचा धोका आहे. तसेच निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो त्यामुळे त्याची चिडचिड वाढू शकते.

अचानक ऑनलाइन क्लास सुरू झाल्याने शिक्षक असो पालक असोत किंवा विद्यार्थी कोणालाही पुर्व तयारी करता आलेली नाही. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना जबरदस्तीने ऑनलाईन क्लासला बसवावे लागत आहे. अशामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आई-वडील जबरदस्ती करतात अशी भावना त्यांच्यात निर्माण होऊ शकते. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्यातील चिडचिड प्रचंड वाढण्याचीही भीती आहे.

विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होण्याची शक्यता अधिक असते अशा वातावरणात विद्यार्थ्यांमध्ये अतिचंचलतेचा आजार बळावण्याचा धोका असतो. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची अद्याप सवय नाही. मात्र, जबरदस्ती केल्यास त्यांच्या मनात पालकांविषयी राग निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारिरीक व मानसिक स्वास्थ्याचाही यानिमित्ताने विचार व्हावा.२१/८/२०

मनमोहक श्रावण

 मनमोहक श्रावण 
 - दादासाहेब येंधे

श्रावण वेगवेगळ्या प्रदेशांत वेगवेगळ्या पद्धतीने पुजला जातो. ही सारी माहिती लक्षात घेतली तर श्रावणाचं अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट होतं. मुख्यत्वे, श्रावण हा 'माहेरवाशिणींचा सखा असतो. या काळातील धुंद वातावरण आणि निसर्गाच्या रूपाने अनेक लेखक, कवींना त्याने मोहिनी घातली आहे. 
    
आषाढाचा निरोप घेत श्रावण दारात आलाय. श्रावण मोहक रूप, अनेक सणावारांची परडी हातात घेऊन तो येतो आणि चराचर व्यापून टाकतो. मंगलमयी क्षणांनी श्रावणी सोमवार, मंगळागौर, नागपंचमी, रक्षाबंधन, पोळा असे कितीतरी सण साजरे करताना गृहिणी दंग होऊन जातात. खरंच आल्हाददायक आहे हा श्रावण.... 

सावन का महिना पवन करे शोर...  
हे गीत ऐकताना मन कसं मोरासारखं थुई थुई नाचतं. एखाद्या अंगणात सख्या मंगळागौर साजरी करताना फुलांची आरास सजवत 'सावन आला गं सई, श्रावण आला' म्हणत माहेरपणाचे सुख मनामनात भरून घेतात.

रक्षाबंधन तर भाऊ-बहिणीला भारावून टाकणारा सण. तोही श्रावणाचाच सखा बरं का. समुद्राला आलेलं उधाण बघताना कोळी सागराला नारळ अर्पण करतात. सागराच्या एकेका लाटेबरोबर त्यांच्या आनंदालाही भरतं आलेलं असतं. म्हणून श्रावण सर्वांनाच आवडतो.

श्रावणाचा माहिना
कवी, गीतकारही श्रावणवेडे होऊन जातात. बालकवींनी श्रावणाचं काव्य अजरामर करून टाकलंय. म्हणूनच श्रावण आला की, “श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे हे कडवं अलगद ओठावर येऊन गुणगुणायला होतं.

श्रावण हा श्रवणाचा महिना. या दिवसांत मंदिरात भजन-कीर्तनाचे कार्यक्रम रंगतात. पांडवप्रताप, शिवलीलामृत,
नवनाथ भक्तिसार, काशीखंड आदी ग्रंथांचं पठण होतं. श्रावणात उत्तर भारतात झुले झुलतात. माहेरवाशिणींना माहेरी आणलं जातं. तीजेला तीजमालेची पूजा करून मुली झोपाळ्यावर झुलतात. मध्य प्रदेशात हरियाली तीज साजरी होते. या प्रसंगी वेगवेगळे मेवे घालून बर्फी बनवली जाते. स्त्रिया हातावर मेंदी रेखून, सोळा शृंगार करून तीजमाता पुजतात. राजस्थानमध्ये छोटी तीज साजरी होते. या दिवशी मंदिरात लक्ष्मी-नारायण चांदीच्या झुल्यात बसतात. राखी पौर्णिमेनंतरच्या तीजेला बडी तीज, कजरा तीज किंवा सातुडी तीज असं म्हणतात. या तीजेला महिला गुंजा नावाचा खेळ खेळतात. झोके झुलतात. त्यास सिंजरा म्हणतात.

मधुश्रावणी
बिहारमध्ये श्रावणाचं नावच मोठं मोहक आहे. तिथे या मासाला मधुश्रावणी असं म्हटलं जातं. यानिमित्ताने घर
सजवतात. दारात तांदळाच्या पिठाची रांगोळी रेखाटतात. श्रावणात बंगालमध्ये तर शिवाभिषेकाचं मोठं महत्त्व आहे. लोक कावडींनी पिंडीवर अभिषेक करतात. या कावडी आणणाऱ्यांची मोठी व्यवस्था पाहायला मिळते. आपल्याकडच्या वारकऱ्यांसारखं त्यांचं रस्तोरस्ती स्वागत होतं आणि त्यांना उपवासाचे पदार्थ दिले जातात.

महत्त्वाचा शुक्रवार
आंध्र प्रदेशात श्रावणातला दुसरा शुक्रवार अतिशय महत्त्वाचा. 'तिकडे या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. घरात वरदलक्ष्मीचं ब्रत घेतलं जातं. तामिळनाडूत या दिवसात कामाक्षीदेवी माहेरवाशीण म्हणून घरी येते, अशी भावना आ स्वागत केलं जातं. एका शुक्रवारी हळदीने, दुसऱ्या शुक्रवारी कुंकवाने, तिसऱ्या शुक्रवारी फुलांनी आणि चौथ्या शुक्रवारी फळांनी पूजा सजवतात. 

असा हा श्रावण वेगवेगळ्या प्रदेशांत वेगवेगळ्या पद्धतीने पुजला जातो. ही सारी माहिती लक्षात घेतली तर श्रावणाचं अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट होतं. मुख्यत्वे, श्रावण हा माहेरवाशिणींचा सखा असतो. या काळातील धुंद वातावरण आणि निसर्गाच्या रूपाने अनेक लेखक, कर्वींना मोहिनी घातली आहे. अनेक लेखक, कवींच्या लेखणीतून श्रावणातील सौंदर्य उलगडत गेलं आहे. ते वाचताना, ऐकताना श्रोत्यांनाही या. मनमोहक जगताची सैर घडते.
१८/८/२०

पावसाळ्यात आरोग्य जपा

पावसाळ्यात आरोग्य जपा
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

सध्या पावसाळा सुरू आहे. दरवर्षी येणारा पावसाळा विविध साथीच्या आजारांना देखील आमंत्रण देत असतो. त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. पावसाळी दिवसांमध्ये योग्य आहार व साथीचे आजार टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या तर साथीच्या आजारांपासून आपल्याला संरक्षण करता येईल. यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अत्यंत आवश्यक आहे. या दिवसात बाहेरील पदार्थ न खाणे चांगले. दूषित पाणी पिण्यासाठी वापरले जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. तसेच लहान मुलांकडेही लक्ष दिले पाहिजे. लहान मुलांना किरकोळ वाटणाऱ्या आजारांबाबत तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे हितकारक आहे. पावसाळ्यामध्ये वातावरणात बदल झाल्यामुळेही अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्या दरम्यान गॅस्ट्रो, टायफॉईड, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस यासारखे आजार मोठ्या प्रमाणात होत असतात. या आजारामुळे दरवर्षी अनेक लोक मृत्युमुखी पडतात. प्रशासनाने आजारांचा सामना करण्यासाठी कंबर कसली असली तरी आजार उद्भवण्याच्या प्रमाणात फार कपात होत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. दरवर्षी आजारी पडणाऱ्या  रुग्णांच्या संख्येत वाढच होताना दिसत आहे. यावर वेळीच आळा घातला गेला पाहिजे व आपणही काही नियम, पथ्ये पाळून प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केले पाहिजे.

मुंबईत दरवर्षी अनेक ठिकाणी पाणी तुंबते. त्यातून सर्वसामान्यांना होणारा आजाराचा प्रादुर्भाव अधिक असतो. पावसाच्या पाण्यात चालल्यामुळे लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढतो. साचलेल्या पाण्यातून चालणे हे आजार बळावण्याची शक्यता आहे. डासांची उत्पत्ती स्थळे मुंबई अधिक आहेत. पूरसदृश्य पस्थितीमध्ये साथीचे आजार वेगाने वाढतात. त्यादृष्टीने विचार करणे गरजेचे आहे.

लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू यासारखे आजार पावसाळ्यामध्ये झपाट्याने वाढतात. मुंबईमध्ये सव्वा कोटींची लोकसंख्या मर्यादित जागेमध्ये राहते. त्यामुळे या आजारांचा प्रादुर्भावही झपाट्याने होतो. साथींचे आजार कशामुळे होतात याची माहिती अनेकांना नसते. ती माहीत करून घेणे गरजेचे आहे. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग झाल्याने होणारे आजार याला साथीचे वा संसर्गजन्य आजार असे म्हटले जाते. पाणी, हवा, अन्नातून होणाऱ्या प्रादुर्भावामुळे हे आजार पसरतात. पसरणाऱ्या आजारांमध्ये मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया पाण्यामार्फत पसरणारे आजारांमध्ये कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळ यांचा समावेश असतो. लेप्टोस्पायरोसिस हा मातीच्या पाण्याच्या प्रादुर्भावातून होऊ शकतो.

तसेच घरांमध्ये पाणी साठवण्याच्या टाक्यांची झाकणे व्यवस्थित बंद करावीत. त्यामध्ये फट असेल तर डासांचा शिरकाव होऊ शकतो. मच्छरदाणीचा वापर करावा. घरात व परिसरामध्ये कोणत्याही ठिकाणी पाणी जमा होऊ देऊ नये. नारळाच्या करवंट्या, प्लास्टिक पिशव्या तसेच त्यांच्यामध्ये पाणी साठले तर मोठ्या प्रमाणात डासांची वाढ होते. साचलेल्या पाण्यातून चालत आल्यानंतर जलजन्य आजार होण्याचा प्रादुर्भावही वाढतो. त्यादृष्टीनेही प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात तापाची बदलती लक्षणे पाहता कोणत्याही प्रकारचा आजार अंगावर काढू नये. २४ ते ४८ तासांत ताप उतरला नाहीतर, त्वरित डॉक्टरांना दाखवावे. त्यांनी सांगितलेल्या आरोग्य चाचण्या करून वैद्यकीय उपचार सुरू करावेत. रुग्णालय पातळीवर जनजागृती डासांची उत्पत्ती स्थळं नष्ट करणे आवश्यक आहे .

सतत उलट्या होणे, जुलाब होणे, ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, गळून गेल्यासारखे वाटणे, हातपाय दुखणे, खूप थकवा जाणवणे आदी पाण्यातून प्रादुर्भाव होणाऱ्या आजाराची काही सामायिक लक्षणे आहेत. अशी लक्षणे जाणवू लागल्यास अंगावर काढू नयेत. घरगुती औषधांवर चालढकल करु नये. डॉक्टरांकडून औषधोपचार घ्यावा. औषधांचा कोर्स पूर्ण करावा. गरज पडली तर डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्त चाचणी करावी. आजाराची लक्षणे आढळल्यास प्राथमिक स्वरूपात 'ओआरएस' पाणी पिणे फायदेशीर ठरते. ओआरएस  उपलब्ध नसलयास हलका आहार घ्यावा. भाताची पेज, सरबत, ताक, नारळ पाणी आदी भरपूर प्रमाणात सेवन करावे. जेणेकरून, अशक्तपणा नाहीसा होऊन प्रति रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध आरोग्यविषयक समस्या गंभीर रूप धारण करू नये यासाठी आजारपणाची लक्षणे जाणवल्यास जवळच्या सरकारी दवाखान्यातच उपचार घेणे फायदेशीर ठरेल.


१०/८/२०

मुंबईला तुंबई पासून वाचवा

मुंबईला तुंबई पासून वाचवा
-दादासाहेब येंधे(dyendhe1979@gmail.com)

मुंबईत धुवाधार पावसाला सुरुवात झाल्यावर २६ जुलै २००५ रोजी मुंबईत मुसळधार पडलेला पाऊस आणि साचलेल्या पाण्यामुळे उडालेल्या थरकापाची मुंबईकरांना आजही तितकीच आठवण होते. इतकी वर्ष होऊन सुद्धा मुंबईकरांच्या मनातील पावसाळ्याची भीती जरासुद्धा कमी झालेली नाही. देशाची ही आर्थिक राजधानी पुन्हा एकदा मुसळधार पावसाने अजूनही ठप्प होते. रस्त्यावर साचलेले पाणी, विस्कळीत झालेली रेल्वे आणि विमान सेवा मुंबई दरवर्षी अनुभवत आहेत. वारंवार येणारे पुर, विस्कळीतपणा यातून यातून पुनः पुन्हा एकच गोष्ट स्पष्ट होते ती अशी की, आपल्या शहरी क्षेत्रांमध्ये पाण्याचे पारंपारिक स्तोत्र दुर्लक्षित केले गेले आहेत. वास्तविक ते सर्वांसाठी कितीतरी फायदेशीर होते.
मुंबईत पावसाचे पाणी भरणे ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. यावर्षी तसे घडले आणि धावती मुंबई ठप्प झाली यात काही नवीन नाही. वस्तुतः अनेक शहरांची हीच गत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे नैसर्गिक जलस्तोत्रांकडे केलेले दुर्लक्ष. असेच जलस्त्रोत मृत किंवा निरुपयोगी मानून जमीन वापरात बदल करणे ही जमीन विकासकांच्या हवाली करणे आणि तिथे उत्तुंग इमारती बांधणे ही प्रक्रिया वर्षानुवर्षे सुरू असल्यामुळे नैसर्गिकरित्या होणारा पावसाच्या निचरा थांबलाच; शिवाय भूजल पातळी वाढण्यालाही मर्यादा आल्या.


मुंबईत जमिनीत पाणी भरण्यासाठी आता एक इंचही जागा शिल्लक राहिलेली नाही. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने मुंबईकरांच्या रोषापासून वाचण्यासाठी सरसकट सर्वच रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एवढया मोठया प्रमाणात काँक्रिटिकीकरण मुंबईत होत असल्याने पाणी जमिनीत मुरणार तरी कुठे?

तसेच मुंबईत उद्याने आणि मोकळ्या जागा दहा टक्के देखील नाहीत. तसेच उद्यानात पाणी मुरले तरी इतर अवाढव्य पसरलेल्या मुंबईचे काय करणार हाही प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईत जमिनीत पाणी मुरण्यास पूर्वी कांदळवन, दलदल आणि मिठागरांच्या जमिनी मुबलक प्रमाणात होत्या. काळाच्या ओघात  कांदळवनांवर आणि मिठागरांच्या जमिनीवर प्रचंड अतिक्रमण झाले आहे. या नैसर्गिक जागा कमी झाल्याने पाणी मुरण्यास जागा शिल्लक राहिली नाही. ठिकठिकाणी असलेले पेव्हर ब्लॉकचे रस्ते हेही आणखी कारण ठरले आहे. ब्रिटिश काळातही इतका पाऊस पडत होता. मात्र, मोकळ्या जागा मोठ्या प्रमाणात असल्याने ही समस्या उद्भवत नव्हती. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून मुंबईचा राक्षसी विकास मुंबईला मारक ठरत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

नाल्यांच्या प्रवाहात घरातील केरकचरा, प्लास्टिक पासून टेबल, खुर्च्या, सोफासेट पासून सगळं काही स्वाधीन होते. त्यामुळे सरकारी यंत्रणांना दोष देताना एक बोट आपल्याकडेही ठेवावे लागेल. नदीपात्रात, नाल्यात अतिक्रमणाचे मोठे प्रमाण वाढले आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जितकी जबाबदार नागरिकांची तितकीच राजकारणी व सरकारी यंत्रणांचीही आहे. फक्त निसर्गाला दोष देऊन आपण आपली जबाबदारी टाळू शकत नाही.

महामुंबई साठी किती यंत्रणां व किती प्राधिकरणे काम करतात? मुंबई महापालिका, म्हाडा, एमएमआरडीए, जिल्हाधिकारी, नगरविकास खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, रस्ते विकास महामंडळ वगैरे झोपडपट्टी पुनर्वसन खाते. एवढ्या यंत्रणा एकट्या मुंबईत काम करीत आहेत. एवढ्या यंत्रणा एकट्या मुंबईत काम करीत असतानाही पावसामुळे मुंबई दरवर्षी जलमय होते व त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. तुंबलेलेले पावसाचे पाणी मुंबई प्रशासनाच्या अब्रूची लक्तरे दरवर्षी वेशीवर टांगते.

तसेच पालिका जितके लक्ष पर्जन्य जलवाहिन्यांवर देते तितके छोट्या-मोठ्या गटांवर देत नाही. बाजारांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गटारांमध्ये कचरा साचून राहतो. पावसाळ्यात हा कचरा अडकून गटारे तुंबतात. त्यामुळे नाल्यांमध्ये कचरा टाकल्यास पोलीस कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घ्यावा. तसाच बाजारांच्या, मंडयांच्या आणि झोपडपट्ट्यांमध्येही घेण्याची गरज आहे. गटारांच्या साफसफाईला ही महत्त्व द्यायला हवे.
९/८/२०

बालपण जागवणारा पाऊस

बालपण जागवणारा पाऊस
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

लहानपणी पावसात भिजला नसेल असा माणूस दुर्मिळच. जून-जुलैला सुरुवात झाली की लहानपणी खरंतर शाळेत जाण्याची लगबग  असायची. पण त्याहीपेक्षा 'एक्साइटमेंट' असायची ती पावसाची. मला आठवते सायंकाळी पाच वाजता शाळा सुटेपर्यंत दिवस उकाड्याने व अभ्यासाने हैराण झालेले आम्ही सारे दोस्तमंडळी. सायंकाळच्या गारव्याने अन पावसाची चाहूल लागल्याने काहीसे सुखद अनुभवायचो. एरवी 'शाळा सुटली पाटी फुटली, आई मला भूक लागली.' असा आरडाओरडा करत शाळा कधी सुटते अन कधी घरी जातो, अशा उत्साहातील आम्ही.

पावसाळ्यात मात्र 'येरे येरे पावसा..' म्हणून त्याला लाडीगोडी लावत विनवायचो. अन रोज  पटापट घराकडे जाणारी पावलं आता काहीशी संथ गतीने चालत असायची. आणि अपेक्षा करायचो की आता तरी बरसेल हा... आता तरी. अन येगं येगं सरी म्हणता-म्हणता मृगाची सर बसायला लागायची अन आयुष्यातील सर्वोच्च आनंद हाच. या भावनेने त्या पावसात मनसोक्त भिजायचो. मग सुरुवात व्हायची ती   'कागदी होड्यांचा' खेळ. अगदी खऱ्याखुऱ्या समुद्रात नाव वल्हवणाऱ्या नावाड्याच्या जोशात सगळे चालायचे. यात कसले घर, आई-बाबा, अन भूक आठवते. असं वाटायचं जणू हा पाऊस फक्त आपल्यासाठीच असावा कदाचित खरंच आपल्यासाठी असावा. या सगळ्या प्रकारात ज्या नव्याकोऱ्या पुस्तक, वह्या, दप्तराला जिवापाड जपतोय ते ओले होते आहे, याचेही भान नसायचे.

पावसाचा जोर ओसरला की मलाही घराची ओढ लागायची. तोपर्यंत नाले, ओढा, गल्ली-गल्लीतून पाणी खळखळत वाहायचे. आमचे ते 'टायटॅनिक' तर कधीच पाण्याखाली गेलेले असायचे आणि अशातच घराच्या अंगणात येऊन मी उभा राहायचो.  आनंदाने फुललेला चेहरा थोडा पाडून थांबायचो तोच बाळा अरे! ताप, सर्दी होईल पुरे झाले आता चल ये घरात! असा वात्सल्यपूर्ण पण थोडा रागीट असलेला स्वर कानावर पडला की घरात जावंच लागायचे. अगदी तोपर्यंत पाऊस जणुकाही त्याच्या आईच्या धाकाने परतलेला आहे, असेच वाटायचे.

यानंतरच्या सृष्टीचे रूप त्या बालवयात अत्यंत आनंद द्यायचे. हळूच इंद्रधनुचे सप्तरंग बाहेर यायचे आणि आपणच सप्तरंगी झाल्याचा भास मला व्हायचा. यानंतर व्हायचा तो प्लान गावाकडच्या टेकडीवर जायचा आहा! उंच उंच टेकडीवरून दिसणारे हिरवेगार शेत, तलाव, कौलारू शाळा, गावातलं मुक्ताई देवीचं मंदिर हे सारं माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव असायचा. यातच टेकडीवर रंगायचा लपंडावाचा खेळ. कसा? प्रत्येकाने त्या टेकडीवरून आपले घर शोधायचे. खरं तर घर जेथे आहे तेथेच असायचे. पण, ते कोठेतरी झाडाच्या आड लपतयं आणि अशातच सापडलं... सापडलं म्हणत लपंडावाचा खेळ पहिला मीच जिंकला या आनंदात टेकडीवरून सरसर खाली उतरायचो. खरंतर टेकडीवरून मी खाली यायचो पण आनंद हा गगनाला भिडायचा. पुन्हा एकदा तोच पाऊस भरून आलाय. कदाचित पुन्हा कोणीतरी पावलांची गती संथ करून  निघाला असेल घरून आपली नाव वल्हवत, म्हणत येरे.. येरे.. पावसा....

८/८/२०

पोलिस दलाला सॅल्युट…

कोरोना योध्यांना सलाम...
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
राज्यात कोरोना संसर्गामुळे उदभवलेल्या स्थितीत आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी आणि पोलीस विभाग एखाद्या योद्ध्यासारखे लढताहेत. सर्वजण झोकून काम करताना दिसून येत आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिक कोरोना रुग्णाच्या संपर्कात येण्यापासून टाळण्यासाठी सामाजिक अंतर राखण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असताना दुसरीकडे रुग्णालयांमधील डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी वर्ग कोरोना रुग्णाच्या संपर्कात असून २४ तास त्यांच्या सेवेत व्यस्त आहेत. यात आणखी सर्वात महत्त्वाची भूमिका आज आपले पोलिस दल पार पाडत आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

रस्त्यारस्त्यांवर, गल्लोगल्ली गस्त घालत पोलीस कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आखत आहेत. सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत.

कोरोनामुळे मुंबईसह महाराष्ट्रात 'लॉक डाऊन' यशस्वी करण्यासाठी पोलीस अक्षरशः रस्त्यावर उभे आहेत. रस्त्यावर उतरू नका, आपल्या घरातच राहा असे जनतेला हात जोडून सांगत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या या लढाईतून पोलिस वजा झाले तर काय परिस्थिती होईल याची साधी कल्पनाही करवत नाही. असे झाले तर आपल्याकडे वुहान वा न्यूयॉर्कपेक्षा वेगळी परिस्थिती नसेल हे येथे नमूद करावेसे वाटते. आज प्रत्येकाला स्वतःचा जीव प्रिय असताना पोलीस अधिकारी-कर्मचारी मात्र डोळ्यात तेल घालून खडा पहारा देत आहेत. कोरोना वाहणाऱ्या जिल्हा, तालुका आणि शहर यांच्या सीमेवरच कोरोना वाहकांना रोखण्याचं काम पोलिसांकडून केले जात आहे.

कित्येक नागरिक तर सोशल डिस्टंसिंग नियमांचे उल्लंघन करू नका असे सांगू पाहणाऱ्या पोलिसांवरच ठीकठिकाणी हल्ले करत आहेत. काही ठिकाणी दगडफेकही झाली आहे. यात हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. काही पोलीस कोरोना बाधित भागात राहत असल्याने स्वतःला जाणीवपूर्वक आपल्या कुटुंबियांपासून दूर ठेवत आहेत. बरेच पोलीस कोरोना बाधितही झाले असून कित्येक जणांचा या रोगाने बळीही घेतला आहे. सर्वसामान्यांनी आता किमानपक्षी या कोरोना योद्ध्यांसाठी समजुतीची भूमिका घेणे गरजेचे आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रत्यक्ष सहभाग घेता येत नसला तरी कोरोनाशी लढणाऱ्यांना सहकार्य केले, नियमांचे पालन केले तरीही या संकटाची किनार काही प्रमाणात पुसट होत जाईल.

प्रत्यक्षात आज नागरिकांमध्ये कोरोनाचे गांभीर्य दिसून येत नाही. लोक विनाकारण घराच्या बाहेर पडत आहेत. बाजारात गर्दी करत आहेत. सुरक्षित वावराचा विसर पडला आहे. असे प्रकार सर्वच ठिकाणी घडत आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे काम मात्र पोलिसांना करावे लागत आहे. नियम मोडणाऱ्यांची चौकशी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, कागदपत्रे बनविणे अशी कामे करताना पोलिसांचा त्यांच्याशी थेट संपर्क येतो. यामुळे पोलिसांनाही कोरोनाची लागण झपाट्याने होत आहे. त्यामुळे पोलिसांनाही शासकीय सेवेतून अधिकाधिक मदत मिळावी त्यांनाही आरोग्यसेवा वेळेवर मिळावी ही अपेक्षा आहे.

लॉक डाऊन दरम्यान पोलीस महत्त्वाचे ठिकाण, मुख्य रस्ते आणि विविध चौकात तैनात आहेत. ऊन-पावसाची तमा न बाळगता नाही ते आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. वाहनांची आणि अनावश्यक बाहेर पडणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी करत आहेत. प्रसंगी त्यांच्यावर कार्यवाही केली जात आहेत. अनेक पोलिस कर्मचारी कित्येक दिवस आपल्या घरी गेलेले नाहीत.

पोलीस कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या राज्यातील, परिसरातील नागरिकांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहेत. त्यामुळेच, सर्वसामान्य नागरिक म्हणून आपणही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, या उद्देशाने प्रत्येक ठिकाणी पोलिसांचे जोरदार स्वागत करणे गरजेचे आहे. त्यांच्याप्रती सहानुभूती दाखविणे गरजेचे आहे. त्यांचे मनोबल वाढविणे गरजेचे आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता केवळ नागरिकांना या रोगाची बाधा होऊच नये म्हणून रस्त्यावर उतरलेल्या या कोरोना योद्ध्यांना सलाम...!
समस्त जनहो, पोलीस दलाला काय काय कामं करावी लागतात हे वरील फोटोंतून कळले असेलच.  


दूध उत्पादकांचा रोजगार वाढावा

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com) ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणाऱ्या दुग्धव्यवसायाची तर कोरोनामुळ...